Skip to main content
x

जोशी, दत्तात्रय केशव

त्तात्रेय केशव जोशी यांच्या जन्म व मृत्यू यांचे निश्चित तपशील उपलब्ध नाहीत. ते पुण्याचे रहिवासी होते. ते १८९६ साली पुण्यात नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीत रुजू झाले. तेव्हापासूनच त्यांनी गायनाची कला व शास्त्र या दोहोंचा अभ्यास सुरू केला. प्रसिद्ध गायक गणपतीबुवा भिलवडीकर यांच्याकडे ते सात वर्षे गायन शिकले. हरिभाऊ आपटे यांच्या मध्यस्थीने १९०५ पासून ते ‘पुणे गायन समाजा’चे मानद सचिव झाले. सदर संस्थेचे काम त्यांनी नेटाने पाहिले. पुढे बलवंतराव सहस्रबुद्धे यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी संस्था सोडली.
त्यांचा १९१० पासून पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याशी परिचय झाला व त्या दोघांमधील स्नेह शेवटपर्यंत राहिला. पं. भातखंडे व जोशी हे परममित्र व सहयोगी बनले. ग्वाल्हेर घराण्याच्या, भिलवडीकरबुवा यांच्याकडून शिकलेल्या चारशे बंदिशींचे स्वरलेखन जोशी यांनी केले. या बंदिशी १९१२ साली भातखंडे यांना दिल्या. त्यांचा समावेश भातखंडे यांनी ‘क्रमिक पुस्तक मालिके’त केला. सदर चारशे अस्सल बंदिशी प्रसिद्धीसाठी उपलब्ध करून देऊन बंदिशींचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जोशी यांनी केले.
संगीताचे एक शास्त्रकार म्हणूनही जोशी यांचे योगदान महत्त्वाचे आहे. अनेक संगीत परिषदांमध्ये त्यांनी संगीतविषयक शोधनिबंधांचे वाचन केले. ‘दहाव्या शतकानंतर रागगायन विकसित झाले, तेराव्या शतकापर्यंत श्रुती हे ध्वनिमापनाचे साधन समप्रमाण होते, तसेच या शतकापर्यंत भारतभरात एकच संगीतपद्धती प्रचलित होती, सध्याचे बिलावलचे सप्तक तानसेनच्या काळात मुख्य स्वरसप्तक म्हणून प्रचारात आले’, अशी संगीताच्या इतिहासासंदर्भातील काही महत्त्वपूर्ण प्रमेये त्यांनी मांडली.
जोशी यांनी ‘रागलक्षण’ व नारदकृत ‘चत्वारिंशच्छतरागनिरूपणम्’, (१९१४), लोचनपंडितकृत ‘रागतरंगिणी’, श्रीनिवासपंडितकृत ‘रागतत्त्वविबोध’, पुंडरिक विठ्ठलरचित ‘रागमंजिरी’, हृदयनारायणदेवविरचित ‘हृदयप्रकाश व हृदयकौतुकम्’, व्यंकटमखीकृत ‘चतुर्दण्डिप्रकाशिका’ (१९१८), संगीतराय भावभट्टविरचित ‘अनुपसंगीतरत्नाकर व अनुपसंगीतांकुश’ (१९१९), ‘अनुपसंगीतविलास’ (१९२१) हे संगीतविषयक संस्कृत ग्रंथ संपादित करून प्रसिद्ध करण्याचे मोलाचे कार्यही केले. या संस्कृत ग्रंथाच्या उपलब्धतेमुळे संगीत क्षेत्रातील संशोधन सुरू झाले व संगीतशास्त्रात मोठी भर पडली. भातखंडे यांनी १९२० साली ‘क्रमिक पुस्तक मालिका’ प्रसिद्ध केली, त्यांचे संपादनही जोशी यांनी केले. त्यांनी ‘रागकोश’, ‘हिंदुस्थानी संगीत प्रकाश’ ही पुस्तकेही स्वतंत्रपणे लिहिली.
दत्तात्रेय जोशी यांनी केतकरांच्या मराठी ज्ञानकोशासाठीही लेखन केले होते. या ज्ञानकोशात संगीत, राग, ताल, वाद्य, वृंदसंगीत अशा विषयांवर त्यांनी लेख लिहिले, तसेच ‘महाराष्ट्र शब्दकोशा’साठी सुमारे अठराशे संगीतविषयक संज्ञांचे लेखन विनामूल्य
  केले. मराठी भाषेतील संगीतविषयक शास्त्रलेखनात त्यांनी ही मोलाची भर घातली आहे. संगीताच्या इतिहासाचे संपादन करून तो प्रकाशात आणण्याचे कामही दत्तात्रेय जोशी यांनी केले. 
पं. भातखंडे यांच्या विनंतीवरून लखनौच्या ‘मॉरिस म्युझिक महाविद्यालया’त ते दोन वर्षे उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते. तेथे शास्त्र व गायन यांच्या प्रात्यक्षिक वर्गांना त्यांनी शिकविले. पुण्यातील हिंगणे येथील महर्षी कर्वे यांच्या स्त्री-शिक्षण संस्थेसाठी त्यांनी संगीताचा अभ्यासक्रम आखून दिला. तेथे दोन वर्षे विनामूल्य व्याख्याने दिली व अनेक वर्षे परीक्षक म्हणूनही काम पाहिले. संगीत शिक्षणाच्या संदर्भात त्यांचे हे नि:स्वार्थी कार्य दखल घेण्याजोगे आहे.
व्यवसायाने वकील असणारे त्यांचे पुत्र लक्ष्मण जोशी यांनी त्यांच्या संगीतकार्याचा वारसा काही अंशी चालवला. त्यांचे १९३५ साली ‘संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

चैतन्य कुंटे

जोशी, दत्तात्रय केशव