Skip to main content
x

कुलकर्णी, मधुकर बबन

      धुकर बबन कुलकर्णी यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील जळगाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दोंडाइचा येथे झाले. त्यांनी १९६०मध्ये शालान्त परीक्षेत कृषी विषयात महाराष्ट्र राज्यातून पहिले पारितोषिक प्राप्त केले. त्यांनी परभणीच्या शासकीय कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी १९६४) पदवी मिळवली. पुढे त्यांनी पुणे येथून एम.एस्सी. (कृषी) व राहुरीहून पीएच.डी. (दुग्धशास्त्र) या पदव्या प्राप्त केल्या. त्यांनी दुग्धतंत्रज्ञान व प्रक्रिया या विभागात विशेष प्रावीण्य संपादन केले. त्यांनी १९९३ ते १९९७ या कालावधीत म.फु.कृ.वि.तील गोसंशोधन व विकास प्रकल्पावर प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून व पुढे १९९७ ते २००१ या कालावधीत पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभागप्रमुख म्हणून गायीची नवीन संकरित जात विकसित करणे, दुग्धशास्त्र या विषयात प्रथमच अपारंपरिक ऊर्जेचा (सौर ऊर्जा) दुग्ध पदार्थ टिकवण्यासाठी वापर करणे, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन नवीन उन्नत जातीच्या गायींच्या व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन करणे, असे उल्लेखनीय कार्य केले. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा संकरगट उपयुक्त ठरेल, असा विचार करून पशुविज्ञान व दुग्धशास्त्र या विभागाच्या इतिहासात प्रथमच ‘फुले त्रिवेणी’ या संकरित गाईची उन्नत जात शेतकऱ्यांसाठी विकसित करून वितरित केली. या जातीच्या गायींमध्ये जास्त दुग्धोत्पादन क्षमता (वितात सरासरी ३००० ते ३५०० ली.), दुधातील स्निग्धांशाचे चांगले प्रमाण (सरासरी ३.८ ते ४.२%) व स्थानिक हवामानाशी मिळतेजुळते घेण्याची क्षमता, तसेच रोगप्रतिकारक्षमता उत्तम आढळून आल्यामुळे, ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरली. त्यामुळे डॉ.कुलकर्णी यांनी या जातीच्या १५० ते २०० गायी (पहिल्या वितापासून, ४थ्या वितापर्यंतच्या) दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या शेतावरील व्यवस्थापनात सर्व गुणधर्मांचा ३ ते ४ वर्षे सातत्याने शास्त्रोक्त अभ्यास केला. त्यातून असे आढळले की, शेतकऱ्यांच्या वैयक्तिक व्यवस्थापनात प्रकल्पावरील दुग्धोत्पादनापेक्षा जवळपास १५ ते २०% जास्त दुग्धोत्पादन मिळाले आणि इतर गुणधर्मही अपेक्षेप्रमाणेच दिसून आले.

      डॉ.कुलकर्णी यांनी दुग्धशास्त्र या विषयातदेखील एका नव्या संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा प्रथमच वापर सुरू केला. इंधनटंचाई व प्रदूषणांच्या प्रतिकूल परिणामांचा विचार करून त्यांनी पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांकडून सौर ऊर्जेच्या वापरावर  २००० ते २००२ या काळात संशोधन करून घेतले. त्यात साधी काच व बहिर्गोल भिंगाची काच या माध्यमातून एका साध्या सौरपेटीतील खवा नमुन्यांवर दिवसातील ठरावीक कालावधीत सूर्यकिरणे पाडण्यात आली. संशोधनाअंती असे आढळले की, खव्यातील अत्यंत महत्त्वाचे बॅसलिस सबटीलीस, अ‍ॅस्परजीलस नायजर, यीस्ट आणि फंगस या जीवाणूंचे प्रमाण (० ते ५० ते  १००) एवढे कमी होऊन खवा पारंपरिक पद्धतीपेक्षा सुमारे १० दिवस जास्त टिकण्यास मदत होते. ही पद्धत सोपी व खेड्यात सहज वापरता येण्याजोगी आहे. सदर संशोधन इंडियन जर्नल ऑफ डेअरी सायन्स (२००६), तसेच एशियन जर्नल ऑफ बायॉलॉजिकल सायन्स (२००६) व जर्नल ऑफ डेअरी अँड होम सायन्स (२००४) या नियतकालिकांत प्रसिद्ध करण्यात आले. 

- मुकुंद देशपांडे

कुलकर्णी, मधुकर बबन