Skip to main content
x

मोडक, इमॅन्युएल सुमित्र

           मॅन्युएल मोडक यांचा जन्म सातारा येथे झाला. पुणे येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. मुंबईतील महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली. त्याच काळात ते ब्रिटिश इंडियन पोलीस परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १९४२ मध्ये सातारा येथे ते साहाय्यक पोलीस अधीक्षक या पदावर रुजू झाले. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचा तो काळ होता. साताऱ्यात त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकांनी पत्री सरकार स्थापन केले होते. सरकारी काम ठप्प करण्यासाठी सशस्त्र आंदालन करण्यात येई. त्या काळातील परिस्थिती मोडक यांनी अत्यंत कौशल्याने हाताळली. प्रसंगी वसंतदादा पाटील यांना त्यांनी अटकही केली होती. पण, तरीही आपले कर्तव्य बजावणारे मोडकम्हणून या नेत्यांशी त्यांचे संबंध सलोख्याचेच राहिले. १९४३ मध्ये किरण सेनगुप्त या बंगाली युवतीशी त्यांचा विवाह झाला.

साताऱ्यानंतर विजापूर, अहमदाबादजवळील खेडा, कोल्हापूर, सोलापूर नंतर मुंबई येथे त्यांनी पोलीस उपायुक्तपदी काम केले. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या उपमहासंचालकपदी त्यांना बढती मिळाली. पुणे शहरात पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर १९६५ मध्ये पुण्याचे पहिले पोलीस आयुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला.

१९६६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मोडक यांचे नाव सुचवले. जम्मू-काश्मीरच्या पोलीस संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. या पदावर उत्कृष्ट काम करून मोडक यांनी त्यांची निवड योग्य ठरवली.

१९७६ मध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकपदावर त्यांची नेमणूक झाली. या पदावरूनच ते १९७८ मध्ये निवृत्त झाले. पोलीस सेवा पदकाने त्यांचा गौरव करण्यात आला. तरुण वयात पोलीस पदक मिळवणारे आजपर्यंतचे ते एकमेव पोलीस अधिकारी आहेत. प्रामाणिक, हुशार, आणि कडक शिस्तीचे म्हणून ते प्रसिद्ध होते.

मोडक यांच्या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांच्या काही कथाही प्रसिद्ध झालेल्या आहेत. सेंटिनेल ऑफ सह्याद्री-मेमरीज अ‍ॅण्ड रिफ्लेक्शन्स या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केलेले आहे. साताऱ्यातील पत्री सरकार, १९६९ मधील शिवसेनेची आंदोलने, काश्मीरमध्ये ते कार्यरत असतानाची परिस्थिती अशा अनेक विषयांचा उहापोह त्यांनी या पुस्तकात केला आहे. पुणे येथील गणेश उत्सवाच्या काळातील दंगल हाताळताना गृहमंत्री बाळासाहेब देसाई आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दिलेले आदेश, त्यातून प्रत्यक्ष घडलेल्या घटना यांचं नाट्यमय वर्णनही त्यांनी या पुस्तकातून केलेले आहे. दंगल कशी हाताळायची, पोलीस दल कसे वापरायचे याबाबत मार्गदर्शक पुस्तिका त्यांनी तयार केली होती. जातीय दंगली होऊ नयेत यासाठी काय करायला हवे याबाबतचे आपले मतही ते अनेकदा स्पष्टपणे मांडत.

त्यांचे वाचन अफाट होते. धावपळीच्या कामातून वेळ काढून त्यांनी सम्राट अशोकाच्या जीवनावरची १४१ पुस्तके वाचून काढली होती. त्यावर त्यांनी बीलव्हेड ऑफ द गॉडस्-अ स्टोरी ऑफ अशोका द ग्रेट ही कादंबरी लिहिली. वयाच्या ९० व्या वर्षी २९ एप्रिल २०१० रोजी त्यांचे निधन झाले.

          - वर्षा जोशी-आठवले

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].