Skip to main content
x

कडकडे, अजित सदानंद

जित सदानंद कडकडे यांचा जन्म गोव्यातील डिचोली या गावात झाला. त्यांचे शालेय शिक्षण गोव्यातच झाले. त्यांच्या घरात तशी संगीताची परंपरा नव्हती, तरीही आईवडिलांच्या आग्रहाने लहान वयातच गुरू सखाराम बर्वे यांच्याकडे ते हार्मोनिअम शिकले. त्याचबरोबर त्यांनी माडिये गुरुजींकडे गाण्याचे शिक्षणही घेतले.
इंटरमध्ये शिकत असताना त्यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांची मैफल ऐकली. पंडितजींच्या गायकीने त्यांच्या मनात गाण्याची ओढ निर्माण झाली. वडिलांकडे हट्ट करून त्यांनी मुंबई गाठून पं. जितेंद्र अभिषेकी यांची भेट घेतली. त्यांना अभिषेकी यांनी इंटर सायन्सचे उर्वरित शिक्षण पूर्ण करून येण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी इंटर सायन्स पूर्ण करून पुन्हा मुंबई गाठली.
अजित कडकड्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी गाणे शिकण्यास सुरुवात केली. दोन वर्षांनंतर त्यांची तयारी बुवांच्या पसंतीस उतरली व त्यांना ‘संत गोरा कुंभार’ या संगीत नाटकात संत नामदेवांची भूमिका वठविण्याचे बुवांनी सांगितले.
नाटकाची आवड नसूनही, गुरूंची आज्ञा म्हणून त्यांनी ते काम स्वीकारले. पहिलेच काम असल्यामुळे अभिनयाव्यतिरिक्त नाटकातील इतर कामांची जबाबदारीदेखील त्यांच्यावर पडत असे. या नाटकाचे ऐंशी प्रयोग झाले. त्यानंतर ‘संगीत संशय कल्लोळ’, ‘महानंदा’, ‘कधीतरी, कोठेतरी’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत शारदा’, ‘कुलवधू’ आणि ‘अमृत मोहिनी’ अशा नाटकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका वठवल्या. अमृत मोहिनीनंतर त्यांनी नाटकांना रामराम ठोकला.
डोंबिवलीतील एका कार्यक्रमात पं. गोविंदप्रसाद जयपूरवाले यांनी अजित कडकडे यांचे गाणे ऐकले व त्यांना 
शिकवण्याची तयारी दर्शवली. त्याप्रमाणे त्यांच्याकडे कडकडे यांनी सुमारे अडीच वर्षे बंदिशी, गझल आणि हिंदी भक्तिगीतांचे धडेदेखील गिरवले.
अशोक पत्की या संगीत दिग्दर्शकांना कडकडे यांचा आवाज आवडला आणि त्यांनी ध्वनिमुद्रिकेसाठी त्यांना गायनाची संधी दिली. त्यानंतर ध्वनिमुद्रिका, ध्वनीफिती व ध्वनीचकत्या असा काळाबरोबर प्रवास करत अजित कडकडे यांनी गायन क्षेत्रात आपले स्थान पक्के केले.
प्रभाकर पंडित यांनी काढलेल्या ‘देवाचिये द्वारी’ ही पहिली स्वतंत्र ध्वनीफित खूप गाजली. त्यानंतर अजित कडकडे यांच्या स्वतंत्र गाण्याच्या ध्वनीफिती येऊ लागल्या. दरम्यानच्या काळात संगीतकार नंदू होनप यांची गाठ पडली आणि ‘अजित कडकडे-नंदू होनप’ हे समीकरण रसिकांनी उचलून धरले. महाराष्ट्रातील जवळपास सर्व देव-देवतांच्या गाण्यांच्या, तसेच भजनांच्या ध्वनीफिती या द्वयीने रसिकांपुढे आणल्या. ‘अष्ट स्तुती सुमनांजली’, ‘लाडोबा गोविंद’, ‘पांडुरंग श्रीरंग’ अशा ध्वनीफिती गाजल्या. त्यानंतर साईबाबा, अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज, श्रीगुरुदेव दत्त अशा दैवी अवतारांवरची गाणीदेखील त्यांनी गायली. या द्वयीने सादर केलेली ‘दत्ताची पालखी’ ही ध्वनीफीत चिरकाल रसिकांच्या स्मरणात राहिली.
अजित कडकडे यांच्या ध्वनीफितींनी विक्रीचे नवे उच्चांक गाठले. ‘देवाचिये द्वारी’: डबल प्लॅटिनम, ‘शिर्डी माझे पंढरपूर’: प्लॅटिनम, ‘छंद विठ्ठलाचा’ : प्लॅटिनम अशा मानांकित सन्मानांनी त्यांचे कौतुक करण्यात आले. नाट्यसंगीतासाठी त्यांना ‘गोल्ड डिस्क’ देण्यात आली. ‘गोष्ट धमाल नाम्याची’ आणि ‘आई पाहिजे’ या चित्रपटांतील पार्श्वगायनासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक’ हे सन्मानही त्यांना मिळाले आहेत.
संगीताच्या विविध
  कार्यक्रमात अजित कडकडे यांच्या गायनाचा आनंद श्रोते घेत असतात.

अमोल ठाकुरदास

कडकडे, अजित सदानंद