कुलकर्णी, गिरीश पांडुरंग
गिरीश पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील परांदा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील नवीन मराठी शाळा व न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. लातूर येथून गिरीश यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील पदविका प्राप्त केली. लातूरमध्ये शिक्षण घेत असताना कुलकर्णी यांनी रंगभूमीवर आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली होती. पदविका पूर्ण केल्यानंतर काही काळ त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर मात्र त्यांनी लेखनावर आपले लक्ष केंद्रित केले. ‘संस्कार भारती’च्या नाट्यविभागात गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी आणि श्रीकांत यादव या त्रिकुटाने विविध प्रयोग केले. उमेश कुलकर्णींनी ‘एफटीआयआय’साठी केलेल्या लघुपटांच्या निर्मितीसाठी त्यांना गिरीश कुलकर्णी यांची मोठी मदत मिळाली. पुढे आपल्याला भावेल असाच चित्रपट करायचा, या इराद्याने या जोडीने या क्षेत्रात उडी घेतली. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वळू’ या चित्रपटामुळे गिरीश कुलकर्णी हे नाव प्रेक्षकांना माहीत झाले. या चित्रपटाच्या लेखनाबरोबरच कुलकर्णी यांनी त्यामधील ‘जिवन्या’ ही मुख्य व्यक्तिरेखादेखील साकारली होती. गिरीश कुलकर्णी यांनी ‘वळू’ या चित्रपटाबरोबरच ‘विहीर’, ‘देऊळ’ ‘मसाला’ या चित्रपटांचे लेखन केलेले आहे. अभिनयाची आवड असलेल्या गिरीश यांना कारकिर्दीच्या सुरुवातीलाच चांगल्या भूमिका मिळाल्यामुळे त्यांच्या आवडीला खतपाणी मिळाले. त्यामुळेच ‘गाभरीचा पाऊस’ या चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली शेतकऱ्याची भूमिका लक्षणीय ठरली. ‘देऊळ’ चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट ठरला. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच या चित्रपटातील खटकेबाज संवादलेखनासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संवादलेखनाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘मसाला’ चित्रपटात त्यांनी अभिनयही केलेला आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुणे ५२’ या सतीश राजवाडे दिग्दर्शित चित्रपटातही गिरीश यांनी अभिनय केला आहे. तसेच ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘फास्टर फेणे’, ‘बॉईज २’ या चित्रपटांमध्येही त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. तर ‘अग्ली’, ‘दंगल’, ‘काबिल’, ‘फेनी खान’ या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी ताकदीच्या दिग्दर्शका सोबत काम करत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली.