Skip to main content
x

काळे, किशोर शांताबाई

डॉ. किशोर शांताबाई काळे यांचा जन्म नेरले (ता. करमाळे, जिल्हा सोलापूर) येथे झाला. अंबाजोगाई महाविद्यालयात बारावी झाल्यावर किशोर काळे मुंबईला आले आणि १९९४ मध्ये एम.बी.बी.एस. झाले. नवी मुंबई नेरूळ येथील तेरणा मेडिकल महाविद्यालयात त्यांची नियुक्ती झाली. ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांची मुलगी संगीता हिच्याशी त्यांचा विवाह झाला.

गावोगावी नाचगाणी, सर्वसामान्य प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा कोल्हाटी समाजाचा व्यवसाय असून कुटुंब पोसण्याची जबाबदारी स्त्रियांना उचलावी लागते. वेळप्रसंगी कोल्हाटणीला शरीरविक्रय करावा लागतो. पुरुषप्रधान संस्कृतीत वाट्याला येणारे सर्व भोग स्त्रियांना मुकाट्याने सोसावे लागतात. किशोर काळे हे कोल्हाटी समाजातील शांताबाई नामक महिलेच्या पोटी जन्माला आले. जन्मदाता कोण हे ठाऊक असले, तरी त्याचे नाव लावण्यास मात्र प्रतिबंध होता. प्रस्थापित समाजाकडून अवहेलना सहन करावी लागते. समाजातील स्त्रियांचा उभा जन्म दुःख, यातना सोसण्यात संपून जातो. तारुण्य ओसरल्यावर स्त्रीला पशूसमान वागणूक मिळते. संवेदनशील किशोर काळे यांना  या समाजात राहताना विदारक अनुभव आले. काळीज पिळवटून टाकणार्‍या अनुभवांना सामोरे जावे लागले.

आपल्या या खडतर जीवनाची कहाणी त्यांनी ‘कोल्हाट्याचं पोर’ या आत्मचरित्रात तपशीलवार लिहिली आहे. १९९४ मध्ये प्रसिद्ध होऊन गाजलेल्या या आत्मकथनात समाजातील एका दुर्लक्षित भागाचे, दुखर्‍या नशीचे, अंगावर काटा उभा करणारे तपशीलवार चित्रण साकार झाले आहे. वडिलांच्या जागी आईचे नाव लावून एम.बी.बी.एस.पर्यंतचे शिक्षण घेणार्‍या डॉ. किशोर काळे यांच्या ‘कोल्हाट्याचं पोर’मध्ये या समाजाचे प्रातिनिधिक चित्र प्रथमच उभे राहिले आहे.

पुढल्या वर्षी म्हणजे १९९५ साली किशोर काळे यांच्या आत्मकथनाचा दुसरा भाग ‘मी डॉक्टर झालो’ प्रसिद्ध झाला. भटक्या जमातीत जन्मलेल्या पण शिक्षणासाठी एके ठिकाणी स्थिर राहिलेल्या डॉ. किशोर काळेंचा वैद्यकीय पदवी प्राप्त होईपर्यंतचा प्रवास दाहक आणि खडतर आहे. मानलेल्या आईजवळ राहून, रात्री बेरात्री शेतावर जाऊन पडेल ती कामे करून, दिवसरात्र श्रम करून किशोर काळे यांनी कोल्हाटी समाजात जन्मलेला पहिला डॉक्टर हे श्रेय मिळवले. तृतीय पुरुषी जमातीच्या जीवनाचे दर्शन घडविणारा ‘हिजडा एक मर्द’ हे त्यांचे नाटक १९९७ मध्ये प्रसिद्ध झाले. ‘आई तुझे लेकरू’ हा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. समाजातील उपेक्षित वर्गाच्या यातनामय जीवनाचे पारदर्शी चित्रण त्यांच्या लेखनात घडते. राजकारणी, समाजकारणी, लब्धप्रतिष्ठित माणसांना या समाजाची फरफट दिसत असली, तरी त्यांची दखल घेण्यास कोणालाच सवड नाही; याचे तीव्र दुःख डॉक्टर किशोर काळे यांनी उराशी बाळगले. समाजासाठी काही करावे, यासााठी अथक धडपड चालू असताना दुर्दैवाने किशोर काळे यांचे अपघातात अवघ्या ३९व्या वर्षी निधन झाले.

- डॉ. सुभाष भेण्डे

 

काळे, किशोर शांताबाई