कॉर्व्हिनस, गुडरून
डॉ. गुडरून कॉर्व्हिनस यांचा जन्म पोलंडमध्ये स्टेटीन येथे झाला. बॉन विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यापुढील शिक्षणासाठी ट्युबिंगन विद्यापीठात गेल्या. त्यांना लहान वयापासूनच भूविज्ञानाचे व निसर्गविज्ञानाचे आकर्षण होते. त्यांनी फ्रान्समधील जुरासिक कालखंडाच्या जीवाश्मांच्या अध्ययनावर डॉक्टरेट पदवी संपादन केली. याच काळात त्यांच्या प्रबंधाचे परीक्षक प्रा. एफ.ई. झॉयनर यांच्यामुळे त्या पुरातत्त्व या विषयाकडे ओढल्या गेल्या.
विवाहानंतर १९६१मध्ये डॉ. कॉर्व्हिनस भारतात आल्या व त्यांचा संबंध डेक्कन महाविद्यालयामधील प्रागैतिहासिक संशोधकांशी आला. त्यांनी चंदिगढ येथील प्रा. एम.आर. सहानी यांच्या मार्गदर्शनाखाली १९६४ ते १९६७ या काळात प्रवरा नदीच्या परिसरात अश्मयुगीन संस्कृतीच्या स्थळांचे सर्वेक्षण केले. प्रा.ह.धी. सांकलिया यांच्या प्रेरणेने डॉ. कॉर्व्हिनस यांनी नेवासाजवळील चिरकी या ठिकाणी उत्खनन (१९६७-१९६९) केले. अश्मयुगीन अवजारांच्या सखोल विश्लेषणामुळे भारतीय उपखंडातील प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय संशोधनात हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. डॉ. कॉर्व्हिनस यांनी भारतात सर्वप्रथम अश्मयुगीन अवजार तयार करण्याच्या कोम्बेवा तंत्राचे संशोधन केले. तसेच त्यांनी अवजार बनवणारी व्यक्ती उजखुरी की डावखुरी होती यावर प्रकाश टाकला.
चिरकी उत्खनन पूर्ण करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर डॉ. कॉर्व्हिनस यांनी १९७२ ते १९८४ या काळात आफ्रिकेत अनेक ठिकाणी (ओल्डुवाय गॉर्ज, नामिबिया व दक्षिण आफ्रिका) काम केले. डॉ. कॉर्व्हिनस १९८४मध्ये पुन्हा भारतीय उपखंडातील प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय संशोधनाकडे आल्या व सलग बारा वर्षे त्यांनी हिमालय व शिवालिक पर्वतरांगांमध्ये काम केले. त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या कार्यरत होत्या.