Skip to main content
x

खेडकर, बंडोपंत रखमाजी

     ज्यांची स्मारकशिल्पे सर्वाधिक संख्येने महाराष्ट्रभर लागली आहेत असे शिल्पकार म्हणजे बी.आर. खेडकर. त्यांच्या आईचे नाव चंद्रभागा. खेडकरांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती व खेळणी बनविण्याचा व्यवसाय होता. लहानपणीच मातृ-पितृछत्र हरपल्याने वडीलबंधू दत्तोबा खेडकर यांनीच बी.आर.खेडकरांना वाढविले. घरातच मूर्तिकाम होत असल्याने त्यांना साहजिकच त्यात रस होता. शाळेत जाता-येता शिवाजी प्रिपरेटरी हायस्कूलच्या आवारातील शिवाजी महाराजांचा पुतळा ते तासन्तास न्याहाळत असत. ‘अशी भव्य मूर्ती आपल्याला कधी बनवता येईल’ हा ध्यास त्यांच्या बालमनाने घेतला आणि हीच त्यांच्या शिल्पसाधनेची सुरुवात ठरली. केवळ दुसऱ्या इयत्तेपर्यंत शालेय शिक्षण घेतलेल्या खेडकरांनी शिल्प किंवा चित्रकलेचे रीतसर शिक्षण न घेताच स्वत:ची कला विकसित केली.

खेडकर पुण्यात १९५०-१९५५ च्या दरम्यान गणेशाच्या सुबक मूर्ती, सजावटी, ऐतिहासिक, पौराणिक, राजकीय व सामाजिक विषयावरील देखावे व सजावटी करत. त्यामुळे त्यांना नावलौकिक मिळाला. पण यात ते समाधानी नव्हतेे. शिल्पकार करमरकरांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याने  त्यांच्या मनात घर केले होते. त्याचा प्रभाव इतका होता की, लहानपणी त्यांनी गणपतीची मूर्ती बनवली होती व तिला शिवाजी महाराजांचे तोंड लावले होते!

मूर्तिकामातून मिळणारे पैसे व गरिबी यांचा ताळमेळ बसत नव्हता. म्हणून त्यांनी सिनेमा क्षेत्रात, स्टुडीओतील सेटवर कलात्मक काम करण्याचे ठरविले. भालजी पेंढारकरांच्या पुण्यातील स्टुडीओत खेडकरांना नोकरी मिळाली. त्यानंतर प्रभात फिल्म कंपनीतल्या उमेदवारीच्या काळात दिग्दर्शक फत्तेलाल व मोल्डिंग विभागाचे सोनोपंत परदेशींनी त्यांना मोल्डिंग कौशल्यांबरोबर व्यवहारी जीवनासंबंधीही मोलाचे मार्गदर्शन केले. पुढे मुंबईच्या मोहन स्टुडिओत त्यांनी के. आसिफ यांच्याकडे नोकरी केली. तेथे खेडकर यांनी मुगल-ए-आझम या चित्रपटाचे भव्य सेट व शिल्पे तयार केली. याच वेळी त्यांनी सिनेसृष्टीला डमी पात्रासाठी मुखवटा तयार करण्याच्या तंत्राची ओळख करून दिली. यानंतर मात्र ते सिनेसृष्टीतील नावलौकिक व पैसा सोडून पुण्यात परतले व त्यांनी शिल्पकलेला वाहून घेतले.

१९६१ मध्ये घडविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हे खेडकरांचे पहिले शिल्प होय. हा पुतळा साताऱ्याला पवई नाका येथे आहे. आशिया खंडातला सर्वांत मोठा समजला जाणारा शिवाजी महाराजांचा साडेअठरा फुटांचा अश्‍वारूढ पुतळा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व अमेरिकेतील सॅन होजे येथील त्यांनी बनविलेले शिवाजी महाराज, संत बसवेश्‍वर, श्रीमंत बाजीराव पेशवे असे अश्‍वारूढ पुतळे त्यांच्या शिल्पप्रतिभेची साक्ष देतात.

शाहू महाराज, संभाजी महाराज, महात्मा गांधी, जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर, महर्षी कर्वे, स्वा. सावरकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, राजीव गांधी, एस.एम.जोशी, साधू वासवानी यांचे पूर्णाकृती पुतळे त्यांनी तयार केले आहेत. अहिल्याबाई होळकर, कस्तुरबा गांधी, क्रांतिवीर नाना पाटील, लाल बहादूर शास्त्री, पं.नेहरू, सुभाषचंद्र बोस इत्यादींचे ३०० ते ४०० अर्धपुतळे त्यांनी तयार केले आहेत.

शिल्पाची प्रमाणबद्धता, साधर्म्य, आविर्भाव, व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास, इतिहासाच्या जाणकारांकडून शिल्पाचे परीक्षण करून घेण्याची पद्धत यांमुळे खेडकरांची शिल्पे जनसामान्यांनाही आवडतात. स्मारकशिल्पांच्या व व्यावसायिक कामात शिल्पकार खेडकर गुंतले होते. त्यामुळे आयुष्यात शिल्पकलेची कलात्मक अभिव्यक्ती व प्रयोगशील आविष्कार यांकडे ते वळू शकले नाहीत.

खेडकरांना ‘फाय फाउण्डेशन’ पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा ‘जीवन साधना’ पुरस्कार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ‘लोकमान्य कलोपासक’ पुरस्कार, २००७ चा भारती विद्यापीठाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार, शारदा ज्ञानपीठाचा ‘महर्षी’ पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

- डॉ. नयना कासखेडीकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].