Skip to main content
x

करंदीकर, जनार्दन सखाराम

जुन्या जमखिंडी संस्थानातील कुंदगोळ येथे जनार्दन सखाराम करंदीकर यांचा जन्म झाला. १८९७मध्ये ते फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. झाले. पुढे मुधोळच्या शाळेत हेडमास्तर होते. नंतर ते एल.एल. बी. झाले. नंतर ते धारवाड येेथे शिक्षक होते.

समर्थ विद्यालयात शिक्षक (१९०७) व तेथेच वसतिगृहाचे पर्यवेक्षक होते. याच सुमारास ‘समर्थ’ साप्ताहिकाचे व ‘ग्रंथमाला’ मासिकाचे ते सहसंपादक होते. ‘चित्रमय जगत’चे संपादन ते काही दिवस करीत असत. १९११मध्ये त्यांनी केसरीत लिहिण्यास सुरुवात केली व १९१२ साली सहसंपादक म्हणून त्यांची तेथे नेमणूक झाली. मुळशी सत्याग्रहात त्यांना १९२२मध्ये तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुणे येथील टिळक महाविद्यालयात ते इतिहास व अर्थशास्त्र हे विषय शिकवत असत. १९२७मध्ये वाईस भरलेल्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे व झाशीस भरलेल्या बृहन्महाराष्ट्र परिषदेचे ते अध्यक्ष होते. १९३१मध्ये ते केसरीचे मुख्य संपादक झाले. १९३२मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली.

त्यांची ग्रंथसंपदा : १. कौटिलीय अर्थशास्त्राचे मराठी भाषांतर (हिरवगावकर, नगर यांच्या सहकार्याने भाग १-२, १९२६-२८), २. जगातील क्रांतिकारक लढाया (कोसीच्या ‘डिसायसिव्ह बॅटल्स ऑफ दि वर्ल्ड’चे भाषांतर १९०८), ३. हिंदुत्ववाद, ४. भारतीय युद्धाचा कालनिर्णय ५. भारतीय युद्धाचा तिथिनिर्णय अथवा गीताजयंती निर्णय.

याशिवाय राजकारण, इतिहास, इतिहास संशोधन, अर्थशास्त्र, फलज्योतिष, पंचांग संशोधन, गीतार्थ-चर्चा, रामदासी वाङ्मय वगैरे विविध विषयांवर त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे विचार सूक्ष्म असून विचारांची पकड पक्की असते. त्यामुळे त्यांचे विशदीकरण आग्रही वाटले तरी महत्त्वाचे असते. त्यांची लेखणी विविध विषयात सफाईने चालत असे.

संपादित

करंदीकर, जनार्दन सखाराम