Skip to main content
x

नाईक, सुधाकर राजुसिंग

     सुधाकर राजुसिंग नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील गहुली या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. ते वसंतराव नाईक यांचे पुतणे होते.

     नाईक यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात गहुली गावाच्या सरपंच पदापासून केली. त्यानंतर ते पंचायत समितीचे सभापती झाले. ते 1972 ते 1977 या काळात यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांची 1977 मध्ये प्रथमच विधानपरिषदेवर निवड झाली. त्यांनी 25 जून 1991 ते 6 मार्च 1993 या काळात मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. याच काळात त्यांनी जलसंधारण हे नवे खाते निर्माण केले आणि या खात्याचा कार्यभार स्वतंत्र मंत्र्याकडे सोपविला.

     जलसंवर्धनासाठी मोठमोठी धरणे बांधण्यापेक्षा जलसंधारणाची छोटी व मध्यम कामे पूर्ण करून जास्त शेतजमीन सिंचनाखाली आणता येते आणि अशा प्रकल्पामुळे शेतकरी विस्थापित होत नाहीत व त्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्नही निर्माण होत नाहीत, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांची 1994 मध्ये हिमाचल प्रदेशाच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. नाईक 1998 मध्ये वाशिम मतदारसंघातून निवड होऊन लोकसभेवर गेले. तसेच ते काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस झाले. त्यांची 1999 मध्ये जलसंधारण परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या काळात त्यांनी जिल्हा परिषदांना जास्तीत जास्त बळकटी प्रदान करण्याकडे लक्ष दिले. तसेच, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन त्यांचे निर्णय पाळणे प्रशासनातील अधिकार्‍यांसाठी बंधनकारक केले.

     नाईक यांनी प्रशासकीय कामांबरोबरीनेच त्यांनी अमरावती विद्यापीठाची स्थापना केली. वाड्या आणि तांडे यांना गावाचा दर्जा प्राप्त करून दिला. खाजगी वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांची निर्मिती, शेतकर्‍याला कर्जमंजुरी, पाझर तलावाची निर्मिती, अल्पसंख्याक आयोगाची स्थापना अशी अनेक कार्ये नाईक यांनी आपल्या कारकीर्दीत घडवून आणल्या. तसेच आपल्या गावामध्ये शिक्षणाची गंगा आणली.

     नाईक यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाईक हे राजकारण-समाजकारण करणारे असले तरी त्यांचा पिंड साहित्यिकाचा होता. म्हणूनच जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी यवतमाळ येथे अखिल भारतीय नाट्य संमेलन आणि साहित्य संमेलन भरवले होते. तसेच त्यांनी ‘सोनाली’ नावाचे मराठी साप्ताहिकही सुरू केले.

     सुधाकर नाईक यांचे वयाच्या 67 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे निधन झाले.

- संपादित

नाईक, सुधाकर राजुसिंग