Skip to main content
x

मंगेशकर, उषा दीनानाथ

पल्या ठसकेबाज गायनाने मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या उषा मंगेशकर या मास्टर दीनानाथ मंगेशकर व माई मंगेशकर यांचे चौथे अपत्य. मा.दीनानाथांचे १९४२ साली निधन झाले त्या वेळी उषाताईंचे वय अवघे सात वर्षांचे होते. मास्टर दीनानाथ आपल्या दोन मोठ्या मुली, लता व मीना यांना गाण्याची तालीम देत, त्या वेळी आशा व उषा खेळत असत. मा.दीनानाथांना भविष्य उत्तम अवगत होते. ‘‘माझी पाचही अपत्ये मोठी झाल्यावर माझं नाव काढणार आहेत व मोठे कलावंत होणार आहेत,’’ असे भविष्य त्यांनी वर्तविले होते. त्यातही उषाबद्दल असे भविष्य वर्तविले होते, की तिच्या पत्रिकेत बालरवी आहे, त्यामुळे तिचा भाग्योदय उशिरा होणार आहे. मा.दीनानाथांचे उषा मंगेशकरांबद्दलचे भविष्य पुढे तंतोतंत खरे ठरले.

मा.दीनानाथांच्या निधनानंतर पुढची पाच वर्षे मंगेशकर कुटुंबीयांसाठी अतिशय कष्टदायक होती. लता मंगेशकरांना मा. विनायकांच्या कंपनीत काम मिळाले आणि सगळे मंगेशकर कुटुंबीय पुण्याहून कोल्हापुरात जाऊन राहू लागले. पुढे १९४५ साली मा. विनायकांनी कंपनीचा मुक्काम कोल्हापुराहून मुंबईला हलविला. त्यामुळे आशा, उषा, हृदयनाथ आपल्या आई, माईंबरोबर थाळनेरला, आपल्या आजोळी राहू लागले. पुढे काही दिवसांनी लता मंगेशकरांना मुंबईमध्ये राहावयास जागा मिळाली आणि सगळी मंगेशकर भावंडे आपल्या आईबरोबर पुन्हा एकत्र राहू लागली. या काळात उषा मंगेशकरांचा चित्रपटसृष्टीशी संबंध फक्त मा.विनायकांच्या ‘माझं बाळ’ या चित्रपटातील एका गाण्याच्या प्रसंगापुरता आला. ‘चला चला नवबाला’ या गाण्यात प्रभातफेरीच्या प्रसंगी एक छोटीशी भूमिका त्यांनी केली होती.

पुढे १९४७ साली लता मंगेशकर यांना हिंदी, मराठी चित्रपटांत पार्श्वगायनाचे काम मिळाले आणि अल्पावधीतच त्या सर्वोच्च स्थानावर पोहोचल्या. त्यामुळे घरात पुन्हा सुबत्ता आली आणि लता मंगेशकरांनी आपल्या भावंडांना उत्तम शिक्षण घेण्यास सांगितले. शालेय शिक्षणाबरोबर उषा मंगेशकरांचा गाण्याचा रियाझ घरी सुरू होता. त्यांनी १९५२ साली प्रथम हिंदी चित्रपट ‘सुबह का तारा’मध्ये पार्श्वगायन केले. मराठीमध्ये मात्र त्यांचे पार्श्वगायन उशिरा सुरू झाले.

गायनाव्यतिरिक्त उषा मंगेशकरांना नृत्य व चित्रकलेची आवड . एम. आर. आचरेकर या प्रख्यात चित्रकारांकडे उषा मंगेशकरांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले. लता मंगेशकरांचे काम वाढल्यामुळे घरातील पैशांची आवक वाढली, त्यामुळे घरामध्ये योग्य शिस्त आणि आर्थिक नियोजन करण्याची गरज निर्माण झाली. उषा यामुळे लहान वयातच प्रौढ झाल्या आणि तेव्हापासून घरातील सर्व महत्त्वाचे निर्णय त्याच घेत असतात. घरातील व्यवस्थापनाला उषा मंगेशकरांनी प्राधान्य दिल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांनी पार्श्वगायनासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत.

मराठी चित्रपट गायनात उषा मंगेशकरांची कारकीर्द प्रदीर्घ आहे. ही कारकीर्द दोन टप्प्यांतील आहे. पहिला टप्पा साठच्या दशकातील; त्यांची गाणी जी वेगवेगळे भाव दर्शविणारी आहेत, तर दुसरा टप्पा ‘पिंजरा’, ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’ या चित्रपटांतील गीतांचा. येथपासून त्यांच्या गाण्यांची संख्या वाढली आणि त्या लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाल्या. दादा कोंडके, राम कदम आणि ग्रामीण बाजाचे चित्रपट यांसाठी उषा मंगेशकरांचा आवाज असणे अविभाज्य झाले. याच सुमारास त्यांच्या आवाजात अनेक ध्वनिमुद्रिकाही आल्या. त्यांच्या खाजगी ध्वनिमुद्रिकांमध्ये भावगीते, भक्तिगीते, बालगीते इत्यादी वैविध्य आहे. एकाच वेळी चित्रपटातील लावणी,  ग्रामीण ढंगाची गाणी गाऊन ग्रामीण श्रोत्यांची आवडती गायिका बनणे, तर दुसरीकडे खाजगी ध्वनिमुद्रिकांद्वारे भावगीते, भक्तिगीते गाऊन शहरी वर्गाची दाद मिळवणे, असे दुहेरी आव्हान उषा मंगेशकरांनी पेलले.

वसंत पवार यांनी संगीत दिलेल्या, ‘गाठ पडली ठकाठका’ या १९५६ सालच्या चित्रपटात उषा मंगेशकरांनी मीना व लता यांच्यासमवेत ‘नको जाऊ नारी यमुनाकिनारी’ हे गीत गायिले. त्यानंतर ‘गुरूची विद्या गुरूला’ (संगीत : दादा चांदेकर), ‘भाव तेथे देव’ (संगीत : जितेंद्र अभिषेकी), ‘थोरातांची कमळा’ (संगीत : दत्ता डावजेकर), ‘वैशाख वणवा’ (संगीत : दत्ता डावजेकर), ‘स्वयंवर झाले सीतेचे’ (संगीत : वसंत देसाई), तर ‘सोंगाड्या’ या राम कदमांच्या गाजलेल्या चित्रपटापूर्वी, ‘सुख आले माझ्या दारी’, ‘पाटलाची सून’, ‘वारणेचा वाघ’ या काही चित्रपटांत राम कदमांच्या संगीत दिग्दर्शनात उषा मंगेशकर गायल्या होत्या.

लता मंगेशकरांनी ‘आनंदघन’ या नावाने ज्या मराठी चित्रपटांना संगीत दिले होते, त्यांतील ‘साधी माणसं’ या चित्रपटात लता व उषा यांचे ‘राजाच्या रंगम्हाली सोन्याचा बाई पलंग’ हे एक सुंदर मराठमोळे गीत आहे. उषा मंगेशकरांनी १९६५ साली गो.नी.दांडेकर यांच्या कथेवर ‘पवनाकाठचा धोंडी’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटातील एक ठसकेबाज गाणे, ‘काय बाई सांगू, कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज’ आजही लोकप्रिय आहे. पुढे उषा मंगेशकर यांनी ‘जैत रे जैत’ या चित्रपटाची निर्मिती केली, त्यालाही पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत होते.

मराठी चित्रपटांत १९७० नंतर तमाशाप्रधान चित्रपटांची लाट आली. शाहीर दादा कोंडके यांनी १९७१ साली ‘सोंगाड्या’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला राम कदम यांचे संगीत होते. उषा मंगेशकरांनी उषा चव्हाणांसाठी पार्श्वगायन केले, तर जयवंत कुलकर्णी दादा कोंडक्यांसाठी गायले. या चित्रपटातील ‘माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी’, ‘काय ग सखू बोला दाजिबा’ (सोबत जयवंत कुलकर्णी), ‘राया मला पावसात नेऊ नका’ ही गाणी महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली. ‘एकटा जीव सदाशिव’ या चित्रपटासाठी त्यांना १९७२ साली राज्य सरकारचा उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. पुढे दादा कोंडक्यांच्या प्रत्येक चित्रपटांत उषा चव्हाणांसाठी उषा मंगेशकरांनीच पार्श्‍वगायन करायचे असा अलिखित करारच झाला. काही चित्रपटांना राम कदम यांच्याऐवजी राम लक्ष्मण, प्रभाकर जोग यांचे संगीत होते, तसेच दादा कोंडक्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांच्याऐवजी महेन्द्र कपूर पार्श्‍वगायन करू लागले.

उषा मंगेशकरांनी १९७२ साली ‘आई मी कुठं जाऊ’ या चित्रपटाला संगीत दिले. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे पार्श्वगायिका म्हणून गाजत असताना या चित्रपटात त्यांनी एकही गाणे गायले नाही, तर लता, आशा व हृदयनाथ यांच्याकडून त्यांनी गीते गाऊन घेतली. याच सुमारास व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला राम कदम यांचे संगीत होते. ‘छबीदार छबी मी तोर्‍यात उभी’, ‘मला लागली कुणाची उचकी’, ‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल’, ‘मला इष्काची इंगळी डसली’, ‘दिसला ग बाई दिसला’ ही उषा मंगेशकरांच्या आवाजातली सगळी गाणी लोकप्रिय झाली. त्यानंतर व्ही. शांताराम यांचा ‘चंदनाची चोळी माझं अंग अंग जाळी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील ‘एक लाजरा न् साजरा मुखडा’ हे उषा मंगेशकरांनी अरुण सरनाईक     यांच्याबरोबर गायलेले द्वंद्वगीत अतिशय गाजले.

‘एकटा जीव सदाशिव’ या दादा कोंडक्यांच्या पहिल्या चित्रपटापासून ते ‘येऊ का घरात’ या चित्रपटापर्यंत त्यांच्या प्रत्येक चित्रपटात उषा मंगेशकरांनी पार्श्वगायन केले. ‘सोंगाड्या’, ‘पिंजरा’ या चित्रपटांपासून संगीतकार राम कदम यांनी प्रामुख्याने उषा मंगेशकरांच्या आवाजाला प्राधान्य दिले. विश्वनाथ मोरे, राम लक्ष्मण, भास्कर चंदावरकर, अनिल अरुण, बाळ पळसुले, दत्ता डावजेकर, आदि नारायणराव, ऋषिराज इत्यादी अनेक संगीतकारांकडे त्या अनेक गीते गायल्या आहेत, तर २०१० सालच्या ‘मुंबईचा डबेवाला’ या चित्रपटातही उषा मंगेशकरांनी पार्श्वगायन केले आहे. मराठीव्यतिरिक्त हिंदी, गुजराती, बंगाली, आसामी, भोजपुरी इत्यादी अनेक भाषांत त्यांनी गीते गायली आहेत. लता मंगेशकरांबरोबर परदेशांत त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या अनेक गीतांना पुरस्कार लाभले आहेत. १९७५ साली जय संतोषी माँ चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून  पुरस्कार, दादा कोंडके स्मृती पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

उषा मंगेशकर या एक उत्तम चित्रकार आहेत आणि याची प्रचिती त्यांनी केलेल्या ‘चाला वाही देस’, ‘अभंग तुकयाचे’, ‘गालीब’, ‘आदिनाथची गाणी’ इ. ध्वनिमुद्रिकांच्या वेष्टणांवरील चित्रांवरून आपल्याला येते. प्रभाकर पंडितांच्या ‘असेच मूक राहू या’ या १९६८ सालच्या भावगीताने उषा मंगेशकरांच्या  भावगीतगायनाची सुरुवात झाली. पुढे यशवंत देव, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, मीना मंगेशकर, अनिल-अरुण, विश्वनाथ मोरे, मानस मुखर्जी इत्यादी संगीतकारांकडे त्या अनेक भावगीते गायल्या. ‘केळीचे सुकले बाग’, ‘ससा तो ससा’, ‘थांब रे घना’, ‘वेळ झाली भर माध्यान्ह’, ‘सूर सनईत नादावला’, ‘साजणी सई ग’, ‘खिन्न या वाटा’, ‘धुंदीत गंधित होऊनी सजणा’ ही त्यांची काही गाजलेली भावगीते आहेत. त्यांनी आपल्या ‘रंग उषेचे’ या शीर्षकाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर केले.

अद्वैत धर्माधिकारी

मंगेशकर, उषा दीनानाथ