जोशी, विठ्ठल गणेश
अक्कलकोट स्वामींचे प्रत्यक्ष ‘अवतार’ असलेल्या रावसाहेब तथा बाबामहाराज सहस्रबुद्धे यांच्या समर्थ शिष्यवर्गातील एक अग्रणी शिष्योत्तम म्हणजे विठ्ठल गणेश जोशी ऊर्फ ‘दिगंबरदास महाराज’ होत. विठ्ठल जोशी यांचे घराणे वैदिकनिष्ठ व धर्मपरायण असून त्यांचे मूळ गाव गणपती पुळे जवळील ‘वरवडे’ होते. हे घराणे पुढे पोमेंडी येथे स्थलांतरित झाले. या पोमेंडी गावातच अश्विन शुद्ध अष्टमीच्या दिवशी विठ्ठल यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव जानकी होते. त्यांना कृष्णाबाई नावाची सावत्र आई होती.
विठ्ठल जोशी यांचे प्राथमिक शिक्षण पोमेंडीत, तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरीत झाले. त्यांना शिक्षणाची फारशी आवड नव्हती. लहान वयातच त्यांना जलोदराचा आजार झाला व केवळ देवकृपेनेच त्यांचा पुनर्जन्म झाला. या काळात त्यांच्या आजीने नातवासाठी दिवसरात्र जागून घराण्यातील उपास्य दैवत मारुतीची उपासना केली. ही घराण्याची मारुती उपासना पुढे विठ्ठल जोशी यांना लाभली. लहानपणापासूनच त्यांना श्रीराम, मारुती, विठ्ठल अशी देव-देवतांच्या पूजेची आवड होती. त्यांना व्यायामाचीही भारी आवड होती.
पुढे त्यांच्या जीवनात दत्तोपासनेचा उदय झाला व ते एकनिष्ठ दत्तभक्त झाले. शालेय जीवनातच त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले. रत्नागिरीत वीर सावरकरांची त्यांनी दर्शन-भेट घेतली व त्यांच्या मनातील राष्ट्रभक्ती अधिक जाज्वल्य, प्रखर झाली. शालेय शिक्षणाच्या काळातच विठ्ठल जोशी गुरूच्या शोधार्थ घरातून पळून गेले. भटकत भटकत ते नाशिकला श्री बीडकर महाराजांच्या मठात गेले. तेथे बीडकर महाराजांचे परमशिष्य रावसाहेब तथा बाबा सहस्रबुद्धे यांनी छोट्या विठ्ठलाला पाहून त्यांनी विचारले, ‘‘काय विठ्ठला, घरी न सांगताच पळून आला का?’’ एका अपरिचित व्यक्तीने आपणांला नावासह हाक मारली व काहीही माहिती नसताना घरातून न सांगता पळून आल्याचे ओळखल्याचे छोट्या विठ्ठलाला खूप आश्चर्य वाटते. दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि हेच आपले गुरू, आपण यांचाच शोध घेण्यासाठी बाहेर पडलो होतो याची जाणीव छोट्या विठ्ठलला झाली. त्याने मनोमन रावसाहेबांना गुरुस्थानी मानले. त्यांच्या उपदेशानुसार विठ्ठल पुनश्च रत्नागिरीला तृप्त मनाने परतला. त्याने जमेल तेव्हढे शिक्षण पूर्ण केले. नोकरीसाठी ते कल्याणला मावशीकडे गेले. तेथे डॉ. बोस यांच्या औषध निर्मिती व विक्री कंपनीत विठ्ठलरावांना औषध विक्रेता (एम.आर.) म्हणून नोकरी मिळाली. त्यांनी १९३७ ते १९४६ अशी दहा वर्षे उत्तम प्रकारे नोकरी केली. पण १९४६ साली अचानक नोकरी सोडून ते पुनश्च रत्नागिरीला परतले.
दरम्यान, १९४२ मध्ये विठ्ठलराव यांची थोर सत्पुरुष रामचंद्र नरसिंह वहाळकर ऊर्फ दिगंबरदादा यांच्याशी भेट झाली. पुढे ४-५ वर्षे त्यांचा सहवासही लाभला. विठ्ठलरावांच्या अंतरंगात परमार्थाची - साधनेची ज्योत अधिक प्रखर झाली. १९४९ मध्ये पावस येथे त्यांची भेट स्वामी स्वरूपानंदांशी झाली. स्वामींची ‘अभंग ज्ञानेश्वरी’ पाहून ती ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याची जबाबदारी विठ्ठलराव यांनी घेतली. लोकवर्गणीतून ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथास विठ्ठलरावांची ‘सुमनांजली’ नावाची प्रस्तावना आहे. पुढे काही मुद्द्यांवर विठ्ठलरावांचे तेथे मतभेद झाले व ते पावसला रामराम करून पुनश्च रत्नागिरीला परतले.
२४ जुलै १९५३ हा दिवस विठ्ठलरावांच्या जीवनातील धन्यतेचा, कृतार्थतेचा दिवस म्हणून उगवला. या दिवशी पुणे येथे त्यांचे सद्गुरू रावसाहेब सहस्रबुद्धे यांनी आपली सर्पमुखी अंगठी व एक वळे आपल्या बोटातून काढून विठ्ठलरावांच्या बोटात घातली. जणू आपली शक्ती, आपला आशीर्वादच अंगठीच्या रूपाने विठ्ठलरावांना प्रदान केला. रावसाहेबांच्या आज्ञेने ते पुनश्च रत्नागिरीला परतले.
त्यानंतर १८ ऑगस्ट १९५४ रोजी सद्गुरू रावसाहेब सहस्रबुद्धे यांचे पुण्यात निर्वाण झाले. रावसाहेबांची कन्या निर्मला खरे (वर्धा) हिच्या नावावरील फर्ग्युसन रस्त्यावरील ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळील एक प्लॉट विठ्ठलरावांनी भाडेपट्ट्याने घेतला व त्या प्लॉटवर सद्गुरू रावसाहेबांचे समाधी मंदिर बांधले. सध्या या मंदिराशेजारीच विठ्ठलराव जोशी तथा दिगंबरदास यांचे समाधी मंदिर आहे.
हिंदुधर्मनिष्ठेप्रमाणेच जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा हे विठ्ठलरावांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे त्यांनी चिपळूणजवळ डेरवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनाचे दर्शन घडविणारी शिवसृष्टी उभी केली. इतर धार्मिक उत्सव व हिदूंचे सण सर्व महाराज मंडळी साजरी करतात.
छत्रपती शिवाजी जयंती उत्सव साजरा करण्याची पद्धत विठ्ठलरावांनी सुरू केली. आजही पुणे व डेरवण या दोन्ही ठिकाणी शिवजयंती उत्सव मोठ्या भव्यदिव्य प्रकारे साजरा केला जातो. सनातन वैदिक धर्मरक्षण, विश्वशांतियज्ञ, अनुष्ठाने यांप्रकारे त्यांनी प्रचंड राष्ट्रीय, धार्मिक व सामाजिक कार्य उभे केलेले आहे. त्यांनी डेरवण परिसराचा सर्वांगीण विकास उपक्रम हाती घेतला व विहिरी, शाळा, मोफत दवाखाना, शेतीचे प्रशिक्षण, जोडधंद्याची माहिती व आर्थिक मदत अशी अनेक प्रकारची कार्ये केली. त्यांच्या नावावर विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्यासंबंधीचा ‘तूचि बाप धनी’ हा ग्रंथ त्यांच्या समग्र जीवनाचे व कार्याचे शब्ददर्शन आहे. आपल्या कार्याची धुरा उत्तराधिकारी म्हणून मानसपुत्र अशोकराव ऊर्फ काकामहाराज यांच्यावर सोपवून विठ्ठलराव ऊर्फ दिगंबरदास महाराजांनी या जगाचा निरोप घेतला.