Skip to main content
x

जोग, रामचंद्र श्रीपाद

      रामचंद्र श्रीपाद जोग यांचा जन्म गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे झाला. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे संपन्न झाले. तर एम.ए.ची पदवी मुंबई विद्यापीठातून प्राप्त झाली. साहित्य सेवेला काव्य-लेखनाने प्रारंभ झाला. सुरुवातीला ‘निशिगंध’ या नावाने त्यांनी काव्य रचना केली. ‘ज्योत्स्नागीत’ (१९२६), ‘निशागीत’ (१९२८), ‘साराच वेडेपणा’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.

जोगांचा खरा परिचय साहित्यक्षेत्राला झाला तो त्यांच्या ‘अभिनव काव्यप्रकाश’ (१९३०) या ग्रंथामुळे होय. या ग्रंथात जोगांनी इंग्रजी साहित्य, इंग्रजी साहित्यशास्त्र व मानसशास्त्र यांची जोड देऊन जुन्या संस्कृत-साहित्यशास्त्राचे संस्करण केले व अर्वाचीन वाङ्मयनिर्मितीच्या रसग्रहणाला आणि मूल्यमापनाला समर्थ ठरेल अशी अभिनवता साहित्य-विचाराला प्रदान केली. या ग्रंथामुळे मराठी साहित्य विचाराचा पाया घातला गेला. संस्कृत आणि पाश्चिमात्त्य साहित्यशास्त्राचे मंथन करताना जोगांनी कसल्याही प्रकारचा अभिनिवेश न बाळगता, समतोल दृष्टी ठेवून निष्कर्ष काढले. त्यामुळेच चिकित्सेनंतर योग्य म्हणून ‘वाक्यं रसात्मकं काव्यं’ हे विश्वनाथाने केलेले काव्यलक्षण किंवा ‘ल्हादैकमयता’ हे मम्मटाने मानलेले काव्यप्रयोजन यांचा त्यांनी स्वीकार केला. रससंकल्पनेचा जोरदार पुरस्कार करताना, रससंख्येच्या बाबतीत आग्रह धरणे मात्र त्यांनी अनाठायी ठरविले. संस्कृत साहित्यशास्त्राचा प्रगाढ व्यासंग असतानाही त्यात सारे काही आहे, असा हट्टाग्रह त्यांनी कधी बाळगला नाही.

जुन्या काव्यशास्त्राचे अवगाहन करताना, साहित्य आणि ललित कला यांच्यामधील भर्तृहरी, दंडी, अभिनवगुप्त यांसारख्या विद्वानांच्या ध्यानी आली असली, तरी साहित्य आणि ललित कला यांचा एकत्र असा सर्वांगीण विचार आपल्याकडे अजून झालेला नाही, ही जाणीव जोगांना झाली. त्यातूनच ‘सौंदर्यशोध आणि आनंदबोध’ हा त्यांचा ग्रंथ सिद्ध झाला. ‘ललित वाङ्मय अथवा साहित्य ही एक ललित कला आहे. इतर ललित कलांचा आद्य हेतू ज्याप्रमाणे सौंदर्यशोधन, सौंदर्यदर्शन व सौंदर्यवर्णन असा आहे, तसाच तो साहित्याचाही आहे. इतर ललित कलांमधून जे काही सौंदर्यविषयक सामान्य सिद्धान्त प्रत्ययास येतात, तेच साहित्य-कलेमध्येही या ना त्या स्वरूपात दिसून येतात.’ असे अर्वाचीन साहित्यशास्त्राला मान्य असलेले प्रतिपादन त्यांनी या ग्रंथातून केले आहे. त्यांच्या विचारामध्ये सौंदर्यसाधनेला अग्रस्थान आहे. सत्य आणि शिव या मूल्यांचा विचार सौंदर्योपासनेच्या संदर्भातच केला पाहिजे, असे आग्रही मत त्यांनी मांडले. ‘वाङ्मयामध्ये आरुष बोलांपेक्षा आणि उघड्यानागड्या अभिव्यक्तीपेक्षा रसिक अक्षरांना मी अधिक महत्त्व देतो हे कबूल केलेच पाहिजे,’ असे म्हणून ‘सत्यं ब्रुयात ललितं ब्रुयात’ या भूमिकेचा त्यांनी पुरस्कार केला. कलेचे स्वातंत्र्य मान्य करून खरा काव्यानंद निःस्वार्थ, अपार्थिव व म्हणून उदात्त स्वरूपाचा असतो आणि त्याकरताच या आनंदाचा आस्वाद घेतला पाहिजे; असे त्यांनी निःसंदिग्धपणे सांगितले.

‘काव्यविभ्रम’ (१९५१) या ग्रंथातील अलंकारावरील त्यांचे विवेचन स्वतंत्र प्रज्ञेचे द्योतक आहे. त्यांनी अलंकारांना काव्यशरीरावरील उपरे, बाह्यपदार्थ न मानता काव्यशरीरावरचे ते विभ्रम कसे आहेत, ते सप्रमाण पटवून दिले. ‘मराठी वाङ्मयाभिरुचीचे विहंगमावलोकन’ (१९५९) या त्यांच्या व्याख्यानमालेत त्यांनी सहाशे-सातशे वर्षांतील मराठी वाङ्मयाचे विहंगमावलोकन केले. त्यात संस्कृत काव्यशास्त्राला अभिप्रेत असलेल्या औचित्यविचाराचा दंडक त्यांनी वापरला. ‘वाङ्मयात मी रसाला महत्त्व देतो व त्याबद्दलचा ज्ञानेश्व रकाळातील आग्रह पुढील काळात सुटला म्हणून वाङ्मयाभिरुचीची पदवी खाली आली’ असा निष्कर्ष त्यांनी मांडला. ‘अर्वाचीन मराठी काव्य’ (१९४६), ‘केशवसुत काव्यदर्शन’ (१९४७), ‘चर्वणा’ (१९६०), ‘मराठी कविता’ (१९४५-१९६०), ‘दक्षिणा’ (१९६७), ‘विचक्षणा’ (१९६३), ‘समग्र माधव जूलियन’ (संपादन १९७७) हे त्यांचे इतर ग्रंथही महत्त्वाचे आहेत.

मराठी साहित्य परिषदेच्या वाङ्मयेतिहासाचे तीन खंड त्यांनी संपादित केले (खंड क्र. ३, ४ व ५). एवढेच नव्हे तर या कार्यासाठी स्वतः पाच हजार रुपयांचे अनुदानही त्यांनी दिले. शं.ग.दाते सूचिमंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळून त्यांनी सूचिकार शंकर गणेश दाते यांच्या अर्धवट कार्याची पूर्तता केली, तसेच १९६०सालच्या ठाणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

संस्कृत साहित्यशास्त्राच्या प्रगाढ व्यासंगातून साहित्य व इतर ललित कलांचा अनुबंध तपासून, शुद्ध वाङ्मयीन भूमिकेतून साहित्यातील सौंदर्याचा वेध घेणारे, साहित्यातून प्राप्त होणार्‍या आनंदाची मीमांसा करणारे, मर्मज्ञ समीक्षक म्हणून रा.श्री. जोग यांचे स्थान साहित्यविचारक्षेत्रात अढळ आहे.  

- डॉ. संजय देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].