Skip to main content
x

वासकर, तुकोबादादा अंदाभाऊ

    वारकरी संप्रदायातील थोर, साक्षात्कारी संत मल्लाप्पा वासकर यांचे नातू व उत्तराधिकारी म्हणून ह.भ.प. तुकोबादादा यांनी संप्रदायाच्या बांधणीत व विस्तारात लोकोत्तर कार्य केले आहे. पेशवेकालीन ऐतिहासिक दफ्तरामध्ये तुकोबादादा  यांच्या व वासकर फडाच्या कार्याची अनेक ठिकाणी नोंद आढळते.

तुकोबादादा ही मल्लाप्पा वासकरांची तिसरी पिढी. मल्लाप्पा (१७०७ ते १७९९) यांनी स्थापन केलेल्या वासकर फडाचे कार्य तुकोबादादांनी दूरवर कर्नाटकापर्यंत पसरविले व कर्नाटकाच्या उत्तर भागात विठ्ठल भक्तीचा, वारकरी संप्रदायाचा झेंडा, नाम-संदेश पोहोचविला. मल्लाप्पा यांना अंदाभाऊ व सयाजी अशी दोन मुले होती; पण दोन्ही मुले अल्पायुषी ठरली आणि अंदाभाऊ यांचा मुलगा तुकोबादादा यांनी आजोबांच्या कार्याचा वसा व वारसा पुढे समर्थपणे चालविला.

मल्लाप्पा यांच्या अंगाखांद्यावरच तुकोबादादा वाढले व आजोबांकडूनच त्यांना विठ्ठलभक्तीचा संस्कार बाळकडू म्हणून लाभला. मल्लाप्पांचे गुरू शंकरस्वामी शिऊरकर आणि शंकरस्वामींचे गुरू संत निळोबाराय पिंपळनेरकर या दोघांच्याही सहवासाचा व आशीर्वादाचा लाभ तुकोबादादा यांना मिळाला. तुकोबादादांना आजोबांकडूनच वारकरी कीर्तनाची दीक्षा मिळाली होती व वारकरी संप्रदायातील एक थोर कीर्तनकार, असा त्यांचा नावलौकिक होता.

काही प्रसंगांमुळे तुकोबादादांनीच, वासकर फडाच्या मालकांनी स्वत: कीर्तन न करण्याचा दंडक घातला व त्यामुळे वासकर फडावरील शिष्यांमध्ये एकापेक्षा एक थोर कीर्तनकार निर्माण झाले. उभ्या महाराष्ट्रात परिचित असे विद्वान प्रवचनकार, कीर्तनकार ह.भ.प. भाऊसाहेब काटकर हे त्या अनेकांपैकी एक प्रमुख कीर्तनकार होते. खुद्द वासकर फड प्रमुखांनी कीर्तन न करण्याचा तुकोबादादांनी घातलेला दंडक आजही, गेली २०० वर्षे त्या फडावर पाळला जातो (अपवाद : तात्यासाहेब वासकर व त्यांची परंपरा).

तुकोबादादांच्या जीवनातील अनेक अतर्क्य घटना आख्यायिका झालेल्या आहेत व त्या आख्यायिकांतून तुकोबादादांच्या पारमार्थिक अधिकाराचे दर्शन घडते. तुकोबादादांनंतर त्यांचे पुत्र विठ्ठल आबा (इ.स.१८१७ ते १८५५) यांनी तितक्याच समर्थपणे (वारकरी भक्ती संप्रदायाचे) वासकर फडाचे भक्तिसेवेचे कार्य केले. त्यानंतर ही परंपरा ह.भ.प. ज्ञानोबा अण्णा, ह.भ.प. एकनाथ अप्पा, ह.भ.प. भानुदास दादा, ह.भ.प. ज्ञानेश्वर ऊर्फ अप्पासाहेब महाराज यांनी पुढे चालविली. सध्या ह.भ.प. विवेकानंद महाराज वासकर ही परंपरा चालवीत आहेत. आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानदेवांचा पायी वारीचा पालखी सोहळा ज्या हैबतबाबा अरफळकर यांनी सुरू केला, त्यामध्ये ह.भ.प. तुकोबा दादा वासकर व विठ्ठल आबा यांचे फार मोठे योगदान आहे.

आजही पालखी सोहळ्यात अरफळकर, शितोळे यांच्याबरोबरच वासकर यांचा मान प्रमुख आहे. वारकरी संप्रदायातील मुख्य फडामध्ये ‘वासकर फड’ हा प्रमुख फड असून या फडातूनच आजरेकर फड, साखरे फड, शिरवळकर फड अशा नव्या फडांची शिष्यांनी वाढ केली आहे. या वारकरी फड परंपरेची संघटनात्मकदृष्ट्या सुदृढ बांधणी करण्यात मल्लाप्पांनंतर ह.भ.प. तुकोबादादांचे कार्य ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. श्री तुकोबादादा यांना आजोबांकडून विठ्ठलभक्तीचा वारसा मिळाला होता, तरी त्यांना हनुमंताच्या भक्तीची-उपासनेची विशेष उपजत आवड होती.

वारकरी संप्रदायात भक्तिक्षेत्रातील आचार्य म्हणून हनुमंत-मारुती उपासना दिसून येते. स्वत: संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे ‘शरण शरण हनुमंता । काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥’ अशा अभंगरचना प्रसिद्ध आहेत. या हनुमंतपर अभंगरचना ह.भ.प. तुकोबादादा यांना विशेषत्वाने आवडत होत्या.

हनुमान जयंतीच्या वेळेस होणार्‍या कीर्तन-निरूपणास तुकोबादादांना हनुमंतावरील अभंगावर निरूपण करण्याचा भक्त-भाविक श्रोते आग्रह करीत. हनुमंताचा श्री तुकोबादादा यांना विशेष कृपाप्रसाद लाभलेला होता. ही हनुमंत भक्ती आजही वासकर फडावर विठ्ठलभक्तीबरोबरच प्रवाहित झालेली दिसते. फडाचे विद्यमान उत्तराधिकारी ह.भ.प. विवेकानंद वासकर हे हनुमंताचे उपासक असून संत तुलसीदास कृत ‘हनुमानचालिसा’ त्यांच्या नित्य उपासनेचा भाग आहे. हेच वारकरी संप्रदायाचे महासमन्वयात्मक वैशिष्ट्य आहे. तुकोबादादा करमाळामार्गे पंढरपूरवारीला येत. एकदा त्यांचा मुक्काम करमाळ्यापासून जवळच असलेल्या, सीना नदीकाठच्या बाळेवाडी येथे होता. त्यांना रात्री ‘मी आदिनाथ आहे, मला बाहेर काढ,’ असा दृष्टान्त झाला. असा २-३ मुक्कामांत प्रत्येक वेळी झालेला दृष्टान्त लक्षात घेऊन त्यांनी सीना नदीवरील किनार्‍यावर असलेल्या २-३ एकर निवडुंगाच्या बनात शोध घेतला तेव्हा त्यांना जमिनीत गाडलेले भव्य मंदिर व आदिनाथाची भव्य मूर्ती आढळली.

आजही तेथे दर शिवरात्रीला यात्रा भरते. त्यासाठी पंढरपुराहून वारकरी तेथे पायी दिंडी घेऊन जातात. कीर्तन, रात्रजागराने  वारकरी आपली सेवा बजावतात. अशा प्रकारे गुप्त आदिनाथाचा शोध तुकोबादादांमुळेच लागला म्हणून भाविक त्यांना साक्षात्कारी संत मानतात.

तुकोबादादांना विठोबा व गंगाराम असे दोन मुलगे व एक मुलगी अशी तीन अपत्ये होती. पैकी मोठा मुलगा विठ्ठल आबा यांनी त्यांची परंपरा पुढे चालविली. तुकोबादादांच्या पत्नीचे बाळंतपण स्वत: पांडुरंगाने तुकोबादादांच्या बहिणीचे रूप घेऊन केले अशीही आख्यायिका आहे. १८१७ साली तुकोबादादांचे वासी (जि. उस्मानाबाद) येथे वैकुंठगमन झाले.

विद्याधर ताठे

वासकर, तुकोबादादा अंदाभाऊ