काळे, आशा रामकृष्ण
सोज्ज्वळ चेहऱ्यामुळे प्रामुख्याने कौटुंबिक आणि स्त्रीप्रधान भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री म्हणून आशा काळे परिचित आहेत. चित्रपट आणि रंगभूमी ही दोन्ही माध्यमे त्यांनी समर्थपणे हाताळली आणि दोन्ही कलाप्रांतात स्वत:ची खास ओळख निर्माण केली. या साऱ्या कलाप्रवासात त्यांनी काही निराळ्या भूमिकाही लक्षवेधी केल्या.
आशा रामकृष्ण काळे यांचा जन्म कोल्हापूरजवळच्या गडहिंग्लज परिसरात झाला. त्यांच्या मातोश्रींचे नाव विमल, तर वडिलांचे नाव रामकृष्ण दत्तात्रेय काळे असे होते. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापूर व पुणे या ठिकाणी झाले. पुढे अभिनयाच्या ओढीने त्या नाट्यसृष्टीकडे वळल्या, म्हणून त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. अगदी लहानपणापासून आशाताईंचा नृत्याकडे ओढा होता. त्या काळातील प्रसिद्ध नृत्यगुरू बाळासाहेब गोखले यांच्याकडे त्या रीतसर नृत्य शिकल्या आहेत. कथ्थक आणि भरतनाट्यम नृत्याचे स्वतंत्र कार्यक्रम सादर करण्याइतपत त्यांचे नृत्याचे शिक्षण झाले आहे. आशाताईंच्या आठवणीनुसार या नृत्यकलेनेच त्यांना रंगभूमीवर पहिली संधी मिळवून दिली. ‘शिवसंभव’ या नाटकात त्यांनी नृत्य सादर करून दाद मिळवली होती. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या पाहण्यात ते नाटक आले आणि त्यांनी आशाताईंना ‘तांबडी माती’ (१९६९) या स्वत:च्या चित्रपटात सर्वप्रथम नायिकेची भूमिका दिली.
पदार्पणाच्या चित्रपटातच आशाताईंनी अन्य निर्मात्यांचे व दिग्दर्शकांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान अनेक नाटकांतून मराठी रंगभूमीवरही आशा काळे हे नाव रसिकांच्या परिचयाचे झाले होते. नाटककार बाळ कोल्हटकर यांचे ‘सीमेवरून परत जा’ हे नायिका म्हणून आशा काळे यांचे पहिले नाटक. त्यानंतर ‘महाराणी पद्मिनी’, ‘बेइमान’, ‘विषवृक्षाची छाया’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘गुंतता हृदय हे’ अशा गाजलेल्या अनेक नाटकांतून त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.
एका नृत्यांगनेच्या रूपाने रंगभूमीवर त्यांचे पदार्पण झाले, तेव्हा त्यांनी ठुमरीवर नृत्य पेश केले होते. नंतरच्या काळात त्यांनी विविध चित्रपटांतूनही प्रसंगामध्ये नृत्य केले. पण चित्रपटातील त्यांची ओळख मात्र कौटुंबिक, सोज्ज्वळ, सोशिक नायिकेचीच राहिली. तुळशीवृंदावनाभोवती फेऱ्या मारणारी, वडाची पूजा करणारी, सासूचा छळ सोसणारी, काबाडकष्ट उपसणारी सून त्यांनी बहुतेक चित्रपटांतून उभी केली. अर्थात त्या काळात अशाच चित्रपटांचा प्रवाह होता. खास आशाताईंसाठी सोशिक सुनेच्या आणि खाष्ट सासूच्या, छळवादी आणि ढालगज नणंदेच्या भूमिका, प्रसंग लिहिले जात असत. ते प्रसंग व त्या भूमिका प्रेक्षकांपर्यंत समर्थपणे पोहोचवण्याचे काम आशा काळे यांनी आपल्या समृद्ध अभिनयाद्वारे केले.
‘सतीचं वाण’ (१९६९), ‘चुडा तुझा सावित्रीचा’ (१९७१), ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ (१९७७), ‘सासुरवाशीण’ (१९७८), ‘सतीची पुण्याई’ (१९८०), ‘थोरली जाऊ’ (१९८३), ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ (१९८४), ‘अर्धांगी’ (१९८५), ‘पुत्रवती’ (१९९६) हे त्यांचे सर्व गाजलेले आणि व्यावसायिकदृष्ट्याही यशस्वी ठरलेले चित्रपट, त्यांची हीच प्रतिमा अधोरेखित करणारे होते. सोशिकतेची मूर्ती या त्यांच्या प्रतिमेला संपूर्ण छेद देणारी वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका त्यांना दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांनी ‘हा खेळ सावल्यांचा’ (१९७६) या चित्रपटातून दिली. एरवी अंगभर नऊवारी साडीत वावरणाऱ्या सोज्ज्वळ आशाताई या चित्रपटातून एकदम शर्ट, पँट, टी-शर्ट अशा (त्या काळात) आधुनिक समजल्या जाणाऱ्या पोशाखात प्रेक्षकांसमोर आल्या, तेव्हा त्यांचा चाहता वर्गही दचकला होता. पण ही वेगळी भूमिकाही त्यांनी समरसून केली आणि त्यासाठी पुरस्कारही मिळवला. ‘गहिरे रंग’ या नाटकातही त्यांनी अशीच निराळी भूमिका केली होती. या नाटकात त्या स्कर्टमध्ये वावरल्या होत्या. त्यांच्या या सोज्ज्वळ प्रतिमेमुळे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले. सुमारे पन्नास चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.
रंगभूमीवरही त्यांनी हजारो प्रयोग केले. त्यापैकी ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाचे आशाताईंनी तब्बल ९०० प्रयोग केले आहेत. ‘गुंतता हृदय हे’ या नाटकात त्यांच्यासोबत नायकाच्या भूमिकेत डॉ. काशिनाथ घाणेकर होते. हे नाटक खूप गाजले. याशिवाय आशाताईंनी ‘हसत हसत फसवुनी’ या नाटकात चक्क विनोदी भूमिका केली होती. हे आशाताईंचे स्वत:चे आवडते नाटक आहे.
अनेक पुरस्कारांच्या रूपाने आशाताईंच्या चित्रपटातील व रंगभूमीवरील कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला आहे. ‘नाट्यव्रती पुरस्कार’, व्ही. शांताराम फाऊंडेशनचा ‘जीवनगौरव पुरस्कार’, ‘शांता आपटे सुवर्णपदक’ ही काही ठळक नावे घेता येतील.
- जयश्री बोकील