कणेकर, शिरीष
क्रिकेट व हिंदी चित्रपट या विषयांवर अधिकाराने, माहितीपूर्ण परंतु रंजनाच्या वळणाने लिहिण्याची शैली असलेले शिरीष कणेकर हे एक लोकप्रिय लेखक आहेत. त्यांचा जन्म ६ जून १९४३ रोजी झाला. बी.ए., एल.एल.बी. या पदव्या संपादन केल्यावर त्यांनी इंडियन एक्सप्रेस, डेली फ्री प्रेस जर्नल, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन केले.
विनोदी, रंजक, खिल्ली उडवणारे म्हणून लोकप्रिय होणारे लेखन करण्यात ते पटाईत आहेत. चित्रपट विषयावर त्यांनी लिहिलेली ‘माझी फिल्लमबाजी’ (१९८२), ‘सिनेमा डॉट कॉम’, ‘नट बोल्ट बोलपट’, ‘यादों की बारात’ (१९८५), ‘पुन्हा यादों की बारात’, ‘गाये चला जा’ ही पुस्तके गाजली. क्रिकेट विषयावर टोलेबाजी करणारी ‘फटकेबाजी’, ‘क्रिकेटवेध’ (१९८३) ही पुस्तके सर्व वयांतील वाचकांची वाहवा मिळवून गेली.
‘मेतकूट’, ‘चहाटळकी’, ‘चापटपोळी’, ‘खटलं आणि खटला’, ‘मखलाशी’, ‘नानकटाई’, ‘मनमुराद’, ‘डॉ. कणेकरांचा मुलगा’, ‘लगाव बत्ती’, ‘गोली मार भेजे मे’, ‘गोतावळा’, ‘डॉलरच्या देशा’, ‘इरसालकी’, ‘साखरफुटाणे’, ‘सूरपारंब्या’, ‘कणेकरी’, ‘वेचक शिरीष कणेकर’, ‘एकला बोला रे’, ‘चापलुसकी’, ‘ते साठ दिवस’, ‘रहस्यवल्ली’, ‘शिरिषासन’, ‘पुन्हा शिरिषासन’, ‘कणेकरायन’ या त्यांच्या पुस्तकांतून त्यांनी नर्म विनोदी जीवनदर्शन घडविले आहे. आपल्याशी ते गप्पा मारताहेत, अशी त्यांची भाषाशैली आहे.
क्रिकेट हे शिरीष कणेकरांचे पहिले प्रेम आहे. आजही ते तेवढ्याच तीव्रतेने टिकून आहे. वाचनीयता, निर्भीडपणा, प्रांजलपणा, प्रसन्नता, नर्म विनोद, सूक्ष्म निरीक्षण व विषयाचे प्रेम ही त्यांच्या ओघवत्या ‘कणेकरी’ शैलीची वैशिष्ट्ये होत. व्यक्तिचित्रे रेखाटणे ही त्यांची खासियत. ‘एकला बोलो रे’ हा त्यांचा ‘स्टँडिंग टॉक शो’ स्वरूपाचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाला.
भेटलेल्या इरसाल व्यक्तीबद्दल ते म्हणतात- ‘देवानं नामी नग जन्माला घातलेत. मला त्यांचा आणि त्यांना माझा सहवास घडवून देवानं आमच्यावर अनंत उपकार केलेत. आम्ही सगळे मिळून जगात धुमाकूळ घालीत असू. देवाच्या सर्कशीतले आम्ही विदूषक आहोत. आम्ही हसवतो. आम्हांला हसतात. आम्ही अश्रूंना पापण्यांवर रोखून धरतो. घुसखोरी करू देत नाही. आम्हांला इरसाल म्हणा, वाह्यात म्हणा, नग म्हणा... आयुष्याचं ओझं वाहण्यासाठी असे साथीदार हवेत.’ त्यांच्या या शब्दांतून कणेकरी वृत्ती प्रतीत होते. कै. विद्याधर गोखले पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार यांनी त्यांच्या साहित्याचा गौरव केला आहे.