Skip to main content
x

जोशी, अनंत मनोहर

जोशी, अंतूबुवा

   पं. अनंत मनोहर जोशी ऊर्फ अंतूबुवांचा जन्म औंध संस्थानातल्या किन्हई या गावी झाला. त्यांचे वडील मनोहरबुवा जोशी यांचा आवाज गोड होता. ते भजने छान म्हणत. त्यांच्या गायनामुळे सांगलीच्या संस्थानिकांनी त्यांना गणपती देवस्थानाच्या सेवेसाठी  नेमले. ते सांगलीस राहू लागले. तिथे गाण्याच्या मैफलीत ते नेहमी शेवटी गायचे. कारण त्यांच्या गोड गायनामुळे त्यांच्यानंतर कुणाच्या गायनाचा रंग जमत नसे. त्यांच्या कीर्तीमुळे औंधच्या संस्थानिकांनी त्यांना सन्मानपूर्वक परत बोलावून घेतले होते. लहानगा अनंत फक्त सात वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याची आई त्याला घेऊन पुन्हा मूळ गावी किन्हईला परतली. अनंताचे तिथे थोडेबहुत शालेय शिक्षण झाले. देवस्थानाचे गायक बापूराव अयाचित हे छोट्या अनंताचे प्रथम गुरू. मुलाची गायनातील प्रगती अतिशय चांगली आहे हे सर्वांनाच जाणवू लागले. मग त्याच्या शालेय शिक्षणाचा फारसा विचार न करता आईने त्याला मिरजेच्या महादेवबुवा गोखल्यांची तालीम द्यायचे ठरवले. पण मिरजेत गेल्यावर समजले की गोखलेबुवा स्वतःच्या मुलांनाच शिकवतात. त्याच सुमारास पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर ग्वाल्हेरहून विद्या संपादून मिरजेला परतले होते. त्यांनी अनंताला शिकवण्याची तयारी दाखविली.
अनंताला औंध दरबाराकडून थोड्या प्रमाणात शिष्यवृती मिळत होती. पं. विष्णू दिगंबर पलुसकर आणि गुंडूबुवा इंगळे हेही त्या वेळी बाळकृष्णबुवांकडे शिकत असत. अनंतराव १८८८ ते १८९६ अशी सलग तालीम घेऊन पं. विष्णू दिगंबरांबरोबर बाहेरगावी गायन करण्यासाठी निघाले. दोन वर्षे फिरती करून पुन्हा पं. बाळकृष्णबुवांकडे ते तालीम घेऊ लागले. गुरुजी त्या वेळी इचलकरंजी संस्थानात होते, त्यामुळे ही तालीम तेथे चालू राहिली. औंधच्या महाराजांचे निधन झाल्यावर ते उस्ताद रहिमत खाँ यांच्या साथीला तंबोऱ्यावर बसू लागले. उस्तादजी साताऱ्यास होते व नंतर गायनासाठी फिरतीवर जात असत. त्यांना १९०७ सालापर्यंत उस्तादांची तालीम मिळत होती.
अंतूबुवा शुद्ध ग्वाल्हेर घराण्याची गायकी गात. शिवाय रहिमत खाँसाहेबांचे वळण त्यांच्या गायकीत होते. आलापांची लय, तानप्रक्रिया ही सर्व ग्वाल्हेरी वळणाची होती. ख्याल, तराना व कधीतरी सरगम हे प्रकार ते गात असत. त्यांचे गायन जोमदार, प्रभावशाली होते. त्यानंतर अंतूबुवांनी गृहस्थाश्रम स्वीकारायचे ठरवून १९०७ साली मुंबईत ‘श्री गुरुसमर्थ गायन वादन विद्यालय’ नावाची संस्था स्थापन केली. विद्यालय १९२० सालापर्यंत साधारणपणे चालू राहिले. छान जम बसला. त्यांचे चिरंजीव पं. गजाननबुवा जोशी, रातंजनकर, वसंतराव कुलकर्णी, निंबर्गी, चौगुले,
  गोखले, गोडबोले हे त्यांचे शिष्य होत. मथुरेच्या वास्तव्यात अंतूबुंवांनी ब्रजभाषेचाही उत्तम अभ्यास केला. त्यांनी रचलेल्या ‘एरी मालनिया गुंदे लावो’ (छायानट), ‘ननदिके बचनवा’ (यमन), ‘रैन कारी डरावन’ (मालगुंजी) अशा अनेक उत्तम बंदिशींत गायकीचा ढंग व साहित्यिक मूल्यही दिसते. त्यांनी ‘संगीत प्रवेश’- तीन भाग आणि ‘हार्मोनिअम डिलायटर’- दोन भाग अशी पुस्तके लिहिली. 
                         

प्रथम महायुद्ध, फ्लूची साथ, नंतर पत्नी व तीन मुलांचा मृत्यू या सर्व गोष्टींमुळे १९२९ साली ते विरक्त झाले. याच सुमारास गुरू शिवानंद स्वामी यांच्याशी त्यांची भेट झाली. पुढे रसिक श्रोत्यांच्या आग्रहास्तव विरक्तपणातून ते १९४७ च्या सुमारास बाहेर आले. सहासष्टाव्या वर्षी त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावरून गायन केले. त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला. अंतूबुवांचे डोंबिवली येथे निधन झाले.

डॉ. सुधा पटवर्धन

 

जोशी, अनंत मनोहर