क्षीरसागर, श्रीकृष्ण केशव
श्री.के. क्षीरसागर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडोबाची पाल या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पाल व सातारा येथे झाले. सातार्याच्या शासकीय शाळेतून १९१८ साली मॅट्रिक झाल्यावर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण प्रथम धारवाड, कर्नाटक येथे झाले. पुण्याच्या फर्गसन कॉलेजमधून त्यांनी १९२२ साली बी.ए.ची पदवी प्राप्त केली. पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून त्यांच्या अध्यापनसेवेला सुरुवात झाली. पुढे १९४५ सालापासून याच संस्थेच्या एम.इ.एस. महाविद्यालयात ते प्राध्यापक झाले. १९६२ साली ते अध्यापनकार्यातून निवृत्त झाले.
विद्याव्यासंगाचे आणि वाङ्मयप्रेमाचे संस्कार क्षीरसागरांना घरीच मिळाले. त्यांना आजोबांकडून प्राचीन भारतीय वाङ्मय, वडिलांकडून इंग्रजी साहित्य आणि चुलत्यांकडून सौंदर्यवादी व आदर्शवादी दृष्टिकोनाचे संस्कार प्राप्त झाले. पुण्यातील वाङ्मयीन वातावरणात गोपीनाथ तळवलकर व भय्यासाहेब उमराणी या मित्रांच्या सहवासात त्यांची जडणघडण होत गेली.
१९२५ सालापासून त्यांनी फुटकळ लेखनास प्रारंभ केला. १९३१ साली शेजवलकरांच्या ‘प्रगती’ साप्ताहिकात त्यांनी क्रमशः, दीर्घ भावकथालेखन केले. पुढे ‘राक्षसविवाह’ या कादंबरीरूपाने ते प्रसिद्ध झाले. १९२६ साली ‘बायकांची सभा’ हे त्यांचे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यांनी प्रारंभी कविता, कथा असे ललितलेखन केले. १९३६ साली सावरकर आणि पटवर्धन यांच्या भाषाशुद्धीविषयक विचारांवर ‘सह्याद्री’ मासिकातून परखड टीका केल्याने ते प्रकाशात आले. याच काळात भाई डांगे यांच्या मार्क्सवादी भूमिकेवर व साने गुरुजी यांच्या उपदेशप्रधान वाङ्मयीन भूमिकेवर टीका करून त्यांनी आपल्या झुंजार, निर्भय आणि नि:स्पृह वृत्तीचा परिचय दिला.
पुढील आयुष्यात श्री.के.क्षी. अनेक मातब्बरांशी वाङ्मयीन वाद खेळले. ते वाद म्हणजे एकेक वाङ्मयीन चळवळ ठरली. ‘श्रीकेक्षी : वाङ्मयीन लेखसंग्रह’ या पुस्तकात या विविध वादांची झलक पाहायला मिळते.
भाषाशुद्धीप्रमाणेच अश्लीलतेसंबंधीचाही वाद खूप गाजला. श्रीकेक्षींच्या मते, “अश्लीलतेचा गाभा, अनैतिकता व कामुकता हा नसून अनौचित्य हा आहे... अश्लीलता हा नीतीच्या कायद्याचा भंग नसून कलेच्या कायद्याचा भंग आहे.” साहित्यक्षेत्रातील एक विचारवंत-समीक्षक म्हणून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात श्रीकेक्षींचा लौकिक झाला. साहित्यकृतींच्या आस्वादातून व अनुभूतीच्या विश्लेषणातून त्यांनी आपली साहित्यतत्त्वे अनुभवली व साहित्यशास्त्र उभारले. अक्षरवाङ्मयाच्या गुणविशेषांतून त्यांचे साहित्यविषयक तत्त्वज्ञान सिद्ध झाल्याचे दिसते. वास्तववाद, सौंदर्यवाद आणि गूढवाद यांना श्रीकेक्षी ‘वाङ्मयाचे त्रिनेत्र’ मानतात. आणि स्वतःस ते ‘सौंदर्यवादी-अध्यात्मवादी’ म्हणवतात.
“वाङ्मयीन टीका म्हणजे सृष्टीचे रहस्य आणि विश्वाचा आत्मा यांचा वाङ्मयाद्वारा शोध घेणे... सौंदर्यदर्शन आणि रहस्यदर्शन हे टीकाव्यापाराचे एकमेव कार्य होय. आधुनिक टीकाकार कलाकृतीच्या मुखाने कवीच्या मानससरोवरापर्यंत उलटा प्रवास करतो; कवीची संपूर्ण कृती मनाने पुन्हा रचतो. हे तादात्म्यचित्र म्हणजेच आधुनिक टीका... टीकाकाराची ही तादात्म्यावस्था सर्जनाच्या पातळीवर पोहोचली म्हणजे ‘काव्यात्म टीका’ जन्म पावते.” अशी त्यांची भूमिका आहे.
आधुनिक मराठी समीक्षाविश्वातील व विचारविश्वातील त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. मराठी समीक्षेत सैद्धान्तिक वा तत्त्वचिंतनपर समीक्षेचा प्रवाह निर्माण करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. मराठी, अन्य भारतीय व जागतिक वाङ्मयातील श्रेष्ठ साहित्यकृतींचे व कलावंतांच्या व्यक्तिमत्त्वांचे अंतरंग त्यांनीच विशेषत्वाने उलगडून दाखविले. वाङ्मयीन महात्मता व जीवनसौंदर्य यांच्याविषयीच्या अगाध आस्थेतून त्यांनी सुप्रसिद्ध सारस्वतकारांचा, तत्त्ववेत्त्यांचा, समाजपुरुषांचा व महात्म्यांचा जीवनवेध घेतला.
श्रीकेक्षींच्या विचारविश्वाला भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांचे व्यापक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे. ते भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचे, म्हणजे व्यापक अर्थाने एकूण जीवनाचेच टीकाकार आहेत. त्यांच्या आजवर प्रकाशित पुस्तकांमध्ये ‘बायकांची सभा’ (१९२६), ‘डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर : अश्रुविमोचन आणि गुणनिमज्जन’ (१९३७), ‘व्यक्ती आणि वाङ्मय’ (१९३७), ‘राक्षसविवाह’ (कादंबरी, १९४०), ‘सुवर्णतुला’ (प्रमुख भारतीय व्यक्तिमत्त्वांचा वेध, १९४५), ‘एकच प्याला’ (१९४६), ‘वाङ्मयीन मूल्ये’ (१९४६), ‘सागरमंथन’ (संपा. तळवलकर, जागतिक व्यक्तिमत्त्वांचा वेध, १९५६), ‘वादसंवाद’ (१९६०), ‘उमरखय्यामची फिर्याद’ (काव्यात्म टीका, १९६१), ‘साहित्याच्या दरबारात’ (अध्यक्षीय भाषणे, १९६१), ‘बायका’ (संपा. व.दि. कुलकर्णी, १९६२), ‘बृहदारण्यक’ (भाषांतर, १९६२) ‘वादे वादे’ (लघुनिबंध, १९६२), ‘सेतुपार्वती’ (कथा, १९६२), ‘टीकाविवेक’ (१९६५), ‘आधुनिक राष्ट्रकवी रवींद्रनाथ ठाकूर’ (१९७०), ‘तसबीर आणि तकदीर’ (आत्मचरित्र, १९७६), ‘केशवसुत आणि तांबे’ (१९८०), ‘श्रीकेक्षी: वाङ्मयीन लेखसंग्रह’ (१९८४), ‘निवडक श्री.के. क्षीरसागर’ (संपा. व.दि. कुलकर्णी, साहित्य अकादमी, १९९३) इत्यादींचा समावेश होतो. याशिवाय, काही संपादने त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या काही इंग्रजी कविता व लेख अप्रकाशित आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळातील नवसाहित्याशी, विशेषतः मर्ढेकरांच्या कवितेशी त्यांचे सूर जुळू शकले नाहीत. ‘नवकाव्यात जे नवे आहे ते काव्य नाही आणि जे काव्य आहे ते नवे नाही’, अशी त्यांची भूमिका होती. साठोत्तर काळातील समीक्षकांच्या एका गटाने (नेमाडे गट) त्यांची शत्रुवत उपेक्षा केली. तरीसुद्धा मराठी समीक्षेच्या इतिहासातील श्रीकेक्षींचे कार्य ऐतिहासिक व मौलिक स्वरूपाचे ठरते.
१९५९ सालच्या मिरज येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. याशिवायही त्यांनी अनेक वाङ्मयीन परिषदांची आणि संमेलनांची अध्यक्षस्थाने भूषविली. ‘टीकाविवेक’ या मान्यताप्राप्त ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा व अन्य पुरस्कार प्राप्त झाले. व.दि. कुलकर्णी यांनी संपादिलेल्या ‘निवडक क्षीरसागर’ या ग्रंथात श्रीकेक्षींच्या वाङ्मयकार्याचे सूक्ष्म व सम्यक मूल्यमापन पाहायला मिळते.
- डॉ. राजेंद्र नाईकवाडे