Skip to main content
x

व्यास, किशोरजी मदनगोपाल

हाराष्ट्रात भागवतधर्माची ध्वजा गेल्या आठ पिढ्या निष्ठेने फडकवत ठेवून, प्रवचन, व्याख्यानादी माध्यमातून भारतीय तत्त्वज्ञान जनमानसात पोहोचवणारे महाराष्ट्रातील अहमदनगर येथील व्यास घराणे आजही ही परंपरा टिकवून आहे. किशोरजी व्यास यांनी आपले वडील कै. पं. मदनगोपाल व्यास या पुराण, वेद, ज्योतिष या विषयांतील प्रकांड पंडितांकडून हा भक्तिरसाचा अमृतकुंभ समर्थपणे पेलला आहे. किशोरजींच्या आजोळी म्हणजे मातु:श्री गुलाबदेवींच्या माहेरी, राजस्थानात मिश्रा घराण्यातही श्री भागवत ग्रंथाची उपासना आणि पारायणे नियमितपणे होत असत. अशा परिपूर्ण आध्यात्मिक परंपरेचा आणि आचरणाचा संचार असलेल्या घरांमध्ये किशोरचे बालपण उन्नत होत गेले. १९४९ साली अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर गावात किशोर व्यासांचा जन्म झाला. शाळेत, तिसर्या इयत्तेत असतानाच त्यांनी खणखणीत वाणीने आणि अभ्यासपूर्ण आकलनातून तयार केलेले धार्मिक विषयावरील भाषण खूप प्रशंसिले गेले. सात-आठ वर्षांचे असतानाच त्यांनी गावात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून मुलांचा एक संघ स्थापन केला. पौगंडावस्थेत असतानाच त्यांचे मन अध्यात्म आणि भागवतविचारांनी नेहमी उचंबळून येत असे. त्यांनी बालवयातच वेद, उपनिषदे, पुराणे आदी वैचारिक, धार्मिक वाचन, तसेच सात्त्विक जीवन आचरणाला पोषक असलेल्या वाङ्मयाचा झपाटल्यागत अभ्यास सुरू केला.

सतराव्या वर्षीच किशोरजींनी वडिलांच्या सांगण्यावरून भागवतकथा प्रवचनाचे शिवधनुष्य लीलया पेलले. प्रगाढ पंडित आणि अधिकारी श्रोत्यांसमोर न डगमगता केलेल्या प्रवचनामुळे आपला मुलगा भविष्यात निश्चितच घराण्याचा वारसा पुढे चालवील याची खात्री आणि समाधान पंडित मदनगोपालजी व्यास यांना वाटले. अहमदनगरच्या शाळेत त्यांनी माध्यमिकपर्यंत शिक्षण घेतले आणि उच्च- शिक्षण म्हणजे विशेषत: तत्त्वज्ञानाच्या शिक्षणासाठी ते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराच्या तत्त्वज्ञान विद्यापीठ’, ठाणे येथे दाखल झाले.

तत्त्वज्ञान विद्यापीठात विविध प्रकारच्या विषयांचा तात्त्विक कसोट्यांवर पारखून अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्राची वेस ओलांडून ते भारतीय आणि पाश्चिमात्य विचार, तत्त्वज्ञानाचा अभ्यास जाणीवपूर्वक करून घेण्यासाठी काशी विद्यापीठात प्रवेश करते झाले. काशी येथील गोयंका महाविद्यालयातून त्यांनी प्रसिद्ध वेद अभ्यासक पं. विश्वनाथजी देव यांच्याकडून सखोल शास्त्राभ्यास करून तेथील संस्कृत विद्यापीठाची आचार्यही पदवी प्राप्त केली.

किशोरजी व्यास यांचा ओढा तत्त्वज्ञान विद्यापीठातील त्यांच्या अभ्यासापासूनच दादा म्हणजेच स्वाध्यायचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचार आणि आचारांकडेच होता. त्यानुुसार त्यांनी महाराष्ट्र, गुजरातच्या गावोगावी श्रीभागवतकथा ज्ञानयज्ञाची शेकडो व्याख्याने, प्रवचने आजवर सिद्ध केली आहेत. केवळ भागवत नव्हे, तर हिंदू मान्यतेनुसार महाभारत, रामायण, वेद, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, दासबोध, योगवसिष्ठ या ग्रंथांतील सद्विचार आणि स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, जे. कृष्णमूर्ती यांच्या अक्षरकृतींचा प्रसार त्यांनी कित्येक गावा-शहरांत केला. संत ज्ञानेश्वर आणि जिद्दू कृष्णमूर्ती यांचे तौलनिक दर्शनया विषयावरील त्यांचे व्याख्यान खूप गाजले. किशोरजींनी दिलेल्या महाभारतावरील व्याख्यानमालेवर काशी हिंदू विद्यापीठातील संस्कृतमधील महाकवी पं. रेवाप्रसाद द्विवेदी खूपच प्रभावित झाले. रेवाप्रसादजींची प्रशंसा म्हणजे पदवीच मानली जात असे.

ऐंशीच्या दशकात किशोरजी व्यास यांनी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानही संस्था स्थापन केली. या प्रतिष्ठानामार्फत इच्छुक विद्यार्थ्यांना, तरुणांना वेद, उपनिषदे, धर्मग्रंथांचा परिचय आणि त्यात उच्च विद्याविभूषित करून देणे, त्यासाठी शिष्यवृत्ती, वसतिगृह उपलब्ध करून देणे इत्यादी सेवा विनामूल्य दिल्या जातात. याबरोबरच प्रतिष्ठानातर्फे बुजुर्ग आणि अधिकारी साधक आणि अभ्यासकांना त्यांच्या आध्यात्मिक योगदानाची दखल घेऊन दरवर्षी महर्षी वेदव्यासपुरस्कार, तसेच संतश्री ज्ञानेश्वरपुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आजवर या पुरस्कारांनी पं. दत्तमहाराज कविश्वर, डॉ. .. येरगुंटवार, पं. यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांना महर्षी वेदव्यासपुरस्काराने, तर संतश्री ज्ञानेश्वरपुरस्काराने ह... धुंडामहाराज देगलूरकर यांना गौरविले गेले आहे.

मृदुभाषी आणि सकलजनांच्या जीवनात मांगल्याची ज्योत प्रज्वलित राहावी, हा ध्यास घेतलेल्या आचार्य किशोर महाराजांनी त्यांना प्राप्त झालेल्या मिळकतीमधून अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. आचार्यांच्या कार्याची दखल श्री कांची पीठाचे शंकराचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती यांनी आपली कृपादृष्टी ठेवून घेतली आहे. श्री कांची पीठाचे नंतरचे शंकराचार्य श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्याशीदेखील किशोरजींचा स्नेहार्द्र परिचय आहे. याशिवाय राजस्थानचे श्री निंबार्कातीर्थाचे अधिपती जगद्गुरू निंबार्काचार्य, भारतमाता मंदिराचे श्री सत्यमित्रानंदगिरी स्वामीजी, डीडवाला मठाचे श्रीरामकिशोरजी महाराज अशा अनेकांचा सहवास आणि आशीर्वाद त्यांना लाभला आहे. स्वामी श्री चंद्रशेखर सरस्वती यांनी किशोरजींना तुम्ही ब्रह्मीभूत डोंगरेमहाराजांचे वारसदार व्हालअसा शुभाशीर्वाद दिला आहे. किशोर व्यासांनी स्वामी सत्यमित्रानंदजी गिरी यांच्याकडून संन्यासदीक्षा घेऊन गोविंदगिरीहे नाव धारण केले आहे.

संदीप राऊत

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].