Skip to main content
x

मालशे, मिलिंद सखाराम

     मिलिंद सखाराम मालशे यांचा जन्म मुंबई येथे झाला. इंग्रजी व सौंदर्यशास्त्र हे विषय घेऊन ते एम.ए. झाले. नंतर ‘साहित्य-प्रकार’ हा विषय घेऊन त्यांनी इंग्रजी विषयात मुंबई विद्या-पीठाची पीएच.डी. मिळवली. त्याचप्रमाणे हैद्राबाद येथून ‘भाषाविज्ञान’ या विषयासाठी एम.लिट. ही पदवीही त्यांनी मिळवली.

     मानव्यविद्या आणि सामाजिक विज्ञान विभाग, आय.आय.टी. पवई, मुंबई येथे ते प्राध्यापक म्हणून इंग्रजी भाषा व साहित्य या विषयाच्या अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी साहित्य व सौंदर्यशास्त्र या विषयात पंधरा विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे.

     भाषाविज्ञान, शैलीमीमांसा, चिन्हमीमांसा इत्यादी क्षेत्रांत विपुल व दर्जेदार लेखन करून आपला ठसा उमटवणारे भाषातज्ज्ञ म्हणून प्रा. मिलिंद मालशे यांची ओळख मराठी लेखन क्षेत्रात आहे. त्याचबरोबर ‘सौंदर्यशास्त्र’ या मराठीतील काहीशा दुर्लक्षित विषयावरही त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. सौंदर्यशास्त्राचा केवळ अभ्यास करूनच ते थांबले नाहीत, तर संगीत कलेतील सौंदर्याचा शोध घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाची शास्त्रीय संगीताची पदविका घेऊन या विषयावर त्यांनी अनेक व्यासंगपूर्ण लेख लिहिले आहेत. त्याचप्रमाणे देशात, तसेच देशाबाहेर त्यांनी गायनाच्या मैफलीही केल्या आहेत.

     त्यांच्या ‘साहित्याभ्यासाची शैलीलक्षी पद्धत’ व ‘अत्याधुनिक भाषाविज्ञान : सिद्धान्त आणि उपयोजन’ या ग्रंथांमधून मराठी भाषाविज्ञानाला नवे वळण मिळाले असे आपल्याला दिसून येते. यातून भाषाविज्ञानातील अनेक आधुनिक विचारप्रवाहांचे दर्शन घडते. त्यांच्या ‘आधुनिक समीक्षा-सिद्धान्त’ व ‘अशीींहशींळली ेष ङळींशीरीू उश्ररीीळषळलरींळेप’ या ग्रंथातूनही खर्‍या अर्थाने संशोधन करून नवीन विचार मांडल्याचा प्रत्यय येतो. यामध्ये ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान : स्वरूप व पद्धती’ या ग्रंथातील लेखांचा समावेश करावा लागेल.

     कॉलिंगवुड, चॉम्स्की, याकबसन, डेल हाइम्स इत्यादी विचारवंतांचे ग्रंथ व लेख मराठीत भाषांतरित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी केले आहे. मराठी तसेच इंग्रजी नियतकालिकातून ते सातत्याने लेखन करत असतात. देशात व देशाबाहेरही विविध विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी संशोधनात्मक निबंध सादर केले आहेत. १९९४ साली केंब्रिज सेमिनारमध्ये भाग घेण्यासाठी ब्रिटिश काऊन्सिलतर्फे त्यांची निवड झाली होती. त्यांच्या ‘आधुनिक भाषाविज्ञान: सिद्धान्त व उपयोजन’ या ग्रंथाची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्याला उत्कृष्ट ग्रंथाचा पुरस्कार दिला, तर ‘आधुनिक समीक्षा सिद्धान्त’ या ग्रंथाला उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ म्हणून श्रीमती विभावरी पाटील अनुष्टुभ पुरस्कार, इचलकरंजी आपटे वाचनालय पुरस्कार व म.सा.प.चा प्रा.रा.श्री.जोग पुरस्कार असे तीन पुरस्कार मिळाले आहेत.

     एकंदरीतच भाषाविज्ञान, सौंदर्यशास्त्र व संगीत या तीनही क्षेत्रांत डॉ. मालशे यांनी महत्त्वपूर्ण भर घातली आहे असे म्हणता येते.

     - वैखरी वैद्य

मालशे, मिलिंद सखाराम