Skip to main content
x

कांबळी, मारुती शिवरामपंत

निसर्गदत्त महाराज

     निसर्गदत्त महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे मारुती शिवरामपंत कांबळी यांचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला मुंबई येथे झाला. या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे त्यांचे नाव ‘मारुती’ ठेवण्यात आले. रत्नागिरीमधील कांदळगाव या छोट्या गावी त्यांचे बालपण गेले. त्यांना दोन भाऊ आणि चार बहिणी होत्या. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई. वडिलांच्या मृत्यूनंतर मारुती त्यांनी उदरभरणासाठी मुंबईला आला व छोट्याशा नोकरीनंतर १९१५ साली त्याने विडी-तंबाखू विकण्याचे छोटे दुकान सुरू केले. मारुतीचे १९२४ साली सुमतीबाई हिच्याशी लग्न झाले व त्यांना चार मुली व एक मुलगाही झाला.

     मारुती यांचा मुळातच परमार्थाकडे अधिक ओढा होता व त्यांचा स्वभाव सत्शील व मनमिळाऊ होता. कीर्तने—प्रवचने ऐकण्याची त्यांना अतिशय गोडी होती. मारुतीचा १९३३ साली नवनाथ संप्रदायाच्या इंचगिरी येथील शाखेचे सिद्धरामेश्वर महाराज यांच्याशी परिचय झाला. त्यांची प्रवचने मारुती कधीच चुकवीत नसे. सिद्धरामेश्वर महाराजांनी मारुतीला कसोटीवर पारखून आपला शिष्य बनविले. कालांतराने मारुतीला ‘निसर्गदत्त महाराज’ असे नामाभिधान लाभले. सद्गुरूंच्या स्वर्गवासानंतर ते इंचगिरी मठाचे मुख्यही झाले. महाराजांनी प्रपंचात राहूनही उत्तम परमार्थ साधला. १९३७ साली महाराज मुंबई सोडून देशाटनासाठी बाहेर पडले आणि १९३८ साली मुंबईत पुन्हा परत आले. तंबाखूचा व्यापारी ही ओळख मागे पडून निसर्गदत्त महाराज या नावाने त्यांना सर्व ओळखू लागले.

     १९४२ ते १९४८ या काळात त्यांना पत्नी आणि कन्येच्या वियोगाचे दु:ख सोसावे लागले. निसर्गदत्त महाराजांचा शिष्य संप्रदाय १९५१ पासून वाढू लागला. त्यांनी १९६६ साली आपला व्यवसाय बंद केला आणि ते लोककल्याणार्थ प्रवचने करू लागले. त्यांची ख्याती महाराष्ट्रासह मुंबईतील परदेशी साधकांपर्यंत पोहोचली होती. मुंबईत त्या काळी परदेशी भाविक, शांती आणि वेद-उपनिषदांच्या आकर्षणाने भारतात येत असत. त्यांनाही निसर्गदत्त महाराजांच्या लौकिकाची वार्ता कळली. त्यामधून अनेक देशांतील त्यांचे भक्तगण तयार झाले. मोरीस फ्रिडमन या शिष्याने ‘I am That’  हे निसर्गदत्त महाराजांचे चरित्र लिहून महाराजांची कीर्ती परदेशात पसरविली. पुढे या पुस्तकाचा अनुवाद अनेक परकीय भाषांमध्ये झाला. ‘आपला परमार्थ आपल्यापाशीच असतो. प्रथम स्वत:चा शोध घ्या’, हे निसर्गदत्त महाराजांचे तत्त्व त्या ग्रंथात विशद केले आहे. निसर्गदत्त महाराजांनी आपला पिढीजात व्यवसाय सांभाळला. प्रपंचदेखील नेटका केला. कित्येकांना भगवद्भक्तीचा मार्ग दाखवून निसर्गदत्त महाराज ८ सप्टेंबर १९८१ रोजी स्वर्गस्थ झाले.

      - संदीप राऊत

      -  दीपक जेवणे

कांबळी, मारुती शिवरामपंत