Skip to main content
x

किबे, मनोहर माधव

      र्व वृक्ष, वनस्पती व पिकांना आधार देणाऱ्या , अन्नघटक व पाणी पुरवणाऱ्या जमिनीचे स्वरूप, तिचे रासायनिक घटक, भौतिक गुणधर्म व सूक्ष्म जीवशास्त्रीय प्रक्रिया यांचा पिकांच्या पोषणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे प्रारंभीच्या काळातील संशोधक मनोहर माधव किबे यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे आजोबा व वडील बडोदा संस्थानात अधिकारी होते. त्यांचे शालेय शिक्षण चिमणाबाई गायकवाड विद्यालयात झाले व १९२५मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते पुणे येथे आले व इंटर सायन्सनंतर कृषी महाविद्यालयातून १९३२मध्ये बी.एजी.झाले. ते कृषी-रसायनशास्त्र विषय घेऊन १९३४मध्ये एम.एस्सी. झाले. त्याच वर्षी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून रसायनशास्त्रात  बी.एस्सी.पदवी घेतली.

      पुणे येथील कृषी महाविद्यालयात त्यांनी १९३५मध्ये संशोधन साहाय्यक व १९३७पासून कृषी-रसायनशास्त्राचे व्याख्याता म्हणून काम केले. त्यांनी १९४१ ते १९४५ दरम्यान पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रात व नंतर १९५०पर्यंत पुन्हा पुणे कृषी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले. त्यांनी १९५०मध्ये कृषी-रसायनशास्त्रामध्ये पीएच.डी. प्राप्त केली व १९५० ते १९५२ दरम्यान धारवाड येथील कृषी महाविद्यालयात प्राध्यापक व नंतर १९६०पर्यंत मुंबई सरकारचे मृदा-विशेषज्ञ म्हणून पुणे व सोलापूर येथे काम केले. जमिनीतील निरनिराळ्या रासायनिक घटकांत पिकांची अन्नद्रव्ये उदा. नत्र,स्फुरद व पालाश कोणत्या रूपात असतात व पिकांना कशी उपलब्ध होतात, यावर त्यांनी व त्यांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी संशोधन केले. रासायनिक व सेंद्रिय खते जमिनीत टाकल्यावर होणार्‍या रासायनिक प्रक्रिया व परिणामतः अन्नघटकांची पिकांना उपलब्धी या व आनुषंगिक विषयांवर त्यांनी सखोल संशोधन केले. त्यावरील १००पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

      किबे १९६० ते १९६३ दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या सिंचन खात्यात विशेष अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर गेले. या काळात त्यांनी महाराष्ट्रातील निरनिराळ्या विभागांतील पाण्याच्या उपलब्धीचा अभ्यास केला. तसेच निरनिराळ्या भागांतील जमिनी, पाऊस, हवामान, पर्यावरण, वनस्पती व पिके यांचा साकल्याने अभ्यास करून महाराष्ट्राचे कृषी हवामानविषयक वैशिष्ट्यपूर्ण विभाग पाडले. त्यांच्या या मौलिक कामाचा शेती नियोजनासाठी कायमस्वरूपी उपयोग होत आहे. किबे १९६३ ते १९६५ दरम्यान पुणे येथे महाराष्ट्र सरकारचे कृषि-रसायनतज्ज्ञ व १९६५ ते १९६७ दापोली येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करून सेवानिवृत्त झाले. त्यानंतरही खत उद्योग आस्थापनांना आणि विद्यार्थी व संशोधक यांना ते सल्ला व मार्गदर्शन करत होते. त्यांच्या कार्यकाळात १९४७-४८मध्ये बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या अभ्यासासाठी व १९५०मध्ये बँकॉक येथे आंतरराष्ट्रीय मृदाशास्त्र परिषदेस मुंबई राज्याचे प्रतिनिधी म्हणून ते हजर राहिले. त्यांना संगीताची आवड होती आणि ते व्हायोलिन व बासरीवादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत. त्यांची शैली विनोदी व हसतखेळत काम करण्याची होती. त्यांचे पुणे येथे निधन झाले.

      - डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

किबे, मनोहर माधव