Skip to main content
x

खर्डेकर, बाळासाहेब हणूमंत

     बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांचा जन्म कोल्हापुरातील प्रसिद्ध सरलष्कर कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण बंगळुरू येथील पब्लिक स्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुण्याचे डेक्कन महाविद्यालय व  मुंबईचे एलफिन्स्टन महाविद्यालय येथे झाले. दोन्ही ठिकाणी त्यांना रॉलीन्स व पि. ई. ए. वुडहाऊस यांचे मार्गदर्शन मिळाले. १९३२ मध्ये बाळासाहेबांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथून बी.ए. पदवी मिळविल्यानंतर ‘लिंकन्स इन’ मधून ते बॅरिस्टर झाले. त्यावेळी इंग्रजी व कायदा ह्या दोन विषयात त्यांनी ट्रायपॉस मिळविला. या काळात परदेशातील वातावरण, शिक्षणप्रणाली, विचारधारा ह्यांचा मोठा प्रभाव बाळासाहेबांवर पडला.

     १९३७ मध्ये भारतात परत आल्यानंतर त्यांचा पिंड शिक्षकाचा असल्याने वकिलीचा व्यवसाय न करता शिक्षणक्षेत्रात कार्य करावयाचे ठरविले. त्यानुसार कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारे साहाय्य करणारे, सहकाऱ्यांबद्दल प्रेम असणारे, शिक्षकांच्या संशोधनवृत्तीला चालना देणारे कर्तव्यतत्पर प्राचार्य म्हणून बाळासाहेबांनी चांगला नावलौकिक मिळविला. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीच्या काळात त्यांनी सर्व परिस्थिती मोठ्या कौशल्याने  हाताळली, तसेच महाविद्यालयामधील व्यवस्था व स्वायत्तता सांभाळली.

     बाळासाहेबांचा निम्मा अधिक पगार विद्यार्थ्यांच्या मदतीसाठीच खर्च होत असे. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी समृद्ध ग्रंथालय, स्वतंत्र अभ्यासिका उपलब्ध करून दिली. आज विद्यापीठांतून, महाविद्यालयांतून राबविली जाणारी ‘अभ्यासिका’ ही संकल्पना त्यांचीच देणगी आहे. याच काळात कोल्हापूर संस्थानातील प्राथमिक शिक्षकांनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी सुरू केलेल्या चळवळीचे नेतृत्व बाळासाहेबांनी केले व शिक्षकांना त्यांचे हक्क मिळवून दिले. त्यासाठी राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा राजीनामा अगदी सहजतेने दिला.

     राजाराम महाविद्यालयाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर त्यांनी ‘शिक्षण प्रसारक मंडळ’ ही संस्था काढली. शिक्षण हा गोरगरिबांच्या मुलांचा घटनात्मक हक्क आहे ह्या भावनेतून शिक्षण प्रसारक मंडळाने १९४७ मध्ये कागल येथे माध्यमिक विद्यालय सुरू केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले. ह्या मंडळामार्फत १९६३ मध्ये दोनशे पन्नास प्राथमिक व तेरा माध्यमिक शाळा आणि दोन महाविद्यालये चालविली जात होती.

     १९५० मध्ये कागल येथे महाविद्यालय सुरू करून केंब्रिज विद्यापीठातील शिक्षणासारखे शिक्षण खेड्यांतील मुलांना मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचे नाव महाविद्यालयाला देऊन गोखले ह्यांचे एक चिरंतन स्मारक त्यांनी उभे केले. मात्र नंतरच्या काळात आलेल्या अडचणींमुळे हे महाविद्यालय कोल्हापूरला स्थलांतरित केले. तेथे या महाविद्यालयाचा संख्यात्मक व गुणात्मक विकास होत गेला. कोकण परिसरातील मुलांच्या बौद्धिक विकासास वाव देण्यासाठी त्यांनी अनेक अडचणींवर मात करीत तेथे एक महाविद्यालय काढले. मुलांमध्ये उच्च शिक्षणाविषयी अभिरुची निर्माण व्हावी म्हणून बाळासाहेब स्वत: व्याख्याने देत असत व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधीत असत. ह्या दोन्ही महाविद्यालयांना नावरूप प्राप्त झाल्यावर अनासक्त वृत्तीने बाळासाहेबांनी त्यांची सूत्रे प्रा. पेडणेकर यांच्याकडे सुपूर्द केली.

     भारताच्या घटना समितीत कोल्हापूर संस्थानचे प्रतिनिधी म्हणून बॅरिस्टर खर्डेकरांनी उल्लेखनीय कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांचे घनिष्ठ स्नेहाचे नाते निर्माण झाले. लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर सर्वांत अधिक मते मिळवून लोकसभेवर निवडून जाणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची नोंद झाली. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, देशातील प्रश्‍नांचा परिपूर्ण अभ्यास व अस्खलित वक्तृत्वामुळे बाळासाहेब खर्डेकरांची लोकसभेतील भाषणे गाजली व त्यांची एक प्रतिमा निर्माण झाली.

     सामान्य माणसाला सामाजिक प्रश्‍नांची जाणीव व्हावी ह्यासाठी बाळासाहेबांनी ‘दैनिक सुदर्शन’ हे वृत्तपत्र काढून अनेक विषयांवर लेखन केले. लोकसभेतील त्यांची भाषणे व त्यांचे विचार ह्या वृत्तपत्रातून समाजापर्यंत पोहोचले. कोल्हापूर विद्यापीठाची स्थापना व्हावी म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नांना विशेष महत्त्व आहे. अखंडपणे ग्रंथांवर प्रेम करणाऱ्या ह्या ग्रंथमित्राचे, शिवाजी विद्यापीठाने ‘बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालया’ची स्थापना करून चिरंतन स्मारक उभे केले आहे.

     - डॉ. शिवलिंग मेनकुदळे

खर्डेकर, बाळासाहेब हणूमंत