Skip to main content
x

कवठेकर कुळकर्णी, नारायण

नारायण कवठेकर कुळकर्णी ह्यांचा जन्म कवठा (खुर्द), ता. रिसोड, जि. वाशिम येथे पिढीजात शेतकरी कुटुंबात झाला. घराणे सांपत्तिकदृष्ट्या सुखवस्तू व सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित होते. त्यांनी मराठी विषयात पदव्युत्तर व शिक्षणशास्त्राची स्नातक पदवी संपादन केली. कवठा ग्रामपंचायतीचे  ते सदस्य (४ वर्षे) होते, तसेच कवठा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष (६ वर्षे) होते.

प्रारंभी त्यांनी शेतीव्यवसाय केला. १९८०पासून अध्यापनाच्या क्षेत्रात ते कार्यरत झाले. श्री. कृ. कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव (जामोद), जि. बुलढाणा, आणि अकोला येथील श्री शिवाजी महाविद्यालयातून मराठी विषयाचे अध्यापन त्यांनी केले. अलीकडेच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. कवठेकरांचा मूळ पिंड कवीचा. १९७०च्या आसपास वेगवेगळ्या नियतकालिकांतून काव्यलेखनास त्यांनी प्रारंभ केला. १९८०मध्ये ग्रंथाली वाचक चळवळीने प्रसिद्ध केलेल्या ‘कविता दशकाची’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात त्यांच्या दहा कवितांचा समावेश आहे. त्यानंतर ‘हे माझ्या गवताच्या पात्या’ (१९८२) आणि ‘मागील पानावरून पुढे सुरू’ (१९९७) हे त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. अनुभवाला सरळपणे सामोरी जाणारी त्यांची कविता आहे. स्वातंत्र्योत्तर समाजजीवन, ग्रामजीवन व राजकारण यांचे प्रतिबिंब कवितेत पडले आहे. तरुण पिढीच्या स्पंदनांचा, विचार-भावनांचा कवितेतून जाहीर उच्चार दिसतो. स्वातंत्र्योत्तर काळातील समाजवास्तवाचे कठोर दर्शन घडविणारी त्यांची  कविता आहे. महानगरातील मध्यमवर्गीय माणसांच्या समस्यांप्रमाणे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी माणसांच्या समस्यांचा वेध त्यांनी कवितेतून घेतला. व्यक्तीतून समष्टीत व समष्टीतून व्यक्तीत विलीन होण्याची प्रक्रिया सहजतेने घडविणे, हे या कवितेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी, तेलगू, तमिळ, गुजराती, राजस्थानी, पंजाबी, कन्नड व इंग्रजी इत्यादी भाषांतून अनुवाद झाले. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक विद्यापीठांतील मराठीच्या अभ्यासक्रमात त्यांच्या बर्‍याच कवितांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कारासह प्रतिष्ठेचे अनेक वाङ्मयीन पुरस्कार त्यांना मिळाले. ‘युगवाणी’ ह्या विदर्भ साहित्य संघाच्या वाङ्मयीन मुखपत्राचे ते संपादकही होते. बदलत्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक वास्तवाचे भान राखून दारुण वास्तवात सामर्थ्याने उभे राहून संघर्ष करणार्‍या सामान्य माणसाच्या जगण्यातील दुःख, निराशा व अस्वस्थता यांचा गांभीर्याने वेध घेणारा १९८०च्या दशकातील एक महत्त्वाचा कवी म्हणून समकालीन कवितेला त्यांचे विशेष योगदान आहे.

२०१४ साली दत्ता हलसगीकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. 

- डॉ. शोभा रोकडे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].