Skip to main content
x

नांदापूरकर, नारायण गो.

     मराठी भाषेवर नितांत प्रेम करणारा मराठीचा भक्त, कवी, अभ्यासक, संशोधक आणि अध्यापक असलेल्या नारायण नांदापूरकर यांचा जन्म मराठवाड्यातील कळमनुरी गावामध्ये झाला. सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर पंधरा वर्षांच्या या विवाहित नारायणरावांना त्यांच्या वडिलांनी सांसारिक जबाबदारीची जाणीव दिली. मात्र, नारायणरावांना शिकायचे होते. म्हणून ते पुढे हैद्राबादला आले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वार लावून, लोकांकडे राहून शिकवण्या, नोकर्‍या करीत त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले व बी.ए. झाल्यावर ते औरंगाबादला शिक्षक झाले. १९३८ मध्ये हैदराबादला उस्मानिया विद्यापीठात ते अध्यापन करू लागले. त्यापूर्वी ते अलिगड विद्यापीठातून खासगीरीत्या संस्कृत विषयात एम.ए. झाले. पुढे उस्मानियात एम.ए. करून १९५० मध्ये मराठी विभागातील ते पहिले पीएच.डी. पदवीधर झाले. मराठी विभाग प्रमुख म्हणून उस्मानिया विद्यापीठामधून १९५६ मध्ये नांदापूरकर निवृत्त झाले.

     ‘मुक्त-मयूरांची भारते’ या संशोधन प्रकल्पासाठी त्यांनी दहा वर्षे अपार मेहनत घेतली. प्राचीन मराठी साहित्य निर्मिती आणि तिच्या स्रोताची चिकित्सा करणारा हा ग्रंथ भारतीय भाषाभ्यासामध्ये महत्त्वाचा ठरला आहे. ‘मुक्तेश्वरी भारतांची पाच पर्वे’ आणि मोरोपंतांचे ‘आर्याभारत’ यांपैकी काही पर्वांचा स्वतंत्र अभ्यास विद्यापीठात होत असे. पण या दोन्ही थोर कवींच्या भारती काव्यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांचे मूल्यमापन आतापर्यंत कोणी केले नव्हते. त्याकरिता फार परिश्रमांची आणि रसिक व चिकित्सक अभ्यासकाची आवश्यकता होती. नांदापूरकरांनी या मोठ्या कामाला धैर्याने प्रारंभ केला आणि अनेक अडचणींना तोंड देत हे कार्य पुरे केले. (प्रबंध, ‘आशीर्वाद’; शं.दा. पेंडसे; १०-८-१९५६)

     भारतीय भाषांमधील बंगालीचा अपवाद वगळता महाभारताचे वाङ्मयीन मूल्यमापन नांदापूरकर यांनीच केले आहे. त्यांनी महाभारत कथेतील प्रत्येक प्रसंग वाङ्मयीन निकष लावून तपासला. तसेच व्यक्तिदर्शन, रसनिर्मिती, अलंकारशैली, सामाजिकता या सर्वांचा अभ्यास समोर ठेवला. मोरोपंत व मुक्तेश्वर यांची आपसात तुलना करून मूळ महाभारताच्या रचनेशी तुलना केली. १८८५ ते १९५० पर्यंत झालेल्या मराठी काव्य समीक्षेपुढे नांदापूरकरांचे हे तौलनिक अभ्यासाचे कार्य वेगळेपणाने उठून दिसते. त्यांनी मराठी समीक्षेला महत्त्वपूर्ण योगदान दिले. साहित्याचा सर्वांगीण अभ्यास गणिती पद्धतीने मांडला.

     नांदापूरकरांच्या अभ्यासाचे क्षेत्र मर्यादित नाही. संत काव्य, महानुभवी वाङ्मय, पंडिती व शाहिरी वाङ्मयाचे ते अभ्यासक होते. तसेच भाषाशास्त्र, समीक्षा आणि छंदशास्त्रावरही त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गार्डनर’चा त्यांनी ‘फुलारी’ हा अनुवाद व अन्य दोन अनुवादित पुस्तके, बालवाङ्मय, दोन संपादित हस्तलिखिते आणि दोन काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहेत. ‘मायबोलीची कहाणी’ या त्यांच्या ग्रंथात मराठीच्या उगमापासून तुकारामापर्यंत मायबोलीचा इतिहास, कहाणीच्या आकृतिबंधातून रसाळपणे लिहिलेला आहे. गद्यकाव्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे.

     लोकसाहित्याचे प्रेम आणि त्याचे सांस्कृतिक महत्त्व त्यांच्या विपुल ओवी संग्रहातून दिसते. मराठवाड्यातील खेड्यापाड्यांतील अशिक्षित भगिनींनी शेकडो वर्षांपासून आपला सांस्कृतिक ठेवा, आपला इतिहास, रामायणादी ग्रंथ व पुराणे मौखिक परंपरेने जपले होते. दुर्गम भागात पायपीट करीत या ओव्या नांदापूरकरांनी मोठ्या मुष्किलीने गोळा केल्या. ‘माहेरचं मराठी’, ‘मराठीचा मोहोर’, ‘मराठीची माया’ हे स्त्री-गीतांचे संग्रह प्रकाशित केले. परंतु, त्यावर कळस म्हणजे रामायणासंबंधित ६००० ओव्यांमधून ‘मर्‍हाठी स्त्री-रचित रामकथा’ संपादित केली. ओवी वाङ्मयाची भावनिक ओढ आणि भाषाशास्त्रीय महत्त्व असा दुहेरी अभ्यास करीत त्यांनी ग्रमीण स्त्रियांच्या कल्पनेची भरारी मराठी जनांना दाखवून दिली. मराठीतली ओवी वाङ्मयाचा उगम शोधत ते ज्ञानेश्वरपूर्व काळापर्यंत पोहोचले. तेराव्या शतकातील किंवा कदाचित त्यापूर्वीची मराठी रचना व आजचे मराठवाड्यातील ग्रामजीवन, स्त्री-जीवन, बोली भाषाशैली, म्हणी यांत त्यांना निश्चित अनुबंध आढळला. आपल्या लेखनातून ते तो अनुबंध पुन:पुन्हा तपासत राहिले. मराठी आणि इंग्रजीत मिळून प्रकाशित, अप्रकाशित असे २० ग्रंथ व ६० लेख नांदापूरकरांनी लिहिले.

     एकनाथ खंडाचे ते मुख्य संपादक होते. मराठवाडा साहित्य परिषदेच्या ‘प्रतिष्ठान’ या मुखपत्राचेही ते एक वर्ष संपादक होते. साहित्य अकादमी, दिल्लीच्या पहिल्या मराठी सल्लागार मंडळावर त्यांची नेमणूक झाली होती. मराठवाडा साहित्य परिषदेच्या परळी येथील संमेलनाचे (१९५५) अध्यक्षपद नांदापूरकरांनी भूषविले होते.

     ९-६-१९५९ रोजी नांदापूरकरांनी मृत्यूपूर्वी महाराष्ट्राकडे अखेरचे मागणे मागितले. त्यातील शेवटच्या दोन ओळी : ‘मराठीच्या मोहनांनो, मराठी आपली मायाळू माउली, सगळी सुखं तिच्या पावलो-पावली. मराठी जनता मराठीच्या भजनी लागावी. तिनं मराठी कवीचं स्मरण करावं. त्याचं ऋण फेडावं आणि मराठीचं लेणं नव्या नवलाईनं घडावं.’ (‘पंचधारा’, सप्टेंबर १९५९)

डॉ. विद्या देवधर

नांदापूरकर, नारायण गो.