माने, नामदेव केशव
नामदेव केशव माने यांची घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्यांचे ११वीपर्यंतचे शिक्षण झाले. द्राक्षशेतीची त्यांची इच्छा १९७१मध्ये पूर्ण झाली. प्रा. दाभोळकर, वसंतराव आर्र्वे यांसारख्यांचे मार्गदर्शन लाभल्याने नामदेव माने यांनी द्राक्ष शेतीमध्ये अनेक प्रयोग करून त्याचे निष्कर्ष तपासून पाठपुरावा केला. महाराष्ट्रातील अनेक द्राक्ष बागायतदारांना हे निष्कर्ष फायद्याचे ठरलेले दिसतात . माने यांनी आंबा कलम करण्यासही सुरुवात केली. त्यांनी सांगली व सोलापूर या दुष्काळी विभागांत द्राक्ष बागा वाचवण्यासाठी १९८५ साली वॉटर टँकरची संकल्पना मांडली. नामदेव माने यांनी द्राक्षासाठी प्रचलित ग्राफ्टिंगची पद्धत बसवली. त्यांनी आंबा तसेच द्राक्ष बागांचा अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, इस्राएल, इजिप्त, युरोप, अमेरिका इत्यादी देशांना भेटी दिल्या.
नामदेव केशव माने १९७३पासून महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक म्हणून पदभार सांभाळला . माने यांनी १९९१ - १९९४ या तीन वर्षांमध्ये संघाचे अध्यक्ष म्हणून अत्यंत मौलिक काम केले. बेदाणा प्रक्रियेसंबंधी प्रात्यक्षिके आयोजित करून हे ज्ञान सर्वसामान्य द्राक्ष बागायतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी नामदेव माने यांनी बरेच कष्ट घेतले . माने यांनी बेदाण्यावरील विक्रीकर रद्द करून घेण्यासाठी अथकपणे प्रयत्न करून त्यात यश मिळवले .
- संपादित