Skip to main content
x

लाळ्ये, प्रमोद गणेश

     प्रमोद गणेश लाळ्ये यांचा जन्म पुण्यात झाला व त्यांचे शिक्षणही पुणे येथेच झाले. त्यांनी पुणे विद्यापीठात संस्कृत विषयात व नंतर हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठातून हिंदी विषयात अशा दोन एम.ए. पदव्या संपादन केल्या. तसेच १९६९ साली उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘स्टडीज इन देवी भागवत’ असा होता. याखेरीज ते हिंदी प्रचारसभेचे साहित्याचार्य आहेत. प्रा. लाळ्ये यांचे संस्कृत साहित्य व भाषाविज्ञान या क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान आहे. सन २०००मध्ये त्यांना राष्ट्रपती गौरव प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.

प्रा. लाळ्ये यांनी उस्मानिया विद्यापीठाच्या संस्कृत विभागात संशोधनाचे व अध्यापनाचे दीर्घकाळ कार्य केले, आणि तेथूनच ते १९८८मध्ये विभागप्रमुख या पदावरून निवृत्त झाले. त्यांची दहा पुस्तके व अनेक शोधनिबंध आहेत. त्यांतील ‘स्टडीज इन देवी भागवत’ (पॉप्युलर प्रकाशन, १९७३), ‘पुराणविमर्शसूची’ (१९८५), ‘मल्लीनाथ’ (साहित्य अ‍ॅकॅडमी, २००२), ‘लौकिकनायककोश’ (भारतीय कला प्रकाशन, २००६) व ‘कर्सेस अ‍ॅन्ड बून्स इन वाल्मिकी रामायण’ (भारतीय कला प्रकाशन, २००८) हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. प्रा. लाळ्ये यांच्या सन्मानार्थ ‘प्रमोदसिंधू’ हा गौरवग्रंथ २००३ मध्ये प्रकाशित झाला आहे.

डॉ. प्रमोद जोगळेकर

लाळ्ये, प्रमोद गणेश