Skip to main content
x

कळमकर, रामचंद्र जयकृष्ण

       रामचंद्र जयकृष्ण कळमकर यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. त्यांचे वडील जयकृष्ण विनायक कळमकर हे अमरावती जिल्ह्यातील वरुड या गावचे एक प्रयोगशील शेतकरी, जमीनदार आणि सावकार होते. त्यांचे शालेय शिक्षण वरुड येथे झाले आणि नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमधून ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून बी.एस्सी. (कृषी) पदवी घेतली. त्यात विशेष प्रावीण्य मिळवल्यामुळे त्यांना उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांना गणित आणि जीवसांख्यिकी या विषयांमध्ये विशेष गोडी होती. म्हणून त्यांनी लंडन येथील रॉथॅमस्टेड एक्सपरिमेंटल स्टेशनची निवड केली. तेथील डॉ.रोनाल्ड एल्मर फिशर हे जीवशास्त्रात गणित आणि संख्याशास्त्राचा वापर करण्यासाठी विख्यात होते. डॉ.फिशर यांच्या मार्गदर्शनाखाली कळमकर यांनी १९३२मध्ये पीएच.डी.चा प्रबंध सादर केला. त्या वेळेस प्रबंधातील विषय आपल्या समजण्यापलीकडे आहे, असे प्रांजळ मत मांडून तो प्रबंध तपासण्यासाठी प्रा. ई.एस.बीवेन आणि प्रा.जी.यू. यूल यांनी असमर्थता व्यक्त केली. अ‍ॅबरडीन विद्यापीठाचे प्रा.जे.एफ. टोशर यांनी हा प्रबंध तपासला, त्याच वर्षी त्यांना लंडन विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली.

       रॉथॅमस्टेड येथे मार्च ते मे दरम्यान नेहमीपेक्षा एक इंच पाऊस जास्त झाल्यास तेथील मॅनगोल्डसच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होईल,असे मत कळमकर यांनी मांडले होते.‘थिअरी ऑफ रॅन्डमायझेशन’ला स्वीकृती मिळाल्यावर त्यांची ख्याती वाढत गेली. त्यामुळे १९३६मध्ये त्यांची बंगळुरू येथील नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य म्हणून निवड झाली. सरकारने त्यांना ‘रावसाहेब’ किताब बहाल केला, परंतु देशाभिमानी वृत्तीमुळे  कळमकर यांनी तो किताब कधीही वापरला नाही आणि त्याचा उल्लेखही केला नाही.

       इंग्लंडहून परतल्यानंतर त्यांनी पुणे येथील हवामानशास्त्र विभागामध्ये काम केले. त्यांनी डॉ.एल.ए. रामदास यांच्याबरोबर काही संशोधन लेख प्रकाशित केले. विशिष्ट भागातील हवामान आणि त्याचा स्थानिक पिकांवर होणारा परिणाम याविषयीचे हे संशोधन लेख होते. उदा.अकोला आणि जळगाव येथील कापूस उत्पादनावर होणारा हवामानाचा परिणाम, पुण्यातील अधिकतम तापमानाचा अभ्यास,भारतातील रेगूर मातीचे वर्गीकरण, इ.कृषी हवामानशास्त्र हा विषय डॉ.कळमकर यांच्या अभ्यासातून विकसित झाला आणि आता देशातील प्रत्येक कृषी विद्यापीठात अभ्यासला जातो. पुढे त्यांनी मध्य भारत-सेंट्रल प्रॉव्हिन्सेस आणि बेरार सरकारच्या खात्यात जबलपूर येथील उपसंचालकपदाचा पदभार स्वीकारला. त्याच पदावर ते नागपूरला आले. मृदा आणि पाणी यांचे संरक्षण यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना अमेरिकेत पाठवण्यात आले. तेथे ते सुमारे दीड वर्ष होते. तेथून परत आल्यानंतर त्यांची प्रतिनियुक्ती मृदा संधारण सल्लागार म्हणून नवी दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रीसर्च येथे झाली. त्यानंतर राज्य सरकारच्या बोलावण्यावरून नागपूर येथे अ‍ॅग्रिकल्चरल रीसर्च अँड एज्युकेशन संचालक आणि त्यानंतर कृषि-संचालक या पदांवर काम केले. कृषी मंत्रालयात नवी दिल्ली येथे भारत सरकारचे कृषि-आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली १९५७मध्ये एक दल चीनला गेले.

       कळमकर १९५९मध्ये मध्य प्रदेशमध्ये रेवा येथे कृषि-संचालक पदावर आले आणि १९६०च्या मध्यापर्यंत तेथे होते. या काळात त्यांनी मृदा संधारण, ग्रीन मॅन्युअरिंग, लँड रिक्लेमेशन, वॉटर हार्वेस्टिंग यांसारखे अनेक नवे बदल घडवून आणले. त्यांनी १९६०-६३मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘फूड अँड अ‍ॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन’च्या तांत्रिक साहाय्याच्या विस्तारित कार्यक्रमांतर्गत इराक सरकारच्या बगदाद येथील कृषी मंत्रालयात कृषी संशोधन संस्थेचे सल्लागार म्हणून काम केले. त्या देशातील कृषीविषयक विकासाचा आराखडा त्यांनीच तयार केला.

       संख्याशास्त्रीय पृथक्करण, मृदाशास्त्र, माती आणि पाण्याचे संरक्षण हे त्यांचे आवडीचे विषय होते. त्यांनी ‘इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स’चे उपाध्यक्षपद आणि अध्यक्षपद भूषवले. भारतातील सर्वच कृषी संशोधन केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या व तेथील संशोधनाला चालना दिली आणि झालेल्या संशोधनावरील लेख प्रसिद्ध केले. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना एम.एस्सी. आणि पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत सादर होणार्‍या प्रबंधांचे ते परीक्षण करत. जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे ते सदस्य होते. बडोदा येथे १९५५ साली झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या कृषी विभागाचे ते अध्यक्ष होते.

       डॉ.कळमकर यांचा विवाह यमुना मनूरकर यांच्याशी झाला. त्या बनारस हिंदू विद्यापीठात संस्कृतच्या प्राध्यापिका होत्या. त्यांच्या संस्कृतप्रेमाने डॉ.कळमकर भारावले आणि त्यांनी नाशिक येथील सातवळेकर संस्कृत विद्यापीठातून संस्कृतची पदवी मिळवली. त्यापाठोपाठ नागपूर विद्यापीठातून त्यांनी एम.ए. संस्कृतचे पहिले वर्ष पूर्ण केले. त्यांना दुसरे वर्ष पूर्ण करण्यासाठी पोषक संधी मिळाली नाही, तरी त्यांनी या भाषेवर प्रभुत्व मिळवले आणि नागपूर येथील संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

       संस्कृत भाषेतील साहित्य, धार्मिक साहित्य याशिवाय वैज्ञानिक ग्रंथ वैज्ञानिकांनी वाचावेत, असे त्यांना वाटत असे. संस्कृत भाषा प्रचारिणी सभेतर्फे दरवर्षी नामवंत संस्कृत अभ्यासक जगन्नाथ पंडित यांच्या ‘गंगा लहरी’ या काव्यरचनेवर ‘गंगा दसरा’च्या सायंकाळी डॉ.कळमकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यान आयोजित केले जाते. वरुड या गावी १९५६मध्ये वीज पोहोचावी, यासाठी कळमकर यांनी विशेष प्रयत्न केले. अमेरिकेतील शिकागो येथे आपल्या मुलीकडे गेले असताना त्यांचे निधन झाले.

- डॉ. अनिल मोहरीर

कळमकर, रामचंद्र जयकृष्ण