Skip to main content
x

कुलकर्णी - जतकर, शंकर खंडो

     शंकर खंडो कुलकर्णी-जतकर हे पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे पहिले विभागप्रमुख होते. सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे सहकारी होते.

     त्यांच्या नावातील ‘एस.के.के.’ या आद्याक्षरांमुळे किंवा फक्त ‘प्रा. जतकर’ या नावाने अधिक परिचित असलेल्या जतकरांचा जन्म सांगली जिल्ह्यातील जत नावाच्या छोट्या गावात झाला. त्यांचे शालेय शिक्षण सांगली हायस्कूलमध्ये झाले. सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालय आणि नंतर पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयामध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. विज्ञान हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय असल्यामुळे, त्यांनी बंगळुरू येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ येथे प्रवेश घेऊन एम.एस्सी. पदवी मिळवली. १९२४ साली ते नोकरीसाठी हैद्राबादला गेले. निजाम महाविद्यालयात ते अध्यापक म्हणून रुजू झाले. परंतु संशोधन करण्याची आस त्यांना परत बंगळुरूला ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये घेऊन आली. सुरुवातीला त्यांनी प्रा. एच. वॅटसन यांच्याबरोबर संशोधन केले. सर सी.व्ही. रमण यांच्याकडे ‘रमण परिणाम’शी संबंधित संशोधन करण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली. त्यामुळे, त्यांचे स्वत:चे असे अभ्यास आणि ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्व विकसित झाले. त्यांनी स्वतंत्रपणे संशोधन केले. त्यात खास करून इन्स्ट्रुमेंटल अ‍ॅनालिसिस आणि विविध पायलट प्लँट प्रॉजेक्टविषयक संशोधन होते. त्यांतून मिळालेल्या निष्कर्षांवर आधारित दर्जेदार शोधनिबंध त्यांनी आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केले. त्यांच्या या शोधनिबंधांचे परीक्षण करून त्यांना डी.एस्सी. ही पदवी मिळाली.

     १९४९ साली पुणे विद्यापीठ स्थापन झाले. त्या विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग सुरू करण्यासाठी कुलगुरू  बॅ. मु. रा. जयकर यांनी प्रा.जतकर यांना आमंत्रित केले. १९५० ते १९६२ या काळात त्यांनी अहोरात्र मेहनत करून रसायनशास्त्र विभाग नावारूपाला आणला. मेहनत, चिकाटी, आशावाद, दूरदर्शीपणा आणि बुद्धिमत्ता या गुणांच्या जोरावर त्यांनी सुमारे १५० शोधनिबंध आघाडीवरील वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २५ विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्राच्या विविध समस्यांवर उच्चदर्जाचे संशोधन करून पीएच.डी. पदवी मिळवली. त्यांनी शिक्षणसंस्था आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्र यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा विचार आणि प्रत्यक्ष कृती  केली. त्यांनी शर्करा उत्पादन तंत्रज्ञान, स्फोटकांचे रसायनशास्त्र, काचेचे उत्पादन, अशा वेगळ्या विषयांच्या अध्ययनाची सोय  केली.  

     प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी अभ्यासक्रमापुरते किंवा संशोधनासाठी केवळ एकत्र न येता, सामाजिकदृष्ट्या उपयुक्त विषयाचादेखील विचार करावा, असे त्यांना प्रकर्षाने वाटे. त्या दृष्टीने त्यांनी ‘युनिव्हर्सिटी केमिकल सोसायटी’ची स्थापना केली. चर्चासत्रे, वक्तृत्व स्पर्धा, प्रात्यक्षिके, खेड्यात विज्ञान प्रसार करण्यासाठी फिरती प्रयोगशाळा यांसारखे निरनिराळे उपक्रम त्यातून सुरू झाले.

    संकटप्रसंगी धीराने वागण्याचा त्यांचा गुण विशेषत्वाने जाणवत असे. १९६१ सालच्या पानशेतच्या जलप्रलयानंतर पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उपाययोजना ठरविण्यासाठी प्रा. जतकर यांनी विद्यार्थ्यांची ताबडतोब बैठक भरविली. त्या वेळी पुणे शहरात बऱ्याच ठिकाणी नळाला गढूळ पाणी यायचे. प्रा. जतकरांनी विद्यार्थ्यांना विचारले: ‘पुण्यातील काही भागांत पिण्याचे पाणी अशुद्ध आहे. अशा प्रसंगी रसायनशास्राचे विद्यार्थी म्हणून तुम्ही काय प्रयत्न कराल?’ विद्यार्थी चर्चा करू लागले. त्यांनी मदतकार्याची रूपरेषा ठरविली आणि तिची कार्यवाहीपण लगेच गाजावाजा न करता सुरू झाली. पुण्याच्या काही भागांतील लोकांना बिकट प्रसंगी पिण्याचे पाणी मिळाले. प्रा. जतकर यांचा विषय रसायनशास्र होता, तरी त्यांनी भौतिक शास्त्राच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. स्पेक्ट्रोस्कोपी, रेण्वीय संरचना, शास्त्रीय उपकरणशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. ‘केमिस्ट्री ऑफ स्टाँग इलेक्ट्रोलाइट्स, डायपोल मोमेंट अँड मॉलेक्युलर स्ट्रक्चर’ हे त्यांच्या व्यक्तिगत आवडीचे विषय होते. या संदर्भात त्यांनी विकसित केलेली गणिती पद्धत ही ‘जतकर इक्वेशन’ म्हणून ओळखली जाते. पॉलिमर तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञानासंबंधी अद्ययावत माहिती ते गोळा करून ठेवायचे. अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होत असे.

     रॉयल केमिकल सोसायटी आणि अमेरिकन केमिकल सोसायटी यांनी प्रा. जतकर यांना सन्मान्य फेलोशिप प्रदान केलेली होती. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी करण्याचा त्यांचा कटाक्ष असे. त्यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांकरिता विभागात स्थापन केलेले ग्रंथालय ‘जतकर लायब्ररी’ म्हणून ओळखले जाते. रसायनशास्त्र विभागातील सर्व प्रगत उपकरणे-यंत्रसामग्री चालू स्थितीत ठेवण्यासाठी ते स्वत: प्रयत्नशील असत. कोणतेही यंत्र बिघडले, की त्यांना ते एक आव्हानच वाटे. यंत्रे - उपकरणे बिघडली, की विद्यार्थी आणि अकुशल कर्मचाऱ्यांना मदतीला घेऊन ते दुरुस्त करायचे. त्यांच्या प्रात्यक्षिकांमुळे अनेकांना प्रशिक्षण मिळत असे.

     वय वर्षे ९३ झाल्यावर ते हृदयविकाराने आजारी पडून अंथरुणाला खिळून बसले. हृदयाचे ठोके लयबद्ध करणारा पेसमेकर शरीरात बसवून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. शरीराच्या आत महागडा पेसमेकर बसवण्याऐवजी तेच कार्य करणाऱ्या, पण शरीराच्या बाहेर, खिशात ठेवता येणाऱ्या पेसमेकरचे डिझाइन प्रा. जतकरांनी केले. अल्पावधीत ते बनवून ते हिंडू - फिरू लागले. शस्त्रक्रिया तर टळलीच, पण पंधरा हजार रुपयांऐवजी त्यांना केवळ दीडशे रुपये खर्च आला! स्वत: संशोधन केलेल्या स्वस्त अशा पेसमेकरचा उपयोग गरजू, गरीब रुग्णांना व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. रुग्णाला स्वत:च्या तब्येतीमधील घडणाऱ्या चढ-उतारांना अनुकूल बदल केवळ बटण फिरवून करता येईल, अशी सोय त्या पेसमेकरमध्ये होती!

     प्रा. जतकर कामाच्या बाबतीत काटेकोर होते. त्यामुळे विद्यार्थी आणि सेवकांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटे. एखाद्याची मेहनती वृत्ती आणि कौशल्य जेव्हा त्यांच्या लक्षात यायचे, तेव्हा ते त्याचे कौतुक करून प्रोत्साहन द्यायचे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या विकासाच्या दृष्टीने ते जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असत. परीक्षेचे मानधन व्यक्तिगत कारणासाठी न वापरता, त्यांनी रसायनशास्त्र विभागातील ग्रंथालयात नवीन पुस्तके घेण्यासाठी वापरले. निवृत्त होताना दिला गेलेला गौरवनिधी त्यात स्वत:ची भर घालून सेवकवर्गासाठी कायमस्वरूपी ठेव म्हणून त्यांनी विभागाला परत केला. त्यांच्या सहृदय माणुसकीचा अनुभव त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि सहकारी सेवकवर्गाला वारंवार आलेला होता.

    १९५० सालानंतर प्रा. जतकर यांनी फारसे आर्थिक पाठबळ नसताना आणि साधनसामग्री तुटपुंजी असताना, पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाची उभारणी केली. व्यावसायिक किंवा औद्योगिक दृष्टीने रसायनशास्त्राचा उपयोग जनसामान्यांसाठी किंवा राष्ट्र उभारणीसाठी कसा करता येईल, याचे प्रशिक्षण त्यांनी विद्यार्थ्यांना सप्रयोग दिले. हे करीत असताना, त्यांनी ‘जर्नल ऑफ अमेरिकन केमिकल सोसायटी’, ‘जर्नल ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’, अशा अनेक अव्वल दर्जाच्या वैज्ञानिक नियतकालिकांत शोधनिबंध प्रसिद्ध केले.

    वृद्धापकाळामुळे त्यांचे पुणे येथे निधन झाले.      

डॉ. अनिल लचके

कुलकर्णी - जतकर, शंकर खंडो