Skip to main content
x

करंदीकर, प्रभाकर दत्तात्रेय

     प्रभाकर दत्तात्रेय करंदीकर यांचा जन्म बारामती येथे  झाला. त्यांचे वडील आणि आजोबाही  वकील होते.  त्यांचे वडील अत्यंत तत्त्वनिष्ठ आणि सात्त्विक वृत्तीचे होते. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांना कारावासही झाला होता. पण त्यासाठी मिळणारे मान आणि मानधन त्यांनी स्वीकारले नाही. प्रभाकरांच्या मातोश्री पद्माताई, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या पदवीधर होत्या. त्यांनी गीता व संत साहित्याचा सखोल अभ्यास केला होता.

     प्रज्ञा, प्रतिभा आणि कर्तृत्व याचा सुंदर मिलाफ प्रभाकर करंदीकरांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यांनी आपल्या संपूर्ण प्रशासकीय कारकिर्दीवर आपल्या स्वच्छ आणि कर्तव्यनिष्ठ कामगिरीची मोहोर उठवली. त्यांचे माध्यमिक शिक्षण बारामतीच्या म.ए.सो. विद्यालयात झाले. शालान्त परीक्षेत बोर्डात त्यांचा चव्वेचाळीसावा क्रमांक आला. त्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात  झाले. या काळात अभ्यासाबरोबरच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातही त्यांनी लौकिक मिळवून आपली रसिकता प्रगट केली.

     १९६९ मध्ये राज्यशास्त्र विषयात पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांकाचे वझे पारितोषिक मिळवून ते बी.ए. झाले. याच विषयात एम.ए. करून ते आय.ए.एस. झाले आणि भारतीय शासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी पुणे जिल्हा परिषद प्रशासकीय प्रमुख, सोलापूर येथे  जिल्हाधिकारी, शेती महामंडळ, सी.कॉम, रस्ते महामंडळ अशा जबाबदार्‍या कौशल्याने पेलल्या.

     पंढरपूर क्षेत्रातील श्री दर्शनाची व्यवस्था हे त्यांचे उल्लेखनीय काम. शेती महामंडळाचे कार्यकारी संचालक असताना त्यांनी पडीक जागेत सुबाभूळ, सिल्व्हर ओक, साग यांच्या लागवडीला चालना दिली. पुणे येथे विभागीय आयुक्त म्हणून अतिशय उल्लेखनीय काम केले. बचतगटांच्या अगदी प्राथमिक अवस्थेत उत्कृष्ट मार्गदर्शन करून बँकेच्या माध्यमातून बचतगटांच्या कार्याचा पाया भक्कम केला.

     त्यांनी आर.एम.डी.आर. पुणे या संस्थेची ‘डिप्लोमा इन बिझिनेस अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट’ ही पदवी १९८२मध्ये मिळवली. १९८८मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत अभ्यास करून एम.एस्सी. ही पदवी मिळवली. त्यांनी सार्वजनिक आरोग्य, प्रगतीच्या पद्धती, नागरी नियोजन इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास केला. यासाठी भारत सरकारने विशेष शिष्यवृत्ती देऊन त्यांना इंग्लंडला पाठवले होते.

      आपल्या शासकीय सेवेत त्यांनी मुंबई महानगर पालिका उपायुक्त (१९८५ ते १९८८), महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट-मुख्य कार्यकारी अधिकारी (१९९१-१९९४), सीकॉम-व्यवस्थापकीय संचालक (फेब्रुवारी १९९४ ते एप्रिल १९९७), ग्रामीण विकास सचिव (जून १९९७ ते एप्रिल १९९८), अणुऊर्जा आयोग सहसचिव (अर्थ)-१९९८ ते २००१, रस्ते विकास महामंडळ उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक-२००१ ते २००३, पुणे विभागीय आयुक्त - जून२००३ ते एप्रिल२००७ आदी पदांवर यशस्वीरीत्या काम केले. पुणे विभागीय आयुक्तपदी काम करत असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सध्या ते ‘महिंद्र अँड महिंद्र’ मुंबई या कंपनीत कॉर्पोरेट सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.

      अत्यंत कर्तबगार, शिस्तप्रिय व पारदर्शक अधिकारी म्हणून करंदीकरांना अनेकवेळा गौरविले गेले आहे. भारत सरकारतर्फे १९८२मध्ये सोलापूर जिल्हा जनगणनेच्या कामातील कुशल संचालनासाठी राष्ट्रपती पदक देण्यात आले. १९९२मध्ये औद्योगिक पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रातील योगदानासाठी नेशन सिटिझन कमिटी, नवी दिल्ली तर्फे पुरस्कार, १९९३ मध्ये औद्योगिक विकास क्षेत्रातील  योगदानासाठी उद्योग रत्न पुरस्कार, टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्शिअम- पुणेच्या वतीने प्रशासन कौशल्यासाठी जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले गेले आहे.

     करंदीकर हे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून जसे गौरवास पात्र आहेत त्याप्रमाणेच त्यांचे मन अतिशय संवेदनशील आहे. ते एक प्रतिभासंपन्न कवी व लेखक आहेत. त्यांच्या चौफेर ज्ञानामुळे राज्य शासनामार्फत जी अभ्यास मंडळे नेमली जात त्यात त्यांचा समावेश असे. त्यामुळे त्यांचा जगभरातील अनेक देशांत प्रवास झाला. त्यांचे इंग्लिश  मासिकांतून तसेच दैनिके व नियतकालिकांतून प्रशासन, अर्थकारण या विषयावर अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाले. त्यांची ‘आदिबंध’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे.

     - विजया सस्ते

करंदीकर, प्रभाकर दत्तात्रेय