Skip to main content
x

कोरगावकर दत्ता

के दत्ता

      संगीतातील ज्येष्ठतेमुळे संगीतकार सी. रामचंद्र, वसंत देसाई, दत्ता डावजेकर वगैरे मराठी संगीतकारांकडून वारंवार वाहवा मिळवणारे संगीतकार म्हणजे के. दत्ता. चित्रपटसृष्टीत के. दत्ता म्हणून परिचित असणारे दत्ता कोरगावकर यांचे घराणे सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे. गावातले कुलकर्णीपण करणारे त्यांचे आजोबा गोव्यामध्ये जाऊन राहिले. तेथेच के. दत्ता यांचा जन्म झाला. दत्ता कोरगावकर यांचे वडील वारंवार नोकरी बदलत असल्यामुळे पडणाऱ्या शिक्षणातील खंडामुळे सावंतवाडी येथे कायमचे बिऱ्हाड करण्याचे ठरवले. म्हणून दत्ता यांचे शालेय शिक्षण सावंतवाडी येथेच पार पडले. तेथेच त्यांच्या घराशेजारी एक गवई राहत. त्या गवयाचा रियाझ ऐकून दत्ता यांनाही संगीताची गोडी लागली. ते हार्मोनियम व पायपेटी वाजवून गाणे म्हणू लागले.

     शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी व सोबत नोकरी करण्याच्या निमित्ताने दत्ता मुंबईत स्थिरावले. पण महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा संगीताकडे त्यांचा कल असल्याने ते गांधर्व महाविद्यालयामध्ये व बी.आर. देवधरांच्या संगीताच्या शिकवण्यांमध्ये जास्त वेळ उमेदवारी करत असल्यामुळे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण संपुष्टात आले व त्यांना आपोआपच संगीताची दारे खुली झाली.

     १९३७ च्या दरम्यान मा. विनायक मुंबईत फिल्म सिटीत ‘धर्मवीर’ या चित्रपटाचे चित्रीकरण करीत होते, तेव्हा दत्ता यांच्या तेथे वाऱ्या चालत. या दरम्यानच चित्रपटाची नायिका थोडी बेसूर होत असल्याचे दत्ता यांनी संगीत दिग्दर्शक अण्णासाहेब माईणकर यांच्या नजरेस आणून दिले. त्यांची संगीतातील जाण बघून खूश झालेल्या मा. विनायक यांनी त्यांचे नाव चित्रपटाच्या हजेरी पटावर लावून घेतले. पुढे ‘प्रेमवीर’ या चित्रपटाच्या वेळेसही ते हजेरी पटावर होते. ‘प्रेमवीर’ या चित्रपटापासून मराठी चित्रपटात पार्श्वगायनाची सुरूवात झाली. मा. विनायक १९३८ मध्ये ‘ब्रम्हचारी’ या चित्रपटाच्या निमित्ताने कोल्हापूरला आले. त्याच स्टुडिओत सुरू असलेल्या ‘चंद्रराव मोरे’ नावाच्या मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून विनायक यांनी के. दत्ता यांच्या नावाची शिफारस केली. हाच त्यांचा पहिला स्वतंत्र चित्रपट. याच वेळी त्यांनी दत्ता कोरगावकर हे आपले मूळ नाव बदलून के. दत्ता हे नाव धारण केले.

     हंस पिक्चर्सतर्फे १९३९ मध्ये मराठीत ‘सुखाचा शोध’ तर हिंदीत ‘मेरा हक’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांना के. दत्ता यांचेच संगीत होते. त्यानंतर सिर्को कंपनीचा ‘गीता’ (हिंदी/मराठी) ‘गोरा कुंभार’, भालजी पेंढारकरांचे ‘गोरखनाथ’ (मराठी), ‘अलख निरंजन’ (हिंदी), ‘सूनबाई’, ‘महात्मा विदुर’ (हिंदी/मराठी) असे अनेक चित्रपट दत्ता यांनी केले. नंतरच्या काळात ते प्रामुख्याने हिंदीत स्थिरावले. नूरजहाँची चार गाणी असलेला ‘नादान’, मझहर खान यांचा ‘याद’, मा. विनायक यांचा ‘बडी माँ’ हे चित्रपटही के. दत्ता यांनी केले. ‘बडी माँ’मध्ये नायिका नूरजहाँ असली तरी लता मंगेशकर यांची या चित्रपटात छोटीशी भूमिका होती. तेव्हा या चित्रपटाचे संगीत खूप गाजले.

     के. दत्ता यांनी मराठी चित्रपटांनाही संगीत दिले होते. त्यात बाबूराव पै यांच्या ‘गळ्याची शपथ’, तसेच ‘जमीन’ व ‘महारथी कर्ण’ या चित्रपटाचेही संगीत दिग्दर्शन केले. पुढे ‘सोनेरी सावली’ व ‘कलगी तुरा’ या चित्रपटानंतर बऱ्याच कालावधीने त्यांनी ‘रायगडचा राजबंदी’ हा चित्रपट केला. तोच त्यांच्या अखेरचा मराठी चित्रपट. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ‘अजनबी’ या (हिंदी) चित्रपटाचे संगीत अर्धवट सोडावे लागले.

      मुंबई येथे हृदयविकाराच्या तीव्र  झटक्याने के. दत्ता यांचे निधन झाले.

- शशिकांत किणीकर

कोरगावकर दत्ता