Skip to main content
x

केतकर, विष्णू गंगाधर

दादासाहेब केतकर

     राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते विष्णू गंगाधर ऊर्फ दादासाहेब केतकर यांचा जन्म मुंबईमधील फणसवाडी चाळीत झाला. दादा दोन वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. दादांचे थोरले बंधू माधुकरी मागत. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चाले. प्राथमिक शिक्षणानंतर मुंबईतील प्रभू सेमिनरी शाळा, रॉबर्टमनी विद्यालय व विल्सन हायस्कूल येथे त्यांचे इंग्रजी पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले. वडील बंधूंना पुण्यात नोकरी मिळाली. दादा त्यांच्याबरोबर पुण्यात आले. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले.

      राष्ट्रीय बाण्यामुळे त्यांनी इंग्रज सरकारची नोकरी न करता स्वतंत्रपणे सामाजिक कार्य करता त्यागपूर्वक जीवन देशकारणी लावायचे असा निर्धार केला. त्यानंतर दादांना १९०६ मध्ये लोकमान्य टिळकांचे शिष्य म्हणजेच दादासाहेब खापर्डे यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. विदर्भातील वास्तव्यात दादांच्या आयुष्याला नवी दिशा लाभली. त्या काळात सरकार विरुद्ध प्रजा असा संघर्ष सुरू होता. वंगभंगाच्या चळवळीतून राष्ट्रीय शिक्षण देणारी विद्यालये व मोठमोठ्या पाठशाळा निर्माण झाल्या. या स्वदेशीच्या वातावरणाने समाज ढवळून निघत होता. इंग्लंडहून येणार्‍या मालाप्रमाणेच इंग्रज राज्यकर्त्यांच्या मदतीने चाललेल्या शिक्षणसंस्थांवरही बहिष्कार घातला जात होता. यातूनच महाराष्ट्रात तळेगाव व त्या वेळच्या वर्‍हाडमधील अमरावती व यवतमाळ येथे राष्ट्रीय शाळा स्थापन झाल्या. यवतमाळ येथील ‘विद्यागृह’ शाळेत दादा प्राथमिक शिक्षक म्हणून काम करू लागले. दर रविवारी विद्यार्थी व दादा शाळेसाठी मदत (भंडारा) जमा करीत.

     राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार करणार्‍या ‘हरिकिशोर’ वृत्तपत्राचे मालक पृथ्वीगीर दस्तगीर ह्यांना व नंतरचे संपादक नरहर विष्णू भावे ह्यांना देशद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा झाली. तेव्हा दादांनी संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली. पण विद्यागृह ह्या संस्थेवर व हरिकिशोर वृत्तपत्रावर सरकार बंदी आणणार असे दिसल्यावर ती संस्था बंद करून चालक पुण्या-मुंबईला गेले.

     दादा पुण्याला आले. तेथे काही दिवस त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले. पण पुढे सहाच महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या पुणे अनाथ विद्यार्थीगृहात दाखल झाले. तेव्हा विद्यार्थ्यांचा राहण्याचा, दिवाबत्तीचा व भोजनाचा खर्च देणग्यांतून भागेनासा झाला असता दादा आणि त्यांचे सहकारी रा.ज. पटवर्धन माधुकरी मागत व विद्यार्थ्यांना जेवू घालीत.

      संस्थेने १९१४ मध्ये ‘अनाथ विद्यार्थी गृह पाठशाला’ हा उपक्रम सुरू केला. संस्थेचा विस्तार चिंचवड येथे झाला. दादा पुण्याच्या संस्थेत काम पाहू लागले. १९२० च्या दरम्यान संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ. ग. श्री. खैर व ना. वि. उर्फ मामा पेंडसे आजीव सदस्य झाले. डॉ. खैर व डॉ.नानासाहेब परुळेकर ह्यांनी दादांच्या समवेत महाराष्ट्र विद्यालय सुरू केले. त्याला औद्योगिक शिक्षणाची जोड दिली. संस्थेचा विस्तार व्हावा म्हणून चाललेल्या दादांच्या प्रयत्नांतून देणग्या मिळत गेल्या. संस्थेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संस्थेचा छापखाना असावा अशी दादांची इच्छा होती. याच सुमारास म्हणजे १९२९ मध्ये शं. रा. तथा मामा दाते त्यांच्या लोकसंग्रह छापखान्यासह संस्थेत आले. शालोपयोगी व इतर पुस्तकांचे प्रकाशन सुरू झाले. संस्थेला फायदा होऊ लागला. अनेक सुबक वळणाचे टाईप तयार होऊ लागले. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंग्यात हा छापखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दादांनी मोठ्या हिमतीने तो परत उभा केला.

     १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीचा फायदा घेऊन संस्थेने विद्यार्थ्यांच्या मनावर राष्ट्रीय जागृतीचे संस्कार केले. दादांनीही पुनःपुन्हा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षणाचा संस्कार अधिकाधिक दृढ केला. संस्थेच्या वाटचालीत चढ-उतार येत गेले. पण दादांनी अतिशय दूरदर्शीपणाने तिचा विकास घडवून आणला. दादा म्हणजे अनाथ विद्यार्थी गृह व अनाथ विद्यार्थी गृह म्हणजे दादा असे समीकरण तयार व्हावे इतके दादा संस्थेशी एकरूप झाले. पुढे १९७७ मध्ये मुंबईत घाटकोपर येथे संस्थेने आपली शाखा सुरू केली. १९७८ मध्ये मुद्रणशिक्षण, मुक्तांगण इंग्लिश शाळा, बालरंजन केंद्र, वृद्धाश्रम - शतायुभवन, तळेगाव येथे चौथी शाखा, क्रीडा संकुल, नव्या मुंबईत संकुल, उच्च शिक्षणासाठी सहा महाविद्यालये असा विस्तार झाला.

     - मल्हार अरणकल्ले

केतकर, विष्णू गंगाधर