मंगळवेढेकर (जोशी), दत्तात्रेय केशव
दत्तात्रेय केशव जोशी यांचा जन्म मंगळवेढ्याला झाला. त्यांच्या आईचे नाव गीताबाई होते. त्यांचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पंढरपूरला झाले. पंढरपूर येथे १९१४ साली गायनाचार्य पंडित नारायणराव थिटे व वादनाचार्य पंडित नारायणराव जोशी (मंगळवेढेकर) या द्वयीने स्थापन केलेल्या ‘धर्मार्थ महाराष्ट्र संगीत विद्यालय’ पंढरपूर येथे दत्तोपंतांचे गायन, वादन व विशेष करून मृदंगवादनाचे शिक्षण वादनाचार्य ज्येष्ठ बंधू नारायणराव जोशी यांच्याकडे झाले.
जोशी यांचा तब्बल बारा ते चौदा वर्षांचा काळ मृदंगवादनकला शिकण्यात व मेहनतीत गेला. त्या काळी मोठ्या शहरांतून संगीत जलसे लावले जात असत. दत्तोपंतांनी सर्व भारतभर भ्रमण करून १९३८ सालापर्यंत जलसे लावून मृदंगवादनाचे, तसेच जलतरंग, तबला-तरंगवादनाचे कार्यक्रम केले. भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई येथे सुरू झाले होते. रेडिओवर मृदंगवादन करणारे ते पहिले कलाकार होते.
गुरुवर्य नारायणराव थिटे व नारायणराव जोशी यांनी विद्यालयाचा रौप्यमहोत्सव साजरा करून ते विद्यालय चालविण्याची दत्तोपंतांवर सोपवलेली जबाबदारी विद्यालयाचा हीरक महोत्सव साजरा करून त्यांनी पार पडली. त्यांच्या कारकिर्दीत असंख्य विद्यार्थ्यांनी या विद्यालयात गायन, वादन यांचे शिक्षण घेतले. साहित्यसम्राट न.चिं. केळकर, पं. आबासाहेब मुजुमदार व संगीत क्षेत्रातील थोर कलावंतांनी या विद्यालयास भेटी दिल्या. मंगळवेढेकर घराणे हे संगीत क्षेत्रात महाराष्ट्रातील महत्त्वाचे घराणे असून सध्या सातवी पिढी चालू आहे. पं. दत्तोपंतांनी तालशास्त्रात उल्लेख केलेले एकशे आठ ताल मृदंगावर वाजविले व आज त्या तालांचे ध्वनिचकतीमध्ये मुद्रण उपलब्ध आहे.
पं. दत्तोपंतांनी तालशास्त्रातील घराण्याची बोलरचना करण्याची पद्धत, तसेच साधा चक्रधार, कमाली चक्रधार कसे रचावेत, त्यांचे हिशेब ‘फ्रॉम हिअर टू एटर्निटी अलाइज वन हंड्रेड अँड एट इंडियन र्हिदम तालाज’या पुस्तकात दिले आहेत, ते अभ्यासूंना अतिशय उपयुक्त आहेत. त्या काळात प्रसिद्ध असलेली सिनेतारका कु. शांता आपटे हिला पं. दत्तोपंतांनी नृत्याचे शिक्षण दिले.
भारतातील अनेक आकाशवाणी केंद्रांवर पं. दत्तोपंतांच्या संगीत सभा झालेल्या आहेत. एकोणीसशे पंचावन्न साली धृपद गायक डागरबंधू यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यक्रमास मृदंग-साथीसाठी त्यांना आमंत्रित केले होते. पं. सियाराम प्रसाद तिवारी यांना बंगळुरू येथील हिवाळी संमेलनात त्यांनी मृदंगावर साथ केली.
दत्तोपंतांची गानमहर्षी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी प्रशंसा केली होती. त्यांना विशेष फाय फाउण्डेशन पुरस्कार, इचलकरंजी येथे प्राप्त झाला. शंकराचार्य, कांचीपीठ यांजकडून त्यांना ‘वादनाचार्य’ ही पदवी मिळाली. त्यांचे ‘भजनी मृदंग’ हे पुस्तक १९३५ मध्ये प्रसिद्ध झाले. इंदूर येथे त्यांना ‘नानासाहेब पानसे पुरस्कार’ देण्यात आला.
भोपाळ येथे भरलेल्या धृपद - धमार मेळाव्यात कार्यक्रम करून परत येत असता, हरियाणातील होडल या गावी त्यांचा मोटार अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या शिष्यवर्गात पं.शंकरराव मंगळवेढेकर, पं.दामुअण्णा जोशी-मंगळवेढेकर, पं. एस.व्ही. पटवर्धन, पं. सखाराम देशमुख, ज्ञानोबा लटपटे, सरोदवादक वसंत देव आदींचा समावेश होतो.