Skip to main content
x

मोडक, नारायण विनायक

नानासाहेब मोडक

     नारायण विनायक मोडक यांचा जन्म पुण्यात झाला. मोडक कुटुंबामध्ये नारायण मोडक सर्वांत मोठे होते. मोडकांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यामुळे मोडकांवर अर्थार्जनाची सर्व जबाबदारी पडली. स्वत:च्या व आपल्या भावा-बहिणींच्या शिक्षणासाठी मोडकांना कर्जेही घ्यावी लागली.

     १९११ साली मोडकांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी पुणे येथून मिळवली. त्यानंतर त्यांना त्या वेळच्या मुंबई प्रांतिक सरकारमध्ये मलनिस्सारण विभागात अभियंता या हुद्यावर नोकरी मिळाली. या नोकरीत असताना त्यांना माथेरान व देवळाली शहरांसाठी पाणीपुरवठ्याचे प्रकल्प करण्यास मिळाले. नंतर त्यांना डॉ. टर्नरसारख्या प्रसिद्ध स्थापत्य अभियंत्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली व सरकारी शिष्यवृत्तीच्या मदतीने भारतातल्या वेगवेगळ्या पाणीपुरवठा व मलनिस्सारणाच्या योजना पाहण्यास मिळाल्या. नंतर १९१९-१९२० साली मोडकांची इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी निवड झाली व त्या दोन वर्षांत इंग्लंडमधील पाणीपुरवठ्याच्या, रस्ते व पुलांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये काम करण्यास मिळाले.

इंग्लंडमधून परतल्यावर मोडकांंची नेमणूक कार्यकारी अभियंता या पदावर जी.आय.पी. रेल्वेने केली. या हुद्यावर नेमणूक मिळणारे मोडक हे पहिले भारतीय होते. मोडकांनी जी.आय.पी. रेल्वेमध्ये आठ वर्षे नोकरी केली.

     १९३० साली मुंबई महानगरपालिकेची पुनर्रचना झाली. या पुनर्रचनेनंतर मोडकांची उपनगर अभियंता या पदावर निवड केली गेली. त्यानंतर मोडकांनी केलेली कार्ये व परिश्रम बघून त्यांना नगर अभियंता हा हुद्दा दिला गेला. १९३२ ते १९४७ अशी पंधरा वर्षे मोडक मुंबई महानगरपालिकेचे नगर अभियंता म्हणून काम पाहत होते. त्यांनी केलेली कामे पाहून इंग्रज सरकारने ‘कम्पॅनियन ऑफ ब्रिटिश एम्पायर’ (सी.बी.ई.) ही पदवी प्रदान केली. जेव्हा १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मोडकांची नेमणूक महानगरपालिका आयुक्त म्हणून केली होती. परंतु नियमानुसार या हुद्यासाठी केवळ आय.सी.एस. अधिकारी नियुक्त होऊ शकत होता. म्हणून मोडकांसाठी विशेष अभियंता असा खास हुद्दा तयार केला गेला. या हुद्यावर मोडक १९४७ ते १९५५ सालापर्यंत होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने त्यांना १९५७ सालापर्यंत सल्लागार म्हणून नेमले. या सर्व कारकिर्दीमध्ये मोडक खालील प्रकल्पांसाठी प्रसिद्ध आहेत : १) दादरची मलनिस्सारण योजना, २) वैतरणा-तानसा पाणीपुरवठा योजना, ३) मुंबईचा विकास आराखडा, ४) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (निरी) स्थापना.

     या सर्व प्रकल्पांमध्ये मोडकांचे योगदान ‘वैतरणा-तानसा’ या योजनेसाठी अजूनही सर्वमान्य व संस्मरणीय आहे. या योजनेमध्ये मोडकांनी वैतरणा धरणाची निर्मिती केली व ७५ किलोमीटर लांबीच्या लोखंडी जलवाहिन्या बांधून वैतरणेचे पाणी मुंबईकरांसाठी आणले. हा प्रकल्प मोडकांंनी अथक परिश्रम करून १९४७ ते १९५५ या कालावधीत पूर्ण केला. त्यांनी केलेली ही सेवा बघून मुंबई महानगरपालिकेने धरणाच्या जलाशयाला ‘मोडक सागर’ असे सयुक्तिक नाव १९७६ साली दिले. मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तलावांमध्ये ‘मोडक सागर’चा भरीव वाटा आहे.

     अनेक संस्थांनी मोडक यांचा सत्कार व मानसन्मान केला. मोडक इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे १९४२-४३ साली अध्यक्ष होते. सरकारच्या उच्चस्तरीय समितींवर (उदाहरणार्थ, गंगेच्या प्रदूषणाबाबतच्या समित्या) मोडक सदस्य होते. १९५७ सालानंतर मोडकांनी आपले अनुभव व ज्ञान पुस्तकांच्या स्वरूपात लोकांसमोर आणले. नंतरच्या काळात त्यांनी दोन पुस्तके लिहिली : ‘स्युएझ ट्रीटमेन्ट’, ‘मास्टर प्लॅन ऑफ बॉम्बे.’ वयाच्या ऐंशीव्या वर्षानंतरही मोडक कामात व्यस्त असत. इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन दरवर्षी एन.व्ही. मोडक स्मृती व्याख्यान आयोजित करते व एका प्रथितयश अभियंत्याला भाषणासाठी निमंत्रित करते.

प्रसाद मोडक

मोडक, नारायण विनायक