Skip to main content
x

काळे, कृष्णाजी धोंडिबा

​​​​​​​दादासाहेब काळे

         कृष्णाजी धोंडिबा उर्फ दादासाहेब काळे यांचा जन्म रोजी सारोळा कासार ता. जि. अहमदनगर येथे सामान्य शेतकरी परिवारात झाला. मराठी चौथ्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण गावीच पार पडले. इंग्रजी पहिलीसाठी नगरला काही दिवस मराठी साहित्यिक वि. द. घाटे यांचे आजोबा मुखत्यार वकील कोंडो राणोजी घाटे यांचे घरी रहावे लागले. काही काळ बडोदे संस्थानकडून दरमहा रु.पाचची शिष्यवृत्ती मिळाली. इ. स. १८९५ मध्ये युनिव्हर्सिटी स्कूल फायनलची परीक्षा कृष्णाजी धोंडो सारोळकर या नावाने उत्तीर्ण. पुढील ७ वर्षे म्हणजे १९०२ पर्यंत विविध ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या नोकरीवर राहिले व शेवटी नोंदणी खात्यात स्थिरावले.  

     इ. स. १९१६ मध्ये अहमदनगर येथे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेत झालेल्या विचारमंथनातून शिक्षणाचे लोण जनसामान्य आणि बहुजन समाजापर्यंत पोहोचविण्याचे ठरले. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील बहुजन समाजातील शिक्षणप्रेमी कृ. धों. काळे, रावबहाद्दूर नवले, सरदार थोरात, वामनराव तोडमल, रामचंद्र अकोलकर, सहदेवराव काळे, अमृते फौजदार, विठ्ठलराव डोंगरे, पंढरीनाथ पंदरकर, माधवराव लवांडे ही मंडळी एकत्र आली. राजर्षी शाहू महाराजांची कल्पना मूर्त स्वरूपात साकारण्यासाठी व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी सन १९१८ मध्ये अहमदनगर येथे हुतात्मा ‘करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा भोजन वसतिगृह’ या नावाची संस्था स्थापन केली.

     प्रारंभी वसतिगृह नालेगाव भागातील देशपांडे यांच्या खाजगी इमारतीमध्ये होते. पुढे कानवडे पाटील, बापूसाहेब भापकर यांच्या पुढाकाराने हुतात्मा करवीर चौथे शिवाजी महाराज यांच्या दफनभूमीची जागा संपादित करून व त्याच जागेसमोरील अंदाजे १२ एकर जागा खरेदी करून मातीच्या भेंड्याच्या आणि पत्र्याच्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याची व भोजनाची सोय केली गेली. सदर वसतिगृह आणि संस्थेचे खजिनदार म्हणून दादासाहेबांनी इ. स. १९२० ते १९२५ अखेर काम पाहिले. दादासाहेब नोंदणी खात्यामध्ये सहायक निबंधक म्हणून नाशिक, इगतपुरी, मालेगाव, धुळे, वडगाव मावळ, चिंचवड आणि शेवटी अहमदनगर येथे सेवेत होते. इ. १९२६ मध्ये वयाच्या ५५ व्या वर्षी सेवेतून निवृत्त झाले.

     गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी या वसतिगृहाला दरसाल रु.एक हजाराचे अनुदान व महाराजांच्या छत्रीच्या देखभालीसाठी दरसाल रु.दोनशेची तरतूद केली. शहरातील मराठा समाजाची मान्यवर मंडळी वसतिगृहासाठी दरमहा चार आणे देणगी नियमितपणे देत तर काही मंडळी मोफत भाजीपाला पुरवीत. जे विद्यार्थी वसतिगृहमधील भोजनाचे नाममात्र शुल्कही भरू शकत नसत अशा मुलांना शहरातील बहुजन समाजातील मान्यवर आपल्या घरी वार लावून जेवू घालीत. मराठा समाजातील मुलांनी शिक्षण घेऊन स्वबळावर पुढे यावे व बहुजन समाजाचा विकास साधावा अशी त्यांची धारणा होती.

     दादासाहेबांच्या पायात सरकारी नोकरीची रुपेरी बेडी होती तरी स्वत:च्या नोकरीतील निष्ठेबरोबरच शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनाचे कार्य सतत चालू असे. मराठा समाजाचे कार्यकर्ते दादासाहेबांच्या घरी समाजकारणाविषयी चर्चा करून पुढील कार्याची दिशा ठरवित असत. शेतकर्‍यांच्या व शेतमजूरांच्या मुलांस शिक्षण मिळावे म्हणून व त्यांच्या शेतमालास रास्त भाव मिळावा म्हणून एकीकडे वसतिगृह/शाळा तर दुसरीकडे तालुका व जिल्हा खरेदी विक्री संघाच्या स्थापनेमध्ये दादासाहेबांचा विशेष पुढाकार होता.

     ‘करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा भोजन वसतिगृहात’च्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुंबई राज्याचे तत्कालीन गव्हर्नर सर रॉजर लुमले यांच्या हस्ते ११ ऑक्टो. १९३८ रोजी पार पडले. आयुक्त जे डब्ल्यू.स्मिथ, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डब्ल्यू.जी.हुलंड आय.सी.एस. व जे. बी. आयर्विन आय.सी.एस. आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दादासाहेबांनी विशेष परिश्रम घेतले. वसतिगृहामधील विद्यार्थी शहरातल्या विविध माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षण घेत असत. संस्थेचे स्वत:चे स्वतंत्र विद्यालय असावे म्हणून इ. स. १९४१ मध्ये 'टागोर इंग्लिश शाळे' ची स्थापना करण्यात येऊन दोन वर्षाने इ. स. १९४३ मध्ये त्याचे रूपांतर ‘निवासी विद्यालय अहमदनगर’ असे करण्यात आले.

     दादासाहेबांनी त्यांच्या सारोळा कासार, या गावाची शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अर्थशास्त्रीय, भौगोलिक व शेती व्यवसाय विषयक माहिती गोळा करून अभ्यासपूर्ण सर्वेक्षण केले व त्याचा अहवाल म्हणून ‘सारोला कासार स्टडी ऑफ डेक्कन व्हिलेज इन फेमिन झोन’ नावाचा इंग्रजीमध्ये सुमारे ३५० पृष्ठांचा ग्रंथ इ. १९३८ मध्ये प्रसिद्ध केला. सदर ग्रंथास अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी मॅकमिलन यांची उत्कृष्ट प्रस्तावना असून हा ग्रंथ मुंबई इलाख्याचे तत्कालीन गव्हर्नर सर रॉजर लुमले यांना समर्पित केला आहे.

     स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बहुजन समाजातील अभ्यासकाचा अशा प्रकारचा ग्रंथ म्हणजे कुतूहलाचाच भाग मानला गेला. सदर ग्रंथाच्या प्रती आजही देश - विदेशातील विविध विद्यापीठांच्या ग्रंथालयात मानाचे स्थान राखून आहेत. सदर ग्रंथास आधारभूत मानून स्वातंत्र्योत्तर काळात कित्येक संशोधक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले आहे.

     अत्यंत शिस्तप्रिय, स्वाभिमानी व करारी स्वभावाच्या दादासाहेबांनी आपले सारे आयुष्य सकल जनांच्या ज्ञानप्रकाशासाठी खर्ची घातले. यात पुढील १० गोष्टींचा समावेश होता : १. विद्यासंपत्ती, २. शरीरसंपत्ती, ३. सत्संग, ४. उद्यमशीलता, ५. सत्यवचन,  ६. व्यसनमुक्ती,  ७. सद्वर्तन,  ८. धर्माचरण,  ९. शिलकी व्यवहार आणि १०. काटकसर.

     लोकांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण व्यवहारांच्या कायदेशीर नोंदी करून ठेवणार्‍या सहायक निबंधक दादासाहेबांनी वैयक्तिक माहितीच्या नोंदींबरोबरच पुढील पिढ्यांना आणि समाजाला आदर्शवत असे स्वत:चे मृत्युपत्र तयार करून इ. स. १९४५ मध्ये त्याची कायदेशीर नोंदणी (रजिस्ट्रेशन) करून घेतली. अशा प्रकारे कृतकृत्य होऊन आपले जन्मगाव सारोळा कासार येथे आपली इहलोकीची यात्रा संपविली.        

- विश्वास काळे

काळे, कृष्णाजी धोंडिबा