Skip to main content
x

कांबळे, नामदेव चंद्रभान

पल्या विपुल व विविध साहित्य निर्मितीने अल्पावधीत साहित्य-रसिकांपर्यंत पोचणारे नामदेव कांबळे यांचा जन्म वाशिम जिल्ह्यातील शिरपूर (जैत) येथे झाला. तेथेच शालेय शिक्षण घेऊन १९६७ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नागपूरच्या शासकीय विज्ञानसंस्थेतून प्रथम वर्षापर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे १९६९ ते १९७१ या कालावधीत नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला, परंतु ते शिक्षण न जमल्यामुळे त्यांनी ते अर्धवट सोडले. कालांतराने बहि:स्थ विद्यार्थी म्हणून परीक्षा देऊन ते १९७७ साली बी.ए. झाले व १९७९ साली अकोल्याच्या अध्यापक महाविद्यालयातून बी.एड. झाले. १९७४ ते १९७६ या काळात चौकीदार म्हणून, पुढे दोन वर्षे प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून कांबळे काम करीत होते. नंतर १९७९पासून त्यांनी पूर्वमाध्यमिक व माध्यमिक स्तरांवर अध्यापन केले. १९८०च्या जवळपास त्यांच्या एकांकिका, ललित लेख व कथा असे बहुविध लेखन ‘वाङ्मयशोभा‘, ‘हंस’, ‘अक्षरवैदर्भी’ इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. ‘अकल्पित’(१९८९), ‘प्रत्यय’(१९९७), ‘तो: ती अन्वयार्थ’ (२०००), ‘गहिवर’ (२००८) हे कवितासंग्रह; ‘अस्पर्श’(१९९०) ही कादंबरी; ‘परतीबंद’(१९९४) हा कथासंग्रह; ‘स्मरण विस्मरण’(१९९८) हा ललितलेखसंग्रह असे त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले.

घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असल्यामुळे क्लेशकारक व कष्टदायक वातावरणात कांबळे यांना आपली शैक्षणिक व साहित्यिक प्रगती प्रयत्नपूर्वक करावी लागली. व्यक्तिगत आयुष्यात आलेल्या खडतर व विपरीत अनुभवांचा संस्कार त्यांच्या लेखनावर काही प्रमाणात होणे अपरिहार्य म्हणता येईल.

मराठी वाचकवर्गास कांबळे ह्यांचा खर्‍या अर्थाने परिचय झाला तो त्यांच्या ‘राघववेळ’ (१९९३) या कादंबरीस १९९५मध्ये साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाल्यानंतर. ‘राघववेळ’ व त्यानंतर लिहिलेल्या ‘ऊनसावली’(१९९७), व ‘सांजरंग’(१९९९) अशा तीन कादंबर्‍या मिळून एक कादंबरीत्रय पुरे होते. दलित कादंबरीच्या इतिहासातील हे पहिलेच कादंबरीत्रय. तरुणपणीच वाट्याला आलेले वैधव्य व अठराविसे दारिद्र्य यांचा कष्टपूर्वक व जिद्दीने सामना करीत वालंबी नावाच्या अशिक्षित व असाहाय्य मातंग स्त्रीने जीवनात यशस्वीपणे केलेली वाटचाल, मुलांना दिलेले शिक्षण व मुलीचे केलेले लग्न अशी जाधव कुटुंबाची हकिगत या कादंबर्‍यांतून लेखकाने सलगपणे निवेदन केली आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी वालंबीला करावा लागलेला संघर्ष व सगळ्या अडचणींवर मात करत-करत पतीला दिलेल्या वचनाची मृत्युपूर्वी केलेली पूर्तता; हा तिचा प्रवास विदारक सामाजिक वास्तवावर प्रखर प्रकाशझोत टाकणारा आहे. ज्या भाऊबंदांनी व संबंधितांनी मदत तर सोडाच, साधे सहकार्यही दिले नाही; त्यांच्याविषयीदेखील कटुता न बाळगता उलट शक्य असेल तेव्हा त्यांनाच मदत करणारी समंजस व प्रगल्भ नायिका या तीन कादंबर्‍यांच्या मालेमधून वाचकांपुढे उभी राहते.

माणसाच्या आयुष्यात दुरित वेगवेगळ्या रूपांनी प्रविष्ट होत असते; त्याला सोशिकपणे, न डगमगता सामोरे जाणे यावाचून अन्य गती नसते, याची जाणीव वालंबीच्या कणखर व्यक्तिदर्शनातून कांबळे यांनी घडविली आहे. असाहाय्य स्त्रीचे शोषण कुठल्याही समाजात नेहमीच होत आलेले आहे. वालंबीचा अनुभवही वेगळा नाही. तरुण विधवा स्त्रीचा देह हीच तिच्या बाबतीतली आपत्ती असते, याची जाणीव वालंबीला आलेल्या अनुभवांनी उद्बोधक ठरते. भूक, मग ती अन्नाची असो वा शरीराची, माणसाला हतबल करून सोडत असते, तरीही आत्मसंयमाने व निर्धाराने पुढेच जायचे असते, आपल्या ध्येयापासून व निश्चयापासून विचलित व्हायचे नसते; याचे भान वालंबीच्या व्यक्तिरेखेमुळे जागे होते. वालंबीच्या परिश्रमांना यश आले. तिची दोन्ही मुले शिकली. ‘राघववेळ’च्या अखेरीस रघू शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाला, ‘ऊनसावली’च्या शेवटी पदवीधर झाला व त्याचे लग्न ठरले. ‘सांजरंग’मध्ये त्याचा भाऊ सीताराम शिकून नोकरीला लागला, त्याचेही लग्न झाले आणि वालंबीची मुलगी कौसा लग्नानंतर सासूने केलेला छळ सोसत हळूहळू संसारात स्थिरावली. तिच्या मुलाला रघूने शिक्षणासाठी स्वत:बरोबर पुसदला नेले व शिक्षणाचा वारसा पुढे चालत राहिला. एकेकाळच्या झोपडीच्या जागी नवे घर उभे राहिले. वालंबीचे जीवन दिवसेंदिवस यशस्वी होत गेले. सर्व दिशांनी अंधाराने घेरले असताना धीराने वाटचाल करणार्‍या या नायिकेचा अंत जीवनाच्या संध्याकाळी उतरत्या प्रकाशात समाधानकारकपणे व्हावा, हे कादंबरीकाराच्या सकारात्मक जीवनदृष्टीचे निदर्शक आहे. विशेषतः दोन घासांची भ्रांत पडलेल्या परिस्थितीत, शीलाशी कोणतीही तडजोड न करता, नायिकेने दाखविलेला निग्रह अपवादभूत आहे. सभोवतालच्या अरिष्टांना सामोरे जात, विचलित न होता वाटचाल करीत राहणे सोपे नाही. कांबळे यांच्या कादंबर्‍या वाचताना स्त्रीजीवनातील दु:खभोग हा त्यांच्या आस्थेचा विषय आहे, हे ध्यानात येते. त्यांच्या पूर्वकालीन जीवनाचा संस्कार आणि समकालीन जीवनातील सामाजिक परिस्थिती या आस्थेस विशेषत्वाने कारणीभूत ठरली असावी.

एकाच वेळी दलित व ग्रामीण अनुभवविश्व साकार करणार्‍या या कादंबर्‍यांची निर्मिती करणारे कांबळे हे समर्थ लेखक म्हणावयास हवेत. या कादंबर्‍यांच्या माध्यमातून मांग समाजाच्या दारुण दु:खांचा व भयावह समस्यांचा कादंबरीकाराने घेतलेला वेध ज्याप्रमाणे आंतरिक तळमळीतून साकार झाला आहे, त्याप्रमाणे स्त्रीच्या वाट्याला येणार्‍या दु:खभोगाची तीव्रता, अ‍ॅसिडच्या थेंबाप्रमाणे पडेल तेथे भाजून टाकील अशा, परिणामकारक पद्धतीने मूर्त केली आहे. बोलीभाषेच्या सप्रयोजक अवलंबामुळे त्यांच्या कादंबर्‍यांना विशिष्ट प्रदेशाचे रूप आपोआप प्राप्त होते. ‘राघववेळ’, ‘ऊनसावली’ व ‘सांजरंग’ ही दिनचक्रनिदर्शक अर्थपूर्ण शीर्षके कादंबर्‍यांना देऊन त्या शीर्षकांचा कादंबरीच्या नायिकेच्या जीवनातील समांतर अशा अनुभवांशी मेळ घालण्याचा लेखकाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ‘मोराचे पाय’(१९९७), ‘सेलझाडा’ (२००१), व ‘कृष्णार्पण’ (२००८) या त्यांच्या पुढल्या कादंबर्‍यादेखील विदर्भातील ग्रामजीवनाची सुखदु:खे चित्रित करतात. खेड्यांतील कादंबर्‍यांना आधारभूत असणारी बलुतेदारीची पद्धती औद्योगिकीकरण पूर्व समाजव्यवस्थेचे दर्शन घडविते; हे जरी बरोबर असले, तरी या कादंबर्‍यांचे लेखन झाले, तेव्हा जागतिकीकरण आपल्या उंबरठ्यावर उभे होते, त्याचेही काही परिणाम ग्रामजीवनावर घडत होते. अशा वेळी या व्यवस्थेची प्रस्तुतता किती, यासंबंधीचे काही सूचन कादंबर्‍यांतून का घडू नये, असा प्रश्न उपस्थित होतो. भरपूर साहित्यनिर्मिती करूनही कांबळे यांच्याकडे मराठी समीक्षेचे फारसे लक्ष का गेलेले नाही, त्याचा उलगडा होत नाही.

गद्यलेखनात बहिर्मुख वृत्तीने लिहिणारे कांबळे कवितेत मात्र बऱ्याच प्रमाणात अंतर्मुख झाले आहेत. त्यांची काव्याभिव्यक्ती प्रासादिक परंतु अर्थबहुल आहे. त्यांची कविता अंतर्मुख होऊन स्वत:ला ज्याप्रमाणे न्याहाळते, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सामाजिक घटनाप्रसंगांचा व सामाजिक स्थित्यंतरांमधील चढउतार रेखाटते. सामाजिक जाणिवेची त्यांची कविता समाजातील गुंतागुंतीच्या प्रश्नांकडे अंगुलिनिर्देश करते. जीवनानुभवांतला धगधगता अंगार विझल्यानंतर प्रौढपणी येणारे निखळ शहाणपण त्यांच्या कवितेत ठिकठिकाणी उमटवलेले आहे (उदा. ‘शिशिर माळून/गेला सावकाश/कोंब हरळीस/आज नवा’). कालप्रवाहाबरोबर घडलेली अटळ स्थित्यंतरे तटस्थपणे न्याहाळणारे (उदाहरणार्थ ‘गाव पार माझा/बदलून गेला/कात टाकलेला/जैसा नाग’), जुने जाणे व नवे येणे या सनातन सत्याचा अनुभव घेणारे, जीवनातल्या कटू अनुभवांचा मूक स्वीकार करून ते मागे टाकत पुढील वाटचाल समजूतदारपणे करणारे व्यक्तिमन या कवितांतून उभे राहते.

सर्जनशील साहित्याची निर्मिती करणार्‍या या लेखकाने ‘समरसता साहित्य: स्वरूप व समीक्षा’ (२००८) हे समरसतेची संकल्पना स्पष्ट करणारे पुस्तक लिहिले आहे. त्यात समरसता साहित्याची व्याख्या, समता-समानता-समरसता, प्रवर्तन-परिवर्तन व समरसता, समरसतेची प्रेरणा यांसारख्या विषयांवरील कांबळे यांचे स्वतंत्र मतप्रतिपादन आढळते. ‘शब्दांच्या गावा जावे’ (२००९) हा त्यांच्या वेळोवेळी केलेल्या भाषणांचा संग्रह आहे. त्यामधून शिवाजी महाराज, संत तुकाराम, स्त्री-दशा आणि दिशा, शेतकरी आत्महत्या: शोध आणि बोध, ओबीसीना आरक्षण हवे इत्यादी विषयांच्या संदर्भात कांबळे यांनी केलेले विचारमंथन सर्व वाचकवर्गाला उपलब्ध करून दिले आहे. हा संग्रह त्यांच्या विचारविश्वाचा दिशादर्शक आहे. उपर्युक्त ‘परतीबंद’ या कथासंग्रहातून ग्रामीण दलित समाजाप्रमाणेच प्रस्थापित समाजातील व्यक्तींचे जीवनानुभवही कथांचा विषय बनले आहेत. रूढ दलित साहित्याच्या आक्रमक आविष्कारापेक्षा काहीशा सौम्य सुरात आविष्कृत होणारी कांबळे यांची साहित्यनिर्मिती मूलभूत मानवतावादाच्या जवळ जाणारी आहे. जातीपातींच्या उतरंडीपेक्षाही माणसाचे या ना त्या निमित्ताने होणारे शोषण या लेखकाला बोचत राहते. त्यामुळेच केवळ दलित्वाच्या व वंचनेच्या संघर्षापेक्षाही माणसाचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांना अधिक मोलाचा वाटतो. हे भिन्न वळण त्यांच्या साहित्यविषयक भूमिकेचे द्योतक म्हणता येईल.

- डॉ. विलास खोले

 

कांबळे, नामदेव चंद्रभान