Skip to main content
x

खेबुडकर, जगदीश गोविंद

       विवर्य जगदीश खेबुडकर हे कोल्हापूरजवळच्या खेबवडे या गावाचे. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. गावी थोडीफार शेती व गाईगुरे अशा  वातावरणात ते वाढले. १९४८ साली गांधीवधानंतर झालेल्या जाळपोळीत त्यांचेही घर जाळण्यात आले. सारे कुटुंब उघड्यावर आले आणि त्या आत्यंतिक वेदनेतून त्यांची पहिली कविता जन्माला आली - मानवते, तू विधवा झालीस!

खेबुडकर १९५३ मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होऊन एका औषधाच्या कंपनीत नोकरी करू लागले. १९५६ मध्ये एस.टी.सी. होऊन ते शिक्षक झाले. पुढे आयुष्यभर त्यांनी शिक्षकाचीच नोकरी केली. त्यादरम्यान कविता लिहिणे चालूच होते. सांगली आकाशवाणीसाठी त्यांनी काही गाणी लिहिली. संगीतकार वसंत पवार यांनी त्यांची काही गाणी स्वरबद्ध केली. ती गाणी चित्रपटासाठी नव्हती. गाण्यावर अदाकारी करून पोट भरणाऱ्या कोल्हापूरच्या गरीब कलावंतिणींना ही गाणी पवारांनी फुकट देऊन टाकली होती. पण वसंत पवारांनीच त्यांना चित्रपटासाठी गाणी लिहायची पहिली संधी लवकरच दिली. १९६२ मध्ये निघालेल्या रंगल्या रात्री अशाया संगीतप्रधान चित्रपटासाठी पवारांनी खेबुडकरांकडून प्रथमच तीन लावण्या लिहून घेतल्या.

वसंत पवारांचे बोट धरून खेबुडकर चित्रपटसृष्टीत आले खरे, पण त्यांचे खरे सूर जमले ते पवारांचे शिष्य संगीतकार राम कदम यांच्याशीच! संगीतकार राम कदम व गीतकार खेबुडकर यांच्या शब्दसुरांच्या मिलाफाने मराठी रसिकांना जवळजवळ दोन दशके मनमुराद आनंद दिला. या काळातील बहुतेक मराठी चित्रपट ग्रामीण पार्श्वभूमीचे असल्यामुळे त्यातील गाणी ही अस्सल मराठमोळी-ग्रामीण समाजजीवनाची, सणांची, चालीरीतींची, रूढी-परंपरांची अशी होती. त्यात गण-गौळण, सवाल-जवाब,  झगडे, भूपाळी, भारूड, विराणी, वासुदेव, कीर्तन, नागोबाची-हादग्याची, मंगळागौरीची-हळदीची-लग्नाची गाणी, मोटेवरची गाणी, कोळीगीते, धनगराची गाणी, डोंबाऱ्याची गाणी, लेझीम, शेतकरी गीत असे अस्सल मराठी मातीचे असंख्य गीतप्रकार होते. खेबुडकरांनी हे सारे गीतप्रकार अतिशय समर्थपणे शब्दबद्ध केले.

‘तमाशा’ हा मराठी मातीचा वारसा. तो जपण्यासाठी खेबुडकरांनी अथकपणे असंख्य  लावण्या लिहिल्या. ग.दि. माडगूळकरांनंतर तेवढ्याच समर्थपणे आणि ताकदीने खेबुडकरांनी लावण्या लिहिल्या. माडगूळकरांप्रमाणेच त्यांनीही लावणी लिहिताना लेखणीचा आब व तोल साधला. अभिजाततेचा व कलात्मकतेचा स्पर्श असलेल्या लावण्या खेबुडकरांनी लिहिल्या. आयुष्यात तमाशा कधीही न बघितलेल्या खेबुडकरांनी एकापेक्षा एक फर्मास व फाकडू लावण्या लिहिल्या, ही वैशिष्ट्यपूर्ण देणगी त्यांना लाभली होती. गदिमा, सुधीर फडके व राजा परांजपे या त्रिकुटाप्रमाणेच राम कदम, अनंत माने व जगदीश खेबुडकर हे त्रिकूटही मराठी चित्रपटसृष्टीत गौरवास्पद ठरले.

शांतारामबापू, भालजी यांच्यापासून अगदी लहानसहान निर्मात्यापर्यंत अनेक चित्रपटांची गाणी त्यांनी कुशलपणे लिहिली. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी ६० वर्षे अव्याहतपणे ३५० चित्रपटांसाठी सुमारे २७५० गाणी लिहिली. साठहून अधिक संगीतकारांसाठी गाणी लिहिणारे ते एकमेव गीतकार होते. व्ही. शांताराम दिग्दर्शित पिंजराची गाणी सर्वात गाजली.

सुमारे २६ चित्रपटांचे कथा-पटकथा-संवाद त्यांनी लिहिले होते, तर देवघरनावाच्या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती. गेल्या तीन पिढ्यांचे ते लोकप्रिय गीतकार होते. सवाल माझा ऐका’ (१९६५), ‘केला इशारा जाता जाता’ (१९६६), ‘आम्ही जातो अमुच्या गावा’ (१९६८), ‘गण-गौळण’ (१९६९), ‘भोळीभाबडी’(१९७२), ‘सुगंधी कट्टा’ (१९७३), ‘बायकांनो नवरे सांभाळा’ (१९७४), ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ (१९७६) आणि झेड.पी.’ (१९९०) या सर्व चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचे उत्कृष्ट गीतलेखनाचे पुरस्कार लाभले होते. राज्य शासनातर्फे दिला जाणारा व्ही.शांताराम पुरस्कार’, ‘गदिमा पुरस्कार’, ‘पी.सावळाराम पुरस्कारसंगीतकार राम कदम पुरस्कारया अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले होते.

मूत्रपिंडाच्या आजाराने जगदीश खेबुडकर यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.

- मधू पोतदार

खेबुडकर, जगदीश गोविंद