Skip to main content
x

करंबेळकर, प्रभाकर लक्ष्मण

करंबेळकर, शंकरराव

       प्रभाकर लक्ष्मण करंबेळकर हे कऱ्हाडवासियांना शंकरराव म्हणून परिचित आहेत. त्यांचा जन्म कराड तालुक्यातील इंदोली ह्या खेड्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदोली गावात झाले. मॅट्रिकनंतर १९३६ मध्ये पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयामधून ते बी. ए. झाले. १९३७ मध्ये तासगाव येथील शाळेत त्यांची शिक्षक म्हणून व्यवसायास सुरुवात झाली. १९३८ व १९३९ ही दोन वर्षे त्यांना नोकरी नव्हती. पण याच दोन वर्षांत ‘मायाबाजार’ ह्या चित्रपटातील गीतांची रचना त्यांनी केली. १९४० मध्ये बेळगावच्या महाविद्यालयामधून त्यांनी बी.टी. पदवी मिळविली.

     १९४० मध्ये कऱ्हाड येथील महाराष्ट्र विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून शंकरराव दाखल झाले. या विद्यालयात पाच वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य उत्तम प्रकारे केले. पण नंतर संस्थाचालकांशी मतभेद झाले व अकरा समविचारी सहकाऱ्यांसह त्यांनी संस्थेला रामराम ठोकला. यशवंतराव चव्हाण, पु. पा. गोखले आणि कर्‍हाडमधील शिक्षणप्रेमी मान्यवरांच्या सहकार्याने शंकररावांनी १९४५ मध्ये शिवाजी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ केली. शंकरराव संस्थेचे सरचिटणीस म्हणून काम पाहू लागले.

      त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था मोठी होत गेली. संस्थेचे विज्ञान महाविद्यालय उभे राहिले. कला,वाणिज्य महाविद्यालय साकारले. या सर्व महाविद्यालयांचा व्याप एवढा वाढला की नंतर त्यांची स्वतंत्र महाविद्यालये झाली आहेत. कर्‍हाडजवळील गावांतून त्यांनी शाळा काढल्या व गरजवंतांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली.  नंतरच्या काळात शंकररावांनी शिशू शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याचबरोबर लहानपणापासून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांसाठी रात्रशाळा सुरू केली. शिक्षकाने मुलांना फक्त बौद्धिक दृष्ट्या साक्षर करणे त्यांना कधीच रुचले नाही. शाळेत घडवला जाणारा प्रत्येक विद्यार्थी भावसाक्षरही झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. याचाच अर्थ असा की त्या काळातही बुद्ध्यांकाइतकेच (आय. क्यू.) भावनांकाला (इ.क्यू.) महत्त्व आहे हे त्यांनी जाणले होते.

      ज्या शिक्षणक्षेत्रात त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले तेथे कार्य करीत असताना त्यांनी आपले विचार सतत परखडपणे मांडले. अहमदनगर येथील १९६२ सालची मुंबई माध्यमिक परिषद, १९६५ सालचे नाशिकमधील मुख्याध्यापक अधिवेशन त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणांनी गाजविले. शिक्षण क्षेत्रात कार्य करीत असणारे शंकरराव पुढे कर्‍हाडचे नगराध्यक्षही झाले म्हणूनच शिक्षण, साहित्य व समाजकार्याच्या क्षेत्रात सतत कार्य करीत राहणारे शंकराव करंबेळकर, कर्‍हाडचे ‘सार्वजनिक काका’ ह्यांना दक्षिण महाराष्ट्रातील एक व्यवहारी शिक्षणतज्ज्ञ म्हणून लौकिक लाभला.

- डॉ. अ. श्री. भागवत

करंबेळकर, प्रभाकर लक्ष्मण