Skip to main content
x

यादव, चंद्रजित मारुतराव

     चंद्रजित मारुतराव यादव यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील मौजे सोहोळी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मारुतराव तातोबा यादव व आईचे नाव आळंदीबाई आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण कडेगावच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात झाले. त्यांनी कला निकेतन व दळवीज आर्ट स्कूल, कोल्हापूर येथे मूलभूत अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी रेखा व रंगकला (पदविका) अभ्यासक्रम कलाविश्‍व महाविद्यालय सांगली व अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथून पूर्ण केला; तर शिल्पकलेचे शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून पूर्ण केले.

त्यांना या कलाशिक्षण प्रवासात रा.वि.गोसावी, तुळशीदास तिळवे, पराग सूर्यवंशी या कलाध्यापकांचे मार्गदर्शन लाभले; पण ‘कलेतील माझी पहिली गुरू माझी आईच’, असे त्यांना वाटते. कारण तिची प्रत्येक गोष्ट तिच्या कलासक्त मनातून कलात्मकरीत्या निर्माण होत होती. त्यामुळे घरातील वातावरणही आनंदमय होते. लहानपणीचे त्यांच्यावर झालेले कलासक्त मनाचे संस्कार त्यांना कलाकाराचे जीवन जगण्यास सदैव प्रेरणा देणारे ठरले आहेत.

रेखा व रंगकला अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर शिल्पकलेचा अभ्यास पूर्ण करण्याची त्यांची मनीषा होती. पुण्याचे शिल्पकार शरद कापूसकर यांचा स्टुडीओ बघितल्यानंतर व त्याच दरम्यान त्यांनी सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कीर्तीचे फ्रेंच शिल्पकार रोदांच्या शिल्पांचे मुंबईतील प्रदर्शन पाहिल्यानंतर त्यांना शिल्पकलेचे शास्त्रोक्त धडे घेण्याची प्रेरणा मिळाली. खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांना जे.जे.मध्ये शिल्पकला विभागात  प्रवेश मिळाला.

या अभ्यासक्रमाच्या वर्गात शिकत असताना त्यांना जे.जे.च्या संग्रहातील व बाहेर स्थापित असलेल्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भारतीय शिल्पकारांच्या शिल्पाकृतींनी भुरळ घातली. त्यांनी अशा अनेक कलाकृतींचा, शरीरशास्त्राचा, शिल्पांमध्ये असलेल्या आविर्भावाचा व पोताचा अभ्यास करण्याचा ध्यास घेतला. त्यांच्या या सूक्ष्म निरीक्षणाचा परिणाम म्हणजे ते विद्यार्थी असताना त्यांनी केलेल्या व्यक्तिशिल्पाला महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या विद्यार्थी विभागात १९८७ मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. विशेष म्हणजे, राज्य कला प्रदर्शनात विद्यार्थी विभागात, शिल्पाला असे प्रथम पारितोषिक तब्बल बावीस वर्षांनंतर मिळाले होते. त्यांच्या कलाकृतींना २००१ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटी व महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाच्या व्यावसायिक विभागात पारितोषिके मिळाली. त्यांच्या कलायोगदानाचा उचित गौरव त्यांना २००३ मध्ये ‘चंद्रकांत मांढरे गौरव’ पुरस्कार प्रदान करून करण्यात आला. तसेच 'आम्ही सांगलीकर' या संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

त्यांना १९९८ मध्ये लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्या साडेदहा फूट उंचीच्या पूर्णाकृती स्मारकशिल्पाचे काम मिळाले व ते त्यांनी अत्यंत जिद्दीने, चिकाटीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने कांस्य धातूमध्ये यशस्विरीत्या पूर्ण केले. त्यांचे हे पहिले स्मारकशिल्प इस्लामपूर येथे पाहावयास मिळते.

यानंतर त्यांनी अनेक कला महाविद्यालयांतून शिल्पाकृतींची अनेक प्रात्यक्षिके केली आहेत. अहमदनगर येथे बॉम्बे आर्ट सोसायटीच्या काव्य- चित्र - शिल्प या कार्यक्रमात त्यांनी साकारलेले सुप्रसिद्ध भारतीय शिल्पकार राम सुतार यांचे व्यक्तिशिल्प प्रात्यक्षिक आजही अनेक कलारसिकांच्या हृदयात स्थान मिळवून आहे. हे प्रात्यक्षिक झाल्यावर स्वत: शिल्पकार सुतार यांनी ‘‘आज यादव ‘ब्रह्म’ झाले! पुन्हा एकदा त्यांनी राम सुतारांना जन्माला घातले,’’ असे यादवांना उद्देशून उद्गार काढले.

चंद्रजित यादव स्मारकशिल्पे घडविताना ती केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून करीत नाहीत. सामाजिक बांधीलकीतून त्यांनी केलेली डॉ. बी.पी. दिवाळे, कवलापूर येथील श्रीमती सुमतीबाई पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, हुतात्मा किसन अहिर यांची स्मारकशिल्पे त्याची साक्ष देतात. लोकनेते राम मेघे, सुप्रसिद्ध उद्योगपती आदित्य बिर्ला यांची यादव यांनी घडविलेली स्मारकशिल्पे म्हणजे त्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वपूर्ण कार्य व त्या व्यक्तीची जनसामान्यांसमोर असलेली प्रतिमा यांचा सुरेख संगम म्हणावा लागेल.

ज्या व्यक्तीचे स्मारकशिल्प करावयाचे असेल, त्या व्यक्तीचा ते सर्व दृष्टिकोनांतून सूक्ष्मपद्धतीने अभ्यास करतात आणि नंतरच ते मातीकाम करतात. मातीकामातील गुणधर्म दुसऱ्या शिल्पमाध्यमात रूपांतरित होताना ते त्या माध्यमाशी तांत्रिकदृष्ट्या प्रामाणिक राहतात हे विशेष.

त्यांनी मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ केलेले २०×८ फूट लांबी - रुंदीचे भव्यदिव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे उत्थित कांस्य धातुशिल्प व पाचाड, रायगड येथील राजमाता जिजाईंचा कांस्य धातूचा अर्धपुतळा ही उल्लेखनीय ऐतिहासिक स्मारकशिल्पे आहेत.

औरंगाबाद विद्यापीठासाठी तसेच सांगलीच्या शिवाजी चौक इथला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती शिल्प , नांदेड येथील शंकरराव चव्हाण स्मारक, सांगलीच्या सर्वोदय साखर कारखान्याच्या आवारातील व्यंकप्पा पत्की ह्यांचे शिल्प, कासेगाव,सांगली येथील नेते राजारामभाऊ पाटील ह्यांचे शिल्प आणि दुबई ,सिंगापूर येथील उद्योजक एस.पी.जैन ह्यांचे शिल्प ,मुंबईच्या लोखंडवाला येथील श्रीयुत आणि श्रीमती छापसीभाई शाह वागडवाला अशी अनेक शिल्पे त्यांनी आजवर साकारली आहेत. 

त्यांनी अनेक प्रकारची लहानमोठी स्मारकं,शिल्पे,व्यक्तिशिल्पे, सर्जनात्मक शिल्पे साकार केलेली आहेत. त्यांनी आपल्या सर्जनात्मक शिल्पांचे प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर कलादालनात भरविले होते.

ते प्रामुख्याने बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबई या कलासंस्थेचे अनेक वर्षे खजिनदार म्हणून सामाजिक बांधीलकीतून काम पाहत आहेत. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या भूखंडावर जागतिक पातळीवरचे भव्यदिव्य कलासंकुल उभारण्याच्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या संकल्पामध्ये यादव यांचा मोठा वाटा आहे.तसेच ते तेथील कमिटीचे सदस्य आहेत. हरयाणा शासनाच्या अकॅडमीक कौन्सिलचेही ते सदस्य आहेत.  कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. उदयोन्मुख कलाकारांना व कला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याच्या कामी चंद्रजित यादव सदैव आघाडीवर असून मुंबईतील  चारकोप, कांदिवली येथील स्टुडीओत आपल्या कलासाधनेत व व्यावसायिक कामात ते व्यस्त असतात.

- प्रा. प्रकाश राजेशिर्के

.

संदर्भ
१. क्षीरसागर, संजय; ‘प्रतिरूपणकार चंद्रजित यादव’; ‘अन्वयार्थ’ वार्षिक, मुंबई; २०१०. २. रंजनकर, श्याम; ‘महापुरुषांची शिल्पेः एक  आव्हान’; ‘विश्‍व लीडर’; फेब्रुवारी २०१०. ३. यादव, चंद्रजित; ‘प्रदर्शनीय माहिती’, पुस्तिका
यादव, चंद्रजित मारुतराव