Skip to main content
x

नारकर, अविनाश गोपाळ

      भिनयाचा कौटुंबिक वारसा नसलेल्या, पण उपजतच जाण असलेल्या अविनाश नारकर यांचा जन्म मुंबई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरात झाले, तर बी.कॉम.ची पदवी त्यांनी महालक्ष्मी येथील लाला लजपतराय महाविद्यालयातून घेतली. याच काळात आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेऊन त्यांनी आपल्यातील अभिनयगुण दाखवून दिले. अविनाश यांनी विजय टाकळे दिग्दर्शित ‘माणसांची गोष्ट’, ‘ढोल वाजतोय’, ‘व्हिक्टिम’, ‘फॉर सेकंड’, ‘शेवाळ शेकतयं क्लोरोफिल’ या एकांकिकांमध्ये अभिनय केला. मोनो अ‍ॅक्टिंग स्पर्धेत सहभागी झाल्यावर त्यांना स्वत:च्या अभिनयातील त्रुटी कळू लागल्या, तसेच आपल्या अभिनयातील चांगले-वाईट बारकावे आणि बलस्थानेही हेरता आली. यामुळेच त्यांच्यात रंगभूमीवर वावरण्याचा आत्मविश्‍वास निर्माण झाला.

     शिक्षण झाल्यावरही त्यांनी १९८२-१९८५ या काळात डायनर्स् इंटरनॅशनल क्रेडिट इश्यू फर्ममध्ये अर्धवेळ काम केले, तर १९८८ मध्ये ते बस सेवेत रुजू झाले. तेथे त्यांनी कामगार नाट्य स्पर्धेतील नाटकांमध्ये कामे केली. त्यांनी कामे केलेली ‘मनूचा इतिहास’ (१९८६), ‘काळोखाच्या सावल्या’, ‘गंध निशिगंधाचे’ (१९९३), ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘रणांगण’ ही नाटके प्रेक्षकप्रिय झालेली आहेत. नाटकांमध्ये कामे करत असतानाच त्यांची पल्लवी आठवले यांच्याशी ओळख झाली आणि १९९५ मध्ये ते दोघे विवाहबद्ध झाले.

     नाटकातील यशस्वी कारकीर्दीनंतर अविनाश यांनी १९९४ मध्ये पहिल्यांदा ‘मुक्ता’ या चित्रपटात काम केले. त्यात त्यांनी महेश वाघ या दलित कार्यकर्त्याची भूमिका समर्थपणे साकारली. या भूमिकेसाठी त्यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी ‘माझा मुलगा’ (१९९५), ‘हसरी’ (१९९७), ‘पुत्रवती’ (१९९७), ‘खतरनाक’ (२०००), ‘पैज लग्नाची’, ‘लक्ष्मी’ या चित्रपटातून काम केले. पैज लग्नाची’ या चित्रपटात केलेली वेड्या भावाची भूमिकाही लोकप्रिय झाली. अभिनयातील सहजता त्यांच्या सर्वच प्रकारच्या भूमिकांमधून पाहायला मिळते.

     अविनाश यांनी नाटक, चित्रपट या माध्यमांप्रमाणे दूरदर्शनच्या पडद्यावरही आपली मोहोर उमटवली. ‘पांडू रे पांडू’ ही त्यांनी अभिनित केलेली पहिली दूरदर्शन मालिका. या मालिकेत त्यांनी पांडू या मुख्य भूमिकेतील नोकराचे काम केले होते. खरेतर ही भूमिका त्यांच्याकडे चालून आल्यावर नोकराचे काम करायला त्यांनी नकार दिला होता, पण आईच्या सल्ल्यावरून ती भूमिका करायची त्यांनी मान्य केले व ही भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली, तर ‘महाश्‍वेता’ ही अशीच एक खूपच गाजलेली मालिका. या भूमिकेने त्यांना लोकप्रियतेचे वलय निर्माण करून दिले व नाटकातला हा चेहरा खऱ्या अर्थाने घरोघरी दिसला. त्यांनतर त्यांनी ‘वादळवाट’, ‘वहिनीसाहेब’, ‘अग्निहोत्र’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘पाऊस मृगाचा पडतो’, ‘पिंपळपान’ यांसारख्या काही मालिकांमधूनही त्यांनी उत्तमोत्तम भूमिका केल्या.

     समाज जागृतीसाठी माध्यमाचा वापर करून घेण्यासाठी अविनाश नारकर यांनी आपली पत्नी ऐश्‍वर्या यांच्यासोबत २०१० मध्ये ‘ऐश्‍वर्या आर्ट अ‍ॅण्ड व्हिजन’ या संस्थेची स्थापना करून ‘चॅम्पियन’ हा बालमजुरी व बालशिक्षण यावर आधरित चित्रपट तयार केला. या चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवात विशेष परीक्षक पुरस्कार लाभला, तसेच या चित्रपटात काम केलेल्या दोन्ही बालकलाकारांनाही राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.

     एक सर्जनशील व संवेदनशील नट अशी ख्याती त्यांना प्राप्त झाली ती त्यांच्या अभिनयातील सहजतेमुळेच.

- संपादित

नारकर, अविनाश गोपाळ