Skip to main content
x

कर्डिले, एकनाथ महिपती

      एकनाथ महिपती कर्डिले यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील बुऱ्हाणनगर गावात झाला. दि. २० ऑक्टोबर १९६१ पासून त्यांनी भूसेनेतील पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये सेवेस सुरुवात केली. दि. ४ डिसेंबर १९७१ च्या रात्री मराठा लाइट इन्फन्ट्रीकडे पूर्व विभागातील शत्रूचे एक ठाणे काबीज करण्याची कामगिरी सोपवण्यात आली. सैन्याने योजनेप्रमाणे हल्ला चढविला. परंतु, शत्रूच्या मोर्चातील एका बंकरमधील मध्यम पल्ल्याच्या मशिनगनमधून अचूक व सातत्यपूर्ण मारा होत होता. त्यामुळे आपल्या सैन्याची आगेकूच थोपवून धरली गेली होती.
        कर्डिले यांनी त्या बंकरवर हल्ला चढवला व मशिनगनचा मारा बंद पाडण्यात यश मिळवले. त्यामुळे भारतीय सैन्याला शत्रूचे ठाणे जिंकून घेणे शक्य झाले. परंतु, हे करत असताना मशिनगनची एक गोळी कर्डिले यांच्या वर्मी लागली आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले. एकनाथ महिपती कर्डिले यांनी शत्रूशी दोन हात करताना अद्वितीय पराक्रम आणि जिद्दीचे प्रदर्शन घडवीत देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. या कामगिरीबद्दल कर्डिले यांना मरणोत्तर वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

-संपादित

कर्डिले, एकनाथ महिपती