Skip to main content
x

जोशी, चिंतामण विनायक

     चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म पुणे येथे झाला. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयामधून १९०९ मध्ये मॅट्रिक व १९१३ मध्ये फर्गसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान हा विषय घेऊन ते बी. ए. झाले. दोन वर्षांनी पाली व इंग्रजी हे विषय घेऊन ते एम.ए. झाले. पालीचे गाढे विद्वान प्राध्यापक धर्मानंद कोसंबी यांचे विद्यार्थी असणार्‍या जोशी यांच्यावर त्यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. पालीच्या अभ्यासाद्वारे बौद्ध धर्माचाही परिणाम त्यांच्या मनावर झाला होता. जोशी यांचे वडील विनायकराव हे चौदा वर्षे ‘सुधारक’ पत्राचे संपादक होते. ‘सुधारक’ पत्र कर्जबाजारी झाले, त्या वेळी पत्नीचे दागिने विकून त्यांनी काही कर्ज फेडले होते. जोशींच्या मालकीच्या वडिलार्जित विष्णुमंदिरात लहानपणी जोशी यांनी बरीच कीर्तने ऐकली. कीर्तनांमुळे पुराण कथांशी व प्राचीन वाङ्मयाशी त्यांचा परिचय झाला. त्यांना वाचनाची अनावर आवड होती.

     कथाकार गो. गं. लिमये व ना. गं. लिमये या दोन मामांच्या साहाय्याने जोशींनी १९०५ साली ‘तरवार’ नावाचे हस्तलिखित वर्तमानपत्र काढले व तीन वर्षे चालविले. त्यात गोष्टी, चुटके वगैरे मनोरंजक विभाग लिहिण्याचे काम जोशींकडे असे. इंग्रजी पाचवीत असताना ‘संपादन व न्हावी’ या नावाचा गमतीदार लेख त्यांनी लिहिला. तो पुढे पाच वर्षांनी महाविद्यालयाच्या त्रैमासिकात प्रसिद्ध झाला. १९२६ पर्यंत गंभीर व विनोदी अशा दोन्ही प्रकारचे लेखन करणार्‍या जोशींनी मासिकांकडून विनोदी लेखांचीच मागणी सातत्याने येत राहिल्यामुळे विनोदी साहित्य निर्मिती केली. मूळ गंभीर प्रकृतीचे जोशी वयपरत्वे अधिक गंभीर होत गेले, तरी त्यांच्या विनोदी लेखनाच्या निर्मितीत खंड पडला नाही. असामान्य प्रतिभेचे, विशाल मनोवृत्तीचे व अस्सल मराठी गद्याचे निर्माते जोशी हे अहमदाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत वि.द.घाटे यांच्याकडून ते पराभूत झाले.

     जोशी यांच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात अमरावतीला शिक्षक म्हणून झाली. १९१८ साली ते रत्नागिरी हायस्कूलमध्ये गेले. १९२० मध्ये बडोदा येथील महाविद्यालयात आरंभी इंग्रजीचे-मराठीचे व नंतर पालीचे अध्यापन ते करू लागले. १९२८ पासून बडोदा सरकारने त्यांची नेमणूक राजदप्तरदार (डायरेक्टर ऑफ अर्काइव्हज) म्हणून केली. महाविद्यालयात पूर्णवेळ शिकविणारे जोशी १९२९ नंतर मात्र फक्त बी. ए., एम. ए. च्या विद्यार्थ्यांना पाली शिकवीत. १९४९ साली सेवानिवृत्त होऊन ते पुण्यास परतले. पाली भाषेच्या अभ्यासातून त्यांनी काही ग्रंथरचना केली, शिवाय परदेशातील नियतकालिकांतूनही त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. पालीतील पुराण ग्रंथांचे संशोधन व संकलन करणारे व्यासंगी अभ्यासक म्हणूनही त्यांना किर्ती लाभली. ‘जातकातील निवडक गोष्टी’ किंवा ‘मॅन्युअल ऑफ पाली’ अशी परिचयात्मक पुस्तके त्यांनी लिहिली. ‘शाक्यमुनी गौतम’ (१९३५), ‘बुद्ध संप्रदाय व शिकवण’ (१९६३) हे ग्रंथ व ‘सयाजीराव महाराज गायकवाड’ यांचे चरित्र यांनी लिहिले.

     वडिलांच्या निधनामुळे अपुरी राहिलेली ‘प्रवरा’ ही कादंबरी त्यांनी पुरी केली. याखेरीज ‘कर्मवीर परशुराम’ (१९४५), ‘चित्रकार पिंपळखरे’ (१९५९) ही चरित्रे; ‘बालयोगी’ (१९६४) ही कादंबरी; ‘वडाची साल पिंपळाला’ (१९५७), व ‘त्रिसुपर्ण’ (१९६२) ही नाटके; ‘देवनगरच्या पंचक्रोशीत’ (१९३६) हे स्थलवर्णन अशी वैविध्यपूर्ण साहित्य निर्मिती त्यांनी केली असली, तरी जोशी हे नाव समस्त मराठी वाचकांना विनोदी लेखक म्हणूनच सुपरिचित आहे. ‘सत्याचे प्रयोग’, ‘लग्न पहावं करून’, ‘सरकारी पाहुणे’ हे त्यांचे हास्यरसप्रधान बोलपट गाजले आहेत. १९४२ साली त्यांनी उज्जैनी येथील मध्यभारत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.

     ‘एरंडाचे गुर्‍हाळ’ (१९३०), ‘चिमणरावाचे चर्‍हाट’ (१९३३), ‘वायफळाचा मळा’ (१९३४), ‘आणखी चिमणराव’ (१९४०), ‘नवे भारूड’ (१९४२), ‘स्टेशन मास्तर’ (१९४३), ‘मोरू आणि मैना’ (१९४३), ‘नटश्रेष्ठ’ (१९४४), ‘संचार’ (१९४५), ‘लंकावैभव’ (१९४७), ‘गुंड्याभाऊ’ (१९४७), ‘द्वादशी’ (१९४८), ‘गुदगुल्या’ (१९४८), ‘संशयाचे जाळे’ (१९४९), ‘आमचा पण गाव’ (१९५२), ‘तिसर्‍यांदा चिमणराव’ (१९५२), ‘राहाट गाडगं’ (१९५५), ‘गाळीव रत्ने’ (१९५५), ‘ओसाडवाडीचे देव’ (१९५५), ‘पाल्हाळ’ (१९५६), ‘हापूसपायरी’ (१९५६), ‘प्रवरा’ (१९५७), ‘बाबाचा बगीचा’ (१९५७), ‘चौथे चिमणराव’ (१९५८), ‘आरसा’ (१९५९), ‘थोडे कडू थोडे गोड’ (१९६०), ‘हास्यचिंतामणी’ (१९६१), ‘मेषपात्रे’ (१९६१), ‘बोरी बाभळी’ (१९६२), ‘बायकोचा मुलगा’ (१९६२), ‘वैकुंठाचे द्वारी’ (१९६३), ‘घरबशे व पळपुटे’ (१९६४), ‘विनोद चिंतामणी’ (१९८०) ही त्यांची विनोदी पुस्तके सर्व परिचित आहेत.

     ‘हास्यचिंतामणी’ या आपल्या पंचवीस निवडक कथांच्या स्वसंपादित संग्रहाला प्रस्तावना लिहिताना जोशी यांनी हास्य व विनोद यांच्यासंबंधी मांडलेले विचार महत्त्वाचे आहेत. त्यांच्या मतानुसार विनोदाचा संबंध हास्याशी आहे. विनोदामुळे हास्य उत्पन्न होते, परंतु विनोदाशिवाय दुसर्‍याही अनेक कारणांनी हास्योत्पत्ती होते. कृत्रिम कारणांनी आणले जाणारे हसू, शारीरिक विकारांमुळे येणारे हसू, आनंदजन्य हास्य व कृत्रिम हास्य असे हास्याचे चार प्रकार ते करतात. हास्यभावना ही बुद्धीबरोबर उगम पावते, याचा अर्थ प्रत्येक बुद्धिमंताला परिणत हास्यभावना असतेच असे मात्र नाही, ती नैसर्गिक देणगी आहे. अहंमन्यांची घसरगुंडी हा एक महत्त्वाचा हास्यविषय आहे.

     विनोद हे हास्याचे कारण असते. अभावित आणि भावित असे त्याचे दोन भेद आहेत. मुद्दाम कृतीने, बोलण्याने किंवा लिहिण्याने जो केलेला नसतो पण योगायोगाने हास्यकारक प्रसंग निर्माण होतो त्या हास्यकारणाला ‘अभावित विनोद’ असे नाव आहे. जसा विनोद आपोआप निर्माण होऊ शकतो तसा तो मुद्दामही निर्माण करता येतो. ‘विनोद करणे’ हा शब्दप्रयोग जुना आहे. कायिक, शाब्दिक, प्रसंगनिष्ठ, बुद्धिनिष्ठ, भावनिष्ठ, स्वभावनिष्ठ असे विनोदाचे विविध प्रकार त्यांनी सांगितले आहेत. भावनिष्ठ विनोदाची पायरी बुद्धिनिष्ठ विनोदापेक्षा वरची आहे. भावनिष्ठ विनोदात स्वभावनिष्ठ विनोदाचा अंतर्भाव करता येईल. भंपकपणा, विसंगतिदर्शन, पर्यायवचन, विरोधदर्शन, अतिशयोक्ती यांमुळेही हास्योत्पत्ती होते. भोळी माणसे हा विनोदाचा लोकप्रिय विषय होय, या स्वरूपाची हास्यविनोदाविषयीच्या विचारांची मांडणी जोशी करतात.

     ही हास्यविनोदमीमांसा करणार्‍या जोशी यांच्या कथांतून मराठी कथेतील पहिले ठसठशीत विनोदरूप प्रकटते. कोल्हटकरांनी आणि गडकर्‍यांनी बंडूनाना, पांडूतात्या, बाळकराम ही व्यक्तिचित्रे निर्माण केली, त्याप्रमाणे जोशी यांनी ‘चिमणराव’ हा त्यांचा ‘शेकडो शंभरातला एक’ असा मानसपुत्र निर्माण केला. भालचंद्र नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे ‘चिं. वि. जोशी यांनी अत्यंत गंभीर प्रकृतीचा आशय मांडणार्‍या विनोदातून नवा प्रतिनायक निर्माण केला आणि मराठी गद्यात लुप्त झालेली प्रसन्न निवेदन पद्धती रूढ केली. त्यांच्या चिमणरावांसारखा जबरदस्त अँटिहिरो मराठीत झालाच नाही.’ ‘चिमणरावाचे चर्‍हाट’ हे त्यांचे विनोदी लेखन मराठी साहित्यातील मानदंडाच्या स्वरूपात स्वीकारले गेले आहे. ‘चिमणरावाचे चर्‍हाट’ ही विनोदी प्रसंगमालिका की विनोदी नाट्य-कथामाला की व्यक्तिविशिष्ट विनोदी कादंबरी याचा निर्णय करणे अवघड आहे.

     चिमणराव हा सामान्य तरीही असामान्य आहे, त्याचे व्यक्तिमत्त्व सदैव ताजे, टवटवीत राहणारे आहे. मध्यमवर्गीय जीवन वास्तवाचे सलग व प्रभावी दर्शन अत्यंत खेळकर पद्धतीने जोशी यांच्या साहित्य विश्वातून घडते. ‘रावसाहेब चिमणराव स्टेट गेस्ट’, ‘स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग’, ‘गुंड्याभाऊचे दुखणे’, ‘कालाय तस्मै नमः’, ‘सौजन्य सप्ताह’, ‘प्रामाणिकपणाविषयी आजीबाई’, ‘माझे दत्तक वडील’ यांसारख्या अनेक कथा या संदर्भात आठवतात. कथेच्या स्वयंपूर्ण रूपात चिमणराव, गुंड्याभाऊ आणि त्यांच्या परिवारातील सार्‍या माणसांचे, त्यांच्या कौटुंबिक जीवनाचे, त्यांच्या ध्येयादर्शांचे, ते ज्या समाजाचे घटक होते, त्यातील नीतिसंकेतांचे, अनेक पदरी मानवी संबंधांचे प्रगाढ भान जोशी यांनी व्यक्त केले आहे.

     जीवन व्यवस्थेतील असमानतेचा निषेध करण्याचे कार्य ज्याप्रमाणे विनोदामार्फत होत असते, त्याप्रमाणे जीवन स्वीकाराचा, परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्याचा, सामोपचाराचा मार्गही विनोदाद्वारे खुला होतो. चिमणरावाच्या कथांमधून सर्व मानवी विसंगतींसह, मर्यादा-दोषांसह जगण्याची क्षमता देणारा विनोद अवतरला आहे. मानवी स्वभावातील विसंगती सूक्ष्मपणे हेरण्याची वृत्ती, घरगुती भाषा आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात हरघडी दिसेल अशी हास्यास्पदता सहज रीतीने दाखवून देण्याची हातोटी या वैशिष्ट्यांमुळे जोशी यांचा विनोद लोकप्रिय ठरला. खास महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय समाज व संस्कृती यांच्या मार्मिक निरीक्षणातून निर्माण झालेल्या अस्सल विनोदाची देणगी जोशी यांनी मराठी साहित्याला दिली. मर्यादायुक्त माणसांच्या जीवनाची वाटचाल सुखकर व्हावी, अशी प्रबल आंतरिक इच्छा आणि निरोगी, संपन्न व सुखी समाजाचे स्वप्न हे दोन्ही जोशी यांच्या कथात्मक साहित्यातून प्रकटतात.

     - प्रा. डॉ. विलास खोले

जोशी, चिंतामण विनायक