Skip to main content
x

खैर, गजानन श्रीपत

       डॉ.गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खैर ह्यांचे घराणे सांगली जिल्ह्यातील वांगी गावचे. अण्णांच्या वडिलांना पोस्टात नोकरी होती. अण्णा सहा महिन्यांचे असताना वडिलांचा १८९८ च्या प्लेगच्या साथीत मृत्यू झाला. आईने काबाडकष्ट करून मुलांना वाढविले. त्यांच्या आईला पुढे बनारसला एका सधन कुटुंबात काम मिळाले त्यामुळे सर्व कुटुंब तिकडे गेले. तेथेच अण्णांचे शिक्षण सुरू झाले.

     पुढे वर्षभरातच अण्णा पुण्यास आले. माधुकरीवर अण्णांनी पंधरा वर्षे काढली. १९१४ मध्ये ते पुणे अनाथ विद्यार्थी गृहात दाखल झाले. १९१६ मध्ये मॅट्रिक झाल्यावर तेव्हाच्या न्यू पूना कॉलेजमधून (आताचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय) ते बी.ए. झाले. ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर अण्णांचे सहाध्यायी होते. अण्णा, डॉ. परुळेकर व कुलगुरू वि. गं. केतकर ह्यांनी १९२१ मध्ये स्वतंत्र व ध्येयवादी शिक्षणासाठी ‘महाराष्ट्र विद्यालय’ सुरू केले. अण्णा संस्थेचे आजीव सदस्य झाले.

     १९३१ मध्ये अण्णा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये एम.ए. केले. १९३२ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाची पीएच.डी. मिळविली. ते भारतात परत आले. शिक्षणतज्ज्ञ म्हणून मोठ्या वेतनाची व मानाची जागा त्यांना सहज मिळाली असती. पण ते पुणे अनाथ विद्यार्थी गृहात दाखल झाले व पुढील पंचवीस वर्षे दरमहा पन्नास रुपये वेतन व दर वर्षी एक रुपया वाढ एवढ्या प्राप्तीवर काम करीत राहिले. निर्धनांच्या शिक्षणाचे असिधाराव्रत ते निष्कांचन स्थितीत निष्ठेने पार पाडीत राहिले.

     अमेरिकेहून परततानाच त्यांनी इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड या देशांना तेथील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी भेट दिली होती. १९३७ मध्ये ते जपानमध्ये संपन्न झालेल्या जागतिक शिक्षण परिषदेस उपस्थित राहिले. दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांचा दर्जाही उंचावला पाहिजे या दृष्टिकोनातून अण्णांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविले. १९३९-४० मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षकांची संघटना उभारली. १९४१ मध्ये मुंबई इलाखा प्राथमिक शिक्षक परिषद झाली. अण्णा या परिषदेचे अध्यक्ष होते. शिक्षकांच्या जिल्हानिहाय व राज्यपातळीवर संघटना त्यांनी बांधल्या व त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

     १९४० ते १९४५ या काळात मुंबई विद्यापीठाच्या नियामक मंडळात त्यांनी काम केले. पुणे विद्यापीठ अधिसभा, बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, एस.एस.सी. बोर्ड, इंडियन कमिटी फॉर सेकंडरी एज्युकेशन यांचे अण्णा १९४८ ते १९६३ या काळात सदस्य होते. १९४८ मध्ये त्यांनी सरकारी क्रमिक पाठ्यपुस्तक समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. ‘नवभारत वाचनमाला’, ‘स्वाध्यायमाला’, ‘प्रोग्रेस ऑफ एज्युकेशन’ या मासिकांचे ते संपादक होते. सुसंस्कार व सदाचार ह्यांची शिकवण देणार्‍या ‘समाचार’ मासिकाचा प्रारंभ त्यांनी केला व १९४९ ते १९८५ पर्यंत सलग सदतीस वर्षे संपादनाचे काम केले. त्यातील संपादकीय म्हणजे अण्णांच्या विचारांचा आरसा असे. या संपादकीयांचे पाच भाग ‘सदाचार चिंतनी’ या नावाने प्रसिद्ध झाले आहेत. संस्कारक्षम वाङ्मयात एवढे चांगले लेखन क्वचितच आढळेल.

     १९५२ ते १९५८ या सहा वर्षांसाठी अण्णांची शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निवड झाली. शैक्षणिक विषयांबरोबरच अनेक सामाजिक विषयांवर अण्णांनी तेथे अभ्यासपूर्ण भाषणे केली.  १९५० ते १९७० ह्या काळात अण्णा पुणे (अनाथ) विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष होते. ह्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची सर्वांगीण भराभराट झाली. या सर्व शैक्षणिक, सामाजिक कार्याबद्दल १९६० मध्ये ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने अण्णांचा गौरव करण्यात आला.  संशोधन व अभ्यास हा अण्णांचा पिंड होता. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या आणि इतर प्रकांड पंडितांच्या गीता विषयक विचारांचे वाचन आणि चिंतन केले. त्यांनी आयुष्यभर गीता जगण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात गीताविचारांवर शेकडो व्याख्याने त्यांनी दिली. ‘मराठी गीता आणि विवरण’, ‘गीतेतील मुख्य विचार’, ‘त्रिकाल गीता’अशा ग्रंथांची त्यातून निर्मिती झाली. निसर्गोपचाराचाही अण्णांचा अभ्यास मोठा होता. त्याचे आचरणही ते दैनंदिन जीवनात करीत असत.

     अण्णांनी पुणे (अनाथ) विद्यार्थी गृहात पन्नास वर्षे सेवा केली. उल्लेखनीय बाब अशी की, १९६९ मध्ये निवृत्त होताना ग्रंथलेखन, विद्यापीठीय परीक्षा, व्याख्याने, पाठ्यपुस्तकांचे संपादन व विधान परिषदेचे सभासद म्हणून मिळालेले मानधन यातून अण्णांनी धनसंचय केला व संस्थेला पन्नास हजार रुपयांची देणगी दिली.

- मल्हार अरणकल्ले

खैर, गजानन श्रीपत