Skip to main content
x

कुंदगोळकर, रामभाऊ गणेश

             गेल्या शतकातील आघाडीचे गवई, संगीत रंगभूमी गाजवलेले गायक, नट, किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांचे गुणी शिष्य आणि गंगूबाई हनगल, पं. फिरोज दस्तूर व भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे थोर गायनगुरू अशी ज्यांची ओळख सांगता येईल असे सवाई गंधर्व म्हणजे रामचंद्र गणेश कुंदगोळकर यांचा जन्म हुबळी (कर्नाटक) जवळच्या कुंदगोळ या लहानशा खेड्यात झाला. वडील जमखंडी संस्थानातील सावशी गावचे मूळचे कुलकर्णी; पण कुंदगोळला दत्तक घराण्यात गेल्यामुळे तेथील नाडगीर जहागीरदारांची वहिवाटदारी व इनाम गावची पाटीलकी करीत असत.

वडील संगीत नाटक आणि बैठकीच्या गाण्याचे शौकीन होते. कुंदगोळहून जवळच असलेल्या हुबळीत होणार्‍या नाटकांना, मैफलींना वडिलांबरोबर रामभाऊ लहानपणी जात असत. दुसर्‍या दिवशी तेच गाणे साभिनय म्हणून दाखवीत असत. गाण्याचे जबरदस्त वेड असलेल्या गोड गळ्याच्या आपल्या मुलाच्या संगीत शिक्षणाची व्यवस्था वडिलांनी कुंदगोळ येथे केली. कुंदगोळला १८९७ मध्ये राहायला आलेले बळवंत कोल्हटकर हे जुन्या पठडीतल्या धृपद गायकीचे जाणकार होते. त्यांनी किशोरवयाच्या रामभाऊंना काही ख्याल, तराणे, पखवाजबरोबर ब्रह्मताल, मत्तताल शिकवले. कोल्हटकरबुवांचे १८९८ मध्ये निधन झाले आणि रामभाऊंचे दीड वर्षांचे संगीत शिक्षण थांबले; पण कुंदगोळमध्ये रामभाऊ बालगवईम्हणून ओळखले जाऊ लागले. याच वेळी हुबळीत दोन तरुण मुसलमान गवयांच्या मैफलीचा बराच बोलबाला होऊ लागला. रामभाऊंना त्यांचे गाणे ऐकायची ओढ लागली. इंग्रजी चौथीसाठी हुबळीला शिकण्यासाठी जायचा हट्ट त्यांनी वडिलांकडे धरला. खरे तर त्या गवयांचे गाणे ऐकायला हुबळीला जायचे होते. वडिलांनी हुबळीत त्यांची शाळेची व्यवस्था केली.

मोठ्या हिकमतीने कुंदगोळकरांनी क्लबमधल्या मैफलीत प्रवेश मिळवला. उस्ताद अब्दुल करीम खाँ आणि तानपुर्‍यावर साथ करणारे त्यांचे बंधू अब्दुल हक यांचे श्रुतिमधुर गाणे ऐकताच मंत्रमुग्ध झालेल्या रामभाऊंनी वडिलांकडे सरळ जाऊन आपल्याला खाँसाहेबांकडे गाणे शिकायचे आहे असे सांगितले. योगायोगाने खाँसाहेब कुंदगोळला नाडगीर जहागीरदारांच्या वाड्यात गायला आले. वडिलांनी रामभाऊंना त्यांच्याकडे सुपूर्द केले. रामभाऊंचा आवाज, त्यांची जिद्द पाहून खाँसाहेबांनी त्यांना हुबळीला गाणे शिकण्यासाठी बोलावले.

भूप रागातील सुधे बोलया चिजेची अस्ताई खाँसाहेबांनी शिकवली; पण दोन महिन्यांत खाँसाहेब दौर्‍यावर निघून गेले. पुन्हा कुंदगोळला परतलेले रामभाऊ वर्षभर घरीच राहिले. या वेळी त्यांचे लग्नही झाले. मात्र अल्पावधीत खाँसाहेब हुबळीला परतले. पुन्हा रीतसर शिकवणीला सुरुवात झाली. या वेळी मात्र खाँसाहेबांनी रामभाऊंचा शिष्य म्हणून स्वीकार केला. त्यांचे १९०१ मध्ये गंडाबंधनही विधिपूर्वक झाले.

खाँसाहेब हुबळीहून सोलापूरला आले ते आपल्या गुणी शिष्याला घेऊनच. खाँसाहेबांची शिस्तबद्ध तालीम सुरू झाली. या कठोर तालमीत  खर्ज, मेहनत, एकेक स्वर घोकणे, सातही स्वर तंबोर्‍यावर समप्रमाणात लावणे, रागातील वर्ज्य, वादी-संवादी स्वर यांच्याकडे लक्ष देऊन स्वर लावण्याची पद्धत, मींड, विराम, सरगम असा कडक अभ्यास असे. खाँसाहेब गाण्याच्या वेळी साथीला रामभाऊंना घेत असत. रावसाहेब देवल व मि. क्लेमंट्स या संगीततज्ज्ञांच्या श्रुतिसंशोधनाच्या चर्चा, जाहीर सप्रयोग व्याख्याने या वेळीही रामभाऊ हजर असत. खाँसाहेब संगीताचे सौंदर्यही उलगडून दाखवीत असत, तसेच दोषही दाखवून देत असत. रामभाऊंना १९०० ते १९०६ या अवधीत खाँसाहेबांची तालीम मिळाली. लाचारी’, ‘गुजरी’, ‘मियांहे तोडीचे प्रकार, ‘भैरव बहार’, ‘ललिता गौरीअसे अवघड राग शिकायला मिळाले. खाँसाहेबांचा भर चिजांच्या संग्रहापेक्षा श्रुती, स्वरांची शुद्धता,सौंदर्य, माधुर्य या अंतरंगांवर होता. १९०७ मध्ये रामभाऊ खाँसाहेबांकडून निघाले व वझेबुवांचे गुरू निसार हुसेन यांच्याकडून सरपरदा’, ‘लंकादहनसारंग’, ‘जौनपुरी बहारइ. रागांतील चिजा रामभाऊंनी घेतल्या. खाँसाहेबांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. पण बीनकार मुराद खाँ, हैदराबादचे रहीम खाँ, हैदरबक्ष यांचेही मार्गदर्शन घ्यावे असे उदार मनाने सुचवले. रामभाऊंनी जयतकल्याण, हिंडोलबहार, खट, जैताश्री इ. चिजा हैदरबक्षांकडून घेतल्या, तर मुराद खाँकडून मलुहा केदार, जलधर केदार, नटमल्हार, जयजयवंती इ. रागांतील चिजा घेतल्या आणि स्वत:ची गायकी समृद्ध केली.

रामभाऊंच्या जीवनाला १९०८ सालापासून वेगळे वळण लागले. नाट्यकला प्रवर्तक मंडळीचे सखारामपंत केतकर यांनी रामभाऊंना हेरून ठेवले होते. ते कुंदगोळला गेले असताना नाटकात येण्याबद्दल त्यांना तयार केले. खाँसाहेबांच्या इच्छेविरुद्ध जाण्याची इच्छा नसतानाही नाटकातील झगमगाटाचा मोह पडून, शंभर रुपये पगाराचे प्रलोभन वाटून पोरवयातील रामभाऊ नाटकात गेले. नाट्यकलामध्ये प्रवर्तक मंडळींचा मुक्काम अमरावतीला होता. त्या वेळी रामभाऊंचा नाटकात प्रवेश झाला. भाषांतरित नाटके, जुनी बाळबोध पदे असणार्‍या नाट्यकलाच्या वातावरणात रामभाऊंना राहायला आवडले नाही. पण गोपाळराव मराठे यांनी रामभाऊंच्या आगमनाने सौभद्र’, ‘शारदा’, ‘रामराज्यवियोगसारखी संगीतप्रधान नाटके करायचे ठरवले. काही नवी नाटकेही आणली. ह.ना. आपटे कृत संत सखू’, वर्तक कृत तापसी शारदायशस्वी ठरली. रामभाऊंनी प्रभावती’, ‘लीलावतीया नाटकांत कामे करून कंपनीला लोकप्रियता व पैसे मिळवून दिले. पण संत सखू’, ‘सौभद्रमधील पदे विशेष गाजली. पुण्या-मुंबईपर्यंत रामभाऊंच्या गाण्याची, कामाची कीर्ती पोहोचली.

बालगंधर्व हे त्या वेळी संगीत रंगभूमीवर तळपत होते. अशा वेळी रामभाऊ सौभद्रमधून आपल्या गायकीचे बहारदार दर्शन घडवीत होते. एकदा सौभद्रसुरू असताना सुप्रसिद्ध पुढारी व वर्‍हाडातील विख्यात व्यक्तिमत्त्व श्रीमंत दादासाहेब खापर्डे उद्गारले, ‘‘अरे हे तर सवाई गंधर्व आहेत.’’ त्यानंतर असनारे वकिलांच्या हस्ते एका समारंभात सवाई गंधर्वही अक्षरे कोरलेले सुवर्णपदक रामभाऊंना सन्मानपूर्वक दिले गेले. त्यानंतर त्यांचे सवाई गंधर्वहे बिरुद रूढ झाले.

रामभाऊ १९१३ पर्यंत नाट्यकला प्रवर्तक मंडळीत होते. तेथून निघून त्यांनी स्वतंत्रपणे १९१४ मध्ये नूतन संगीत मंडळीही संस्था काढली. सौभद्र’, ‘मृच्छकटिक’, ‘मानापमान’, ‘शारदा’, ‘मूकनायकया नाटकांबरोबरच माधव जोशी यांची विनोद’, ‘करमणूक’, ‘मनोरंजनही नाटके, तसेच फाटकशास्त्रींचे क्रांतिकौशल्य’, करमरकरांचे सुमसंग्रम’, बामणगावकरांचे आत्मतेजअशी नाटके बसवली. पारसदेवी’, ‘जफर नेकी’, ‘देश सेवकअशी हिंदी-उर्दू नाटके रंगभूमीवर आणली. पुढे रामभाऊ पुरुष-भूमिका करू लागले. मात्र १९२४ सालात त्यांनी कंपनी बंद केली.

त्यांनी १९२६ मध्ये यशवंत संगीत मंडळीतुळशीदास’, ‘पटवर्धनया नाटकांतून कामे केली. पुढे हिराबाई बडोदेकरांच्या नूतन संगीत नाट्यशाखाया मंडळीतही काम केले. या कंपनीत मीराबाईनाटकात त्यांचे दयानंदाचे काम गाजले; पण १९३१ साली ही कंपनी बंद पडली आणि रामभाऊंच्या रंगभूमीच्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीला विराम मिळाला. त्यानंतर १९३२ पासून मात्र मुंबई, पुणे येथे शिकवण्या, गाण्याचे जलसे, आकाशवाणीवरील गाणी, ध्वनिमुद्रिका यांमध्ये ते व्यस्त राहू लागले. पुणे, मुंबई व कुंदगोळ येथे वास्तव्यास राहू लागले. नाट्यजीवनामुळे खंडित झालेल्या संगीतसाधनेस त्यांनी वाहून घेतले. अब्दुल करीम खाँसाहेबांनी आपल्या गुणी शिष्याला गाण्याच्या साथीलाही बोलावले. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावर तेजस्वीपणे तळपणारे किराणा घराण्याचे गायक म्हणून रामभाऊंनी कीर्तीमिळविली तो हाच कालखंड होता. 

अब्दुल करीम खाँसाहेबांचे २७ ऑक्टोबर १९३७ या दिवशी  निधन झाले. पण त्यांचा हा शिष्य किराणा घराण्याच्या गायकीची ध्वजा उंचावत राहिला. त्याचबरोबर किराणा घराण्याची उज्ज्वल अशी शिष्य- परंपराही निर्माण करीत राहिला हे रामभाऊंचे मोठे कार्य म्हणता येईल.

पौगंडावस्थेत असताना फुटलेला रामभाऊंचा आवाज कधीच पुन्हा पूर्ववत झाला नाही. तो जड, खरखरीत राहिला. मात्र खाँसाहेबांच्या आवाज साधनेच्या विशिष्ट पद्धतीमुळे, रामभाऊंच्या मेहनतीमुळे त्यांचे गाणे किराणा घराण्याच्या माधुर्याच्या परंपरेला साजेसे सिद्ध झाले.

भैरवी’, ‘तोडी’, ‘मियां मल्हार’, ‘दरबारी’, ‘जयजयवंती’, ‘मालकंस’, ‘कामोद’ ‘वसंत’, ‘अडाणाअसे राग ते खुलवीत असत. उगीच का कांता’, ‘चंद्रिका ही जणू’, ‘मम सुखाची ठेव’, ‘व्यर्थ छळियेले’, ‘रामरंगी रंगलेअशी नाट्यपदेही ते बहारदारपणे म्हणत असत, तसेच ना मारो पिचकारी’, ‘पी की बोली न बोलसारख्या ठुमर्‍यांतही रंग भरत असत.

रामभाऊंच्या जीवनाच्या उत्तरार्धात त्यांच्या मैफलींप्रमाणेच त्यांनी संगीतविद्येचे अध्यापन करून मोठी शिष्यपरंपरा तयार केली हे ठळकपणे सांगता येईल. गंगूबाई हनगल, भीमसेन जोशी, फिरोज दस्तूर, बसवराज राजगुरू अशी त्यांची शिष्यपरंपरा पाहिली तर भारतीय संगीताच्या गुरु-शिष्य परंपरेला त्यांनी दिलेली अपूर्व देणगी आहे, असे म्हणावे लागेल.

वृद्धापकाळात पक्षाघात, उच्च रक्तदाब या विकारांनी रामभाऊ जर्जर झाले.  ते १८ नोव्हेंबर १९४१ या दिवशी दादर येथील नप्पू सभागृहामध्ये अखेरचे गायले. पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी निवृत्त आयुष्य व्यतीत केले.

पुण्यात १९ जानेवारी १९४६ या दिवशी झालेल्या रामभाऊंच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्यात युवा भीमसेन जोशी जाहीर कार्यक्रमात गायले आणि त्यांचे नाव सर्वत्र गाजू लागले. रामभाऊंच्या आयुष्यातला हा भाग्याचा दिवस ठरला. या शिष्याने पुढे जागतिक कीर्ती मिळवली.

 रामभाऊंचे पुण्यात निधन झाले. कन्या प्रमिला, जामात डॉ. नानासाहेब देशपांडे, पत्नी, मुलगा व चाहत्यांचा मोठा परिवार त्यांच्या मागे होता.

त्यांच्या स्मृतिनिमित्त सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सव १९५३ पासून सुरू आहे व भारतात मोठा भव्य संगीत महोत्सव म्हणून ओळखला जातो. सवाई गंधर्वांच्या १४ ध्वनिमुद्रिका उपलब्ध आहेत. समारोपाच्या दिवशी त्यांची भैरवीची ध्वनिमुद्रिका वाजवली जाते व त्यांची स्मृती जतन केली जाते.

सुलभा तेरणीकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].