कमळे, शिरेप्पा
शिरेप्पा उर्फ दीनानाथ कमळे गुरुजींचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबातील मातापित्यांच्या पोटी झाला. त्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षीच आईचे निधन झाले. गुरुजींचे जन्मगांव दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे या ठिकाणी फक्त सातवीपर्यंत शिक्षणाची सोय असल्याने पुढे त्यांना शिक्षण घेता आले नाही. या काळात गुरुजींना कै. हणमंत मल्लीकार्जुन कोळी, कै. नरहर बळवंत जोशी यांच्यासारखे देशभक्त व आदर्श शिक्षक लाभल्याने गुरुजींवर शालेय वयातच देशभक्ती व आदर्श नागरिकाचे कसदार संस्कार झाले. गावातील मागासवर्गीय लोक वेशीबाहेर अत्यंत दयनीय जीवन जगत असल्याचे पाहून त्या वयातही ते व्यथित होत असत. सातवी म्हणजे त्यावेळेच्या व्हर्नाक्युलर परीक्षेत प्रथम आलेल्या गुरुजींनी पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोळी येथे १९४० मध्ये तात्पुरती शिक्षकाची नोकरी स्वीकारली. १९४२ पासून ते बेलाटी ता. दक्षिण सोलापूर येथे शिक्षक म्हणून काम करू लागले. १९४२ ते १९४९ या काळातच त्यांनी नोकरी केली.
१९४९ मध्ये पूर्ण वेळ देशसेवा व समाजसेवा करण्यासाठी त्यांनी शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा दिला. शालेय वयापासूनच त्यांना वाचनाची आवड असल्याने नोकरीच्या काळात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, विनोबा भावे, साने गुरुजी, जे. कृष्णमूर्ती, संत गाडगेबाबा, कार्ल मार्क्स इ.च्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. साम्यवाद व समाजवादी विचारांचा अंगीकार त्यांनी केला. सोलापूरातील भाई छन्नुसिंग चंदेले, देशभक्त तुळशीदासजी जाधव, डॉ. अंत्रोळीकर या व इतर अनेक स्वातंत्र्यसेनानीच्या बरोबरीने त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. सुखी व सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शिक्षण हे अतिशय परिणामकारक व प्रभावी माध्यम आहे हा विचार गुरुजींनी स्वीकारला व प्रत्यक्षात साकारला. म्हणूनच गुरुजींचे शिक्षणविषयक प्रयोग हे आगळेवेगळे व त्यांनी अंगिकारलेल्या समाजवादी विचारसरणीशी ते सुसंगत ठरले.
स्वातंत्र्यानंतर देशप्रेमाने भारावून गुरुजींनी स्वतःला सक्रीय समाजकारण व राजकारणात झोकून दिले. त्यांच्या मते, 'स्वराज्य तर मिळाले आता सुराज्यासाठी झटण्याची गरज आहे, त्यासाठी शिक्षण प्रसाराच्या माध्यमातून लोकजागृती करण्याची मोहीम हाती घेणे आवश्यक आहे.' त्या दृष्टीने १९५० मध्ये सोलापुरातील नेहरुनगर येथे मुलामुलींना शिक्षण घेता यावे म्हणून एक व्यापक शिक्षण संकुल निर्माण केले. चंद्राम चव्हाण गुरुजी, गणपती जाधव, खेमू राठोड या मंडळींनी याकामी गुरुजींना खंबीर साथ दिली.
१९५२ मध्ये कमळे गुरुजींची जिल्हा स्कूल बोर्डावर निवड झाली. त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील तांड्यातांडयांवर शाळा सुरु केल्या. या तांड्यांवर फक्त चौथ्या इयत्तेपर्यंतच शिक्षणाची सोय होती. या मुलामुलींना पुढील सर्वसाधारण व व्यावसायिक शिक्षण घेता यावे म्हणून गुरुजींनी नेहरुनगर, सोलापूर येथील संकुलात पारंपारिक शिक्षणाबरोबरच शेती, डेअरी, कुक्कुटपालन व इतर जीवनोपयोगी उद्योग-व्यवसायांच्या प्रशिक्षणाची सोय केली. १९५७ मध्ये गुरुजींची जिल्हा विकास मंडळाच्या सचिवपदी नेम़णूक झाली. त्या कालखंडात भटक्या विमुक्त जातींच्या लोकांसाठी केंद्र सरकारने विकास योजना मागविल्या होत्या. गुरुजींनी नेहरुनगरची योजन सादर केली. या योजनेस शासनाची मंजुरीही मिळवून दिली. त्यातून साने गुरुजी वसतिगृह, वाल्मिकी वसतिगृह, शिवाजी डी.एड. महाविद्यालय, इंदिरा बालविकास मंदिर, मुलींसाठी विजयालक्ष्मी वसतिगृह, गांधी आश्रम शाळा इ. अनेक शैक्षणिक प्रकल्प उभे राहिले. या प्रकल्पाच्या विकासापासून कै. मोतीलाल नेहरु विद्यापीठ स्थापन करावे अशी मनोमन इच़्छा गुरुजींची होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवडे हे गुरुजींचे जन्मगांव हा भाग शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला होता. दि. ३ जून १९५६ रोजी गुरुजींनी 'सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ' ही संस्था स्थापन केली. या मंडळाच्या माध्यमातून भंडारकवडे, विंचूर, कंदलगांव, औंराद, बरुर व मंडुप येथे ग्रामस्थांच्या मदतीने माध्यमिक विद्यालये भंडारकवडे, मंडुप, बरुर व कंदलगांव येथे उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय केली.
ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांना घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही हे जाणून त्यांचे शिक्षण व राहण्या-जेवणाची सोय व्हावी म्हणून भंडारकवडे व मंडुप येथे मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृहाची सोय केली. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय झाल्यानंतर उच्च शिक्षणाची गरज ओळखून गुरुजींनी भीमरावजी पाटील वडकबाळकर व सुशीलकुमार शिंदे यांच्या सहकार्याने २००१ मध्ये मंडुप येथे संतोष भीमराव पाटील महाविद्यालय स्थापन केले. सध्या हे महाविद्यालय सोलापूर विद्यापीठातील गुणवत्तापूर्ण व उपक्रमशील महाविद्यालय म्हणून ओळखले जाते.
या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणारे अध्यापक व सेवक यांची निवड करीत असताना गुरुजींनी अत्यंत पारदर्शकपणे गुणवत्ता हा निकष विचारात घेऊनच निवड केली. एवढेच नव्हे तर तळमळ, गरिबीची व देशप्रेमाची चाड असणार्या सेवकांत प्राधान्य दिले. संस्थेतील शिक्षक हा समाजाचाही शिक्षक असला पाहिजे त्यासाठी अध्यापनकार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी मानून शिक्षकाने समाजामध्ये कृषी विकास, आरोग्य संवर्धन व साक्षरताप्रसार यासाठी प्रबोधन केले पाहिजे व त्यासाठी शिक्षकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे हे ओळखून गुरुजींनी शैक्षणिक व प्रबोधन शिबिर ही योजना साकारली. प्रतिवर्षी संस्थेतील शिक्षक व सेवकांसाठी तीन दिवसांचे निवासी शिबिर घेतले जाते. १९८७ पासून ही योजना सुरू आहे. या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत वक्ते व अभ्यासकांना निमंत्रित केले जाते. ग्रामस्थही यामध्ये सहभागी होतात. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व संकटात सापडलेल्या शिक्षकाला संरक्षण आणि मदत करण्याचे गुरुजींचे धोरण होते.
शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबरोबरच कमळे गुरुजींनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात ही महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून पक्षाची बांधणी करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांचा लोकसंग्रह अफाट होता. राजकारणात राहूनही स्पष्टवक्तेपणा, परखड विचार मांडण्याचा स्वभाव असल्याने ते अडचणीतही येत असत. परंतु त्याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. आमदार म्हणून कार्यरत असताना शासनाच्या अनेक महत्त्वाच्या समितीवर त्यांनी अगदी प्रमाणिकपणे व निस्पृह वृत्तीने कार्य केले. मंत्रिपदाच्या कारकिर्दीत शेतमजूर संघटना, निर्मलाताई देशपांडे यांचा रचनात्मक समाज, डॉ. बाबा आढाव यांच्या 'श्रमाची भाकर' ‘हमाल पंचायत’ यासारख्या अनेकांच्या संस्थांना कमळे गुरुजी भेटी देत असत व विचारपूस करीत असत.
कमळे गुरुजींनी सोलापूर जिल्ह्यात जे सामाजिक काम केले ते महात्मा गांधींच्या विचारसरणीला अनुसरून अशाच प्रकारे होते. त्यांचा 'बेलाटी प्रयोग' हा त्या काळी महाराष्ट्रात स्तुत्य ठरला. महात्मा गांधी यांची 'ग्रामस्वराज्य योजना' ही कमळे गुरुजींनी बेलाशी व दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावामध्ये साकारण्याचा प्रयत्न केला. गावातील रस्ते बांधणी व दुरुस्ती श्रमदानाने घडवून आणणे, गावातील मंदिरे व पिण्याच्या पाण्याच्या विहिरी सर्वांना खुल्या करणे, गावातील तंटेबखेडे हे गावातील न्यायदान मंडळापुढे सोडविणे, स्वच्छग्राम योजना, गावात व्यसनमुक्ती, अस्पृश्योद्धार, स्त्रीशिक्षण, प्रौढशिक्षण, सामुदायिक विवाह, अंधश्रद्धा निर्मूलन, गांधीजींची मूलोद्योग योजना इ. अनेक योजना व प्रयोग गुरुजींनी ग्रामीण भागात अत्यंत परिश्रम घेऊन राबविले. विशेष म्हणजे गुरुजींनी वृक्षारोपण कार्यात फार मोठा पुढाकार घेतला होता. ग्रामीण भागात वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. झाडांना स्वातंत्र्यसैनिकांची नांवे देण्याची अभिनव कल्पना त्यांनी राबविली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या प्रयोगाला भेट देऊन दोन दिवस वास्तव्य केले. १९४८ मध्ये या प्रयोगाला महाराष्ट्र सरकारचे आदर्श ग्रामसेवेचे बक्षिस मिळाले.
गुरुजींच्या एकूण वाटचालीत त्यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे योगदान फार मोठे होते. समाजातील तळागाळातील लोकांसाठी गुरुजी अहोरात्र परिश्रम करीत असत. म्हणूनच शिक्षिका असलेल्या निर्मलाताईंनी मोठ्या अभिमानाने त्यांचे नाव ‘दीनानाथ’ असे ठेवले होते. सोलापूर जिल्ह्यातील सामान्य, उपेक्षितांच्या कल्याणासाठी गुरुजींनी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून जे काम उभे केले त्याचा गौरव केंद्र सरकारनेही केला. गुरुजींच्या या कार्याची केंद्र सरकारने दखल घेऊन परदेशातील सामाजिक संस्थांच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी गुरुजींना अनेक देशांना जाण्याची संधी दिली. त्यांनी मलाया, सिंगापूर, सिलोन, रशिया, इंडोनेशिया इ. देशातील सामाजिक व सांस्कृतिक विकासाचा अभ्यास केला. कमळे गुरुजी आयुष्यभर समाजसेवेचे व्रतस्थ जीवन जगले.