Skip to main content
x

जाधव, अर्जुन राघव

            र्जुन राघव जाधव यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील धामणदेवी या छोट्याश्या गावात झाला. त्यांना लहानपणासून सैनिकी पेशाची आवड होती. वयाच्या अठराव्या  वर्षी त्यांनी सैन्यभरतीत आपले नाव नोंदविले. आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करत १९७१ पर्यंत जाधव नारब सुभेदाराच्या पदावर पोहोचले. याच साली पाकिस्तान युद्धाच्या वेळी आघाडीवरील पूर्व विभागातील एका प्लॅटूनचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. शत्रूच्या ताब्यातील पूल जिंकून घेतल्यावर प्लॅटूनची पुनर्रचना करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांना ठाण्याच्या जागी खंदक खोदायचा होता. पण त्याआधीच शत्रूने सैन्याची जमवाजमव करून पुन्हा हल्ला चढविला.
       शत्रूकडे तोफा आणि मध्यम आकाराच्या मशीनगन्स होत्या.  त्यांच्या तुलनेत जाधवांकडील सैन्यबळ अगदीच तोकडे होते. परंतु जाधव डगमगले नाहीत. त्यांनी आपल्या सेनेला धीर दिला व निकराचा हल्ला चढविला. त्यामुळे शत्रूला माघार घ्यावी लागली; पण शत्रूने लगेच पुन्हा हल्ला केला. 
      
या वेळच्या चकमकीत जाधवांच्या सेनेतील एक जवान जबर जखमी होऊन रणभूमीवर कोसळला. ते पाहताच जाधवांनी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता त्याच्याकडे धाव घेतली. त्या सैनिकाला उचलून त्यांनी ताबडतोब सुरक्षित ठिकाणी आणले. अशा निधड्या छातीचा नेता लाभल्यामुळे सैनिकांचा उत्साह दुणावला व त्यांची सरशी झाली. जाधवांनी केलेल्या भीमपराक्रमाची दखल घेऊन भारत सरकारने दि. ११ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना ‘वीरचक्र’ प्रदान केले. पुढे ते सुभेदार झाले व मानद लेफ्टनंटची पदवीही त्यांना देण्यात आली.
-संपादित

जाधव, अर्जुन राघव