Skip to main content
x

जोग, लक्ष्मण गणेश

       क्ष्मणराव जोगांचा जन्म देवरूख (जि. रत्नागिरी) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण रत्नागिरी येथे व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. विद्यार्थिदशेत त्यांच्यावर प्राध्यापक न.र.फाटक व समीक्षक वा.ल.कुलकर्णी यांचा खूप प्रभाव पडला. आरंभी गिरगावातील शारदासदन येथे शिक्षक व नंतर राणी पार्वती देवी महाविद्यालय बेळगाव, नॅशनल महाविद्यालय वांद्रे आणि रुपारेल महाविद्यालय मुंबई येथे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले.

‘आभाळाचा रंग निळा’ या जोगांच्या कादंबरीत एका सुसंस्कृत मनाचे व्यापार जसेच्या तसे व्यक्त झाले असून त्यापूर्वीच्या त्यांच्या ‘काळोख आणि किरण’ या पहिल्या कादंबरीत त्यांचे अनुभव बोलके झाले आहेत. ‘मी जे महाविद्यालयीन जीवन अनुभवले त्यातूनच ही कलाकृती जन्मली’ असे ते म्हणतात. विद्यापीठीय स्तरावर निस्संशय साहाय्यभूत ठरेल असे ‘दीपस्तंभ’ व ‘दीपदर्शन’ हे समीक्षाग्रंथ त्यांनी लिहिले. ‘साहित्यात जे-जे नवे काही घडत असते, त्याचा शोध घ्यावा ही माझ्या साहित्यप्रेमी मनाची आवड  आहे’ असे त्यांनी म्हटले आहे. ‘तेंडुलकरांना सभ्यतापूर्ण जीवनाहून वेगळे जीवन दाखवायचे आहे’ असे विधान करून जोग लिहितात, ‘सखाराम वा घाशीराम यांचे लेखन लेखकाचे प्रचंड सामर्थ्य प्रत्ययाला आणून देते. हे सामर्थ्य सर्वस्पर्शी न होणे ही फार मोठी वाङ्मयीन शोकांतिका ठरेल.’ जोगांनी तत्कालीन गाजलेल्या नवीन नाटक, कादंबऱ्या, काव्यसंग्रह, कथा ह्यांविषयी समीक्षकाच्या दृष्टीने आपले अभिप्राय व्यक्त केले आहेत. ‘दीपस्तंभ’मध्ये व्यक्त झालेल्या जोगांच्या विचारानुसार ‘समीक्षा हीपण एक साधनाच असते... निर्भयपणा, कलाकृतीच्या निर्मितीच्या स्वरूपाची जाण, भावजीवनाविषयी सहानुभूती हे गुण समीक्षकापाशी असले, तर लेखक त्याच्या मताची कदर करायला तयार असतात... सदोष कलाकृतीही चांगल्या असू शकतात. गेल्या १०-१२ वर्षांत (सुमारे १९५८-१९७०) मराठी साहित्यात किती बदल झाला आहे; नवे कसे, कोणते अवतरले आहे; याचा अस्पष्ट आलेख छोट्या समीक्षाग्रंथांत आढळू शकेल.’

‘श्रेष्ठ कलाकृतीचा एक निकषच असा असतो की, प्रत्येक वाचनाचे वेळी त्यातून नवे विचारधन व सौंदर्यकण मिळत जातात.’ असे जोगांचे मत आहे. उपरोक्त पुस्तकांव्यतिरिक्त ‘लावण्य क्षितिजे’ (१९८१), ‘अरूपाचे रूप’ (१९७८) व ‘संत नामदेव’ (१९७०) ही पुस्तकेही जोग यांनी लिहिली आहेत. 

- वि. ग. जोशी

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].