Skip to main content
x

मांडे, प्रभाकर भानुदास

      प्रभाकर भानुदास मांडे यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सावखेड या गावी झाला. मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून आई लक्ष्मीबाई व वडील भानुदासराव मांडे यांनी औरंगाबादेतच घर करून त्यांना शिक्षण घेण्याची संधी प्राप्त करून दिली. एम.ए.बी.एड., पीएच.डी., डी.लिट. असे उच्चविद्या वैभव प्राप्त करून त्यांनी आई-वडिलांचे स्वप्न साकार केले. अध्ययन व अध्यापन हेच जीवनध्येय ठरल्याने १९५१ ते १९६१ या काळात माध्यमिक शिक्षक, नंतर १९६२ ते १९७३ अशी १२ वर्षे महाविद्यालयांमध्ये मराठीचे प्राध्यापक व पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात १९७३ ते १९८९ या काळात प्रपाठक म्हणून, तर १९८९ ते १९९३ या काळात प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य त्यांनी केलेे आहे. १९९४-९५मध्ये धुळे येथील का.स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेचे संचालकपद त्यांनी भूषवले. तर पुढे १९९५ ते १९९७ या काळात महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्था औरंगाबाद येथे संचालकपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना संशोधन कार्याची आवड होती. मध्वमुनीश्वर यांच्या चरित्रावर लिहिलेल्या लेखाने संशोधनाचा श्रीगणेशा घडला. हा लेख मिलिंद महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य म. भि. चिटणीस यांना खूपच भावला. त्यांनी मांडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे नेले. डॉ. आंबेडकरांनी या लेखाचे कौतुक केले व ‘असाच अभ्यास करत राहा, शोध घेत राहा’, असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून मांडे यांचे संशोधन कार्य झपाटलेपणाने सुरू झाले ते आजतागायत तसेच सुरू आहे.

डॉ. मांडे यांनी शास्त्रीय दृष्टीकोनाचा अवलंब करून चिकित्सक दृष्टीने एकवीस हजार ओवीगीते, दीड हजारांवर लोकगीते व शेकडो लोककथा यांचे साक्षेपी संशोधन केले. गोदावरी शोध प्रकल्पांतर्गत गोदाकाठी पदयात्रा काढून या परिसराच्या प्राचीनतेचा वेध घेतला. महाराष्ट्रभर अनेक शोधयात्रा काढून, प्रत्यक्ष क्षेत्रीय संशोधन करून, लोकजीवनामध्ये प्रचलित असलेल्या विधी, रूढी, परंपरा, लोकगीते, कथागीते, लोकविश्वास, विधिनाट्ये इत्यादींचा धांडोळा घेतला व आपल्या विविध ग्रंथांद्वारे त्यांवर भाष्य केले आहे. लोकसाहित्यात पुरातत्त्वांचे लोकप्रचलित स्वरूप आढळत असल्याने डॉ. मांडे यांचे लोकसाहित्यावरचे ग्रंथ पुरातत्त्वशास्त्रदृष्ट्या महत्त्वाचे आहेत.

लोकसाहित्य तत्त्वांच्या आधारे पुरातत्त्वांचा वेध कसा घेता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. मांडे यांचा ‘रामकथेची मौखिक परंपरा’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. रामायण हे केवळ मिथक नाही, काल्पनिक नाही तर ऐतिहासिक सत्यावर आधारलेले महाकाव्य आहे, हे डॉ. मांडे यांनी या ग्रंथातून दाखवून दिले आहे व रामायणाच्या रचनेपूर्वी काही हजार वर्षे रामचरित्रासंबंधीच्या कथा-गाथा मौखिक परंपरेने प्रवाही होत्या, पण या मौखिक परंपरांचे पाश्चिमात्य अभ्यासकांना यथार्थ आकलन झाले नाही; असा निर्वाळा देऊन रामायणाच्या प्राचीनतेवर त्यांनी प्रकाश टाकला आहे.

‘गावगाड्याबाहेर’, ‘सांकेतिक आणि गुप्त भाषा, परंपरा व स्वरूप’, ‘मांग आणि त्यांचे मागते’ आणि ‘मौखिक वाङ्मयाची परंपरा, स्वरूप आणि भवितव्य’ हे त्यांचे ग्रंथही या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

‘गावगाड्याबाहेर’ या ग्रंथामध्ये त्यांनी भटक्या जातीजमातींच्या जीवनाचा वेध, त्यांच्या प्राचीन परंपरा, रूढी, विधी व भाषा यांसह घेतला आहे. यातील जीवनदर्शन अस्वस्थ करणारे, दाहक आहेच पण प्राचीन समाजजीवनाच्या अनेक अलक्षित कंगोर्‍यांवर प्रकाश टाकणारे आहे. ‘डक्कलवार’ या जातीचे विशेष, त्यांचे ‘बसवपुराण’ अशा विषयांवरचे ग्रंथातील विवेचन याची साक्ष देणारे आहे. ‘सांकेतिक आणि गुप्तभाषा, परंपरा व स्वरूप’ या ग्रंथामध्ये डॉ. मांडे यांनी व्यावसायिक आणि दलाल यांची गुप्तभाषा; भटके-विमुक्त जातींच्या गुप्तभाषा यांविषयी सोदाहरण चर्चा करून गुप्तभाषेचे स्वरूप समाजासमोर आणले आहे. भटकेविमुक्तांच्या जीवनसरणीचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा दस्तऐवज ठरणारा हा ग्रंथ आहे.

‘मांग आणि त्यांचे मागते’ या ग्रंथात त्यांनी मांग या जातीच्या परंपरांचा अत्यंत साक्षेपाने वेध घेतला आहे. लोकपरंपरेने प्रचलित असलेल्या कथा आणि समजुती लक्षात घेऊन मांग ही अतिप्राचीन जमात कशी होती व एके काळी ऐश्वर्य भोगलेल्या जमातीला काळाच्या प्रवाहात अनेकविध कारणांनी आजची अवस्था का प्राप्त झाली, याचे मौलिक विवेचन त्यांनी केले आहे. लोकसाहित्य सामग्रीचा वापर करून एखाद्या जातीविषयी कसे संशोधन करता येते, याची साक्ष म्हणजे हा ग्रंथ होय.

‘मौखिक वाङ्मयाची परंपरा, स्वरूप आणि भवितव्य’ या ग्रंथामधून त्यांनी मौखिक वाङ्मयाच्या स्वरूपाची चिकित्सा करून या वाङ्मयाच्या आशयातून अभिव्यक्त होणार्‍या गाभ्याच्या तत्त्वात, भारतीयांच्या जीवनविषयक धारणांचे एकत्व कसे दिसते याचे मर्मग्रही विवेचन केले आहे व लोकाविष्कारांमधून हजारो वर्षांपासून प्रवाही असणार्‍या धारणाच विविधतेतून एकात्मता कशी साकार करतात, याचे सूत्र उलगडून दाखवले आहे. ‘लोकसाहित्याचे अंत:प्रवाह’ हा त्यांचा ग्रंथही लोकधर्मीय तत्त्वांवर मूलगामी प्रकाश टाकणारा आहे. आपले जीवन लोकसाहित्य अभ्यासक्षेत्राला वाहून घेतलेल्या या व्यासंगी संशोधकाला कै. विनायकराव चारठाणकर पुरस्कार, मातोश्री जोंधळे पुरस्कार, कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार, बन प्रतिष्ठानचा जीवनसाधना पुरस्कार असे विविध पुरस्कार लाभलेे आहेत. त्यांचे अनेक ग्रंथही पुरस्कारप्राप्त आहेत. ‘पंडित दामोदर विरचित महानुभावीय पद्मपुराण’ या ग्रंथास अखिल भारतीय महानुभाव परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.

‘लोकरंगभूमी’ या ग्रंथास महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार लाभला आहे. त्यांचे ‘मांग आणि त्यांचे मागते’, ‘रामकथेची मौखिक परंपरा’ हे ग्रंथही महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेच्या पुरस्काराने सन्मानित आहेत. विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. २१ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीसाठी व १३ विद्यार्थ्यांना एम.फिल. पदवीसाठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. २९व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद व औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे.

लोकसाहित्याचे व लोकसंस्कृतीचे अभ्यासक्षेत्र पुरातत्त्वांचा वेध घेण्यासाठी कसे उपयोगी ठरते याचा वस्तुपाठच डॉ. मांडे यांनी आपल्या ग्रंथांमधून अभ्यासकांसमोर ठेवला आहे. त्यांचे हे कार्य पुरातत्त्व अभ्यासकाला दिशा देणारे आहे.

डॉ. संजय देशमुख

संदर्भ
१. लोकप्रज्ञा (आविष्कार आणि स्वरूप) संपादक - कवठेकर, प्रा. डॉ. बाळकृष्ण; मोहरीर, प्रा. डॉ. ल. का.; प्रकाशक - अमृत महोत्सव समिती- २००७.
मांडे, प्रभाकर भानुदास