नातू, गोपाळ नरहर
कवितेला अवघे जीवन वाहिलेले कल्पक प्रतिभेचे कवी म्हणून ओळखले जाणारे लोककवी मनमोहन तथा गोपाळ नरहर नातू यांचा जन्म माणगाव (जि. कोल्हापूर) येथे झाला. त्यांचे शिक्षण पुणे, मुंबई, कल्याण व तळेगाव येथे झाले. त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर १९३२साली पुणे येथे ते ‘यूथलीग’चे डिक्टेटर बनले. त्यांना इंग्रजी, संस्कृत, हिंदी व गुजराती भाषा अवगत होत्या. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता.
त्यांचे ‘अफूच्या गोळ्या’ (१९३३), ‘कुहूकुहू’, ‘दर्यातील खसखस’, ‘फील्ड मार्शलची सलामी’, ‘मंजूळ भावगीते’, ‘शंखध्वनी’ (बोंबाबोंब), ‘युगायुगांचे सहप्रवासी’, ‘सुनीत गंगा’, ‘शिवशिल्पांजली’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. तर ‘उद्धार’, ‘कॉलेजियन’, ‘जीवनाधार’ ह्या खंडकाव्यांचेही त्यांनी लेखन केले आहे. ‘ताई तेलीण’ हा त्यांनी लिहिलेला पोवाडा प्रसिद्ध आहे. त्यांनी ‘गोपाळकृष्ण’, ‘नरशार्दूल नेताजी’ ही पद्ये मेळ्यासाठी लिहिली. त्यांनी ‘बॉम्ब’ हे महात्मा गांधींच्या जीवनावरील काव्य लिहिले.
कादंबरीलेखनात त्यांनी विविध प्रकारचे विषय हाताळले. त्यांत त्यांनी ‘अभिलाषा’, ‘आनंदघन’, ‘इंद्रधनुष्याची गोष्ट’, ‘कड्यावरून कोसळलेली कामिनी’, ‘गुरुजींची आत्महत्या झपूर्झा’, ‘टिपरी पडघमवर पडली’ आदी सामाजिक विषयांवरच्या कादंबर्या लिहिल्या. ‘इंद्रायणी’, ‘चिमाजी अप्पा’, ‘चंद्रभागा’, ‘छत्रपती भाग-१ ते ४’, ‘छत्रपती राजाराम’, ‘छत्रपती शाहू’, ‘छत्रपती संभाजी’, ‘पहिला पेशवा’, ‘पानपत’ आदी एकूण तीस ऐतिहासिक कादंबर्या लिहिल्या. ‘थांबा थोडं दामटा घोडं’ आणि ‘दोन रणांगण’ या नाटकांचेही त्यांनी लेखन केले आहे. त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. त्यांनी क्रिकेटविषयक लेखन केले. ‘डॉन ब्रॅडमन’ (चरित्र व खेळांची माहिती), ‘नॉट आउट’, ‘सी.के.नायडू’, ‘अॅज आय सी’ ही त्यांची क्रिकेट विषयीची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
लोककवी मनमोहन नातू यांनी छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, त्रिंबकजी डेंगळे, या ऐतिहासिक व्यक्तींच्या आणि म. गांधी, सुभाषचंद्र बोस, सावरकर या आधुनिक व्यक्तींच्या गौरवगाथा लिहिल्या. लोकविलक्षण स्वैर, आणि अनिर्बंध कल्पकता हे मनमोहनांच्या काव्याचे विशेष होते. त्यांच्यावर तळेगावच्या शाळेतले शिक्षक वि.गो.विजापूरकर, कायकर्ते शि.म.परांजपे, सुप्रसिद्ध कवी ज.के.उपाध्ये, गं.दे.खानोलकर यांचे संस्कार झाले होते. त्यांची प्रारंभीची कविता कथाकाव्यात्मक आणि सामाजिक आशय व्यक्त करणारी होती. त्यात ते विनोद आणि उपहास यांचा वापर करीत असत. १९४७ नंतर ते भावकवितेकडे वळले. त्यांच्या रचना आटोपशीर आणि बांधेसूद असत. ‘कवींनी आपले स्वत्व आणि स्वातंत्र्य सदैव जपले पाहिजे’, अशी श्रद्धा ते जहालपणे व्यक्त करीत.
आपल्या ‘युगायुगांचे सहप्रवासी’ या काव्यात त्यांनी हिंदू-मुसलमान दंग्याचे वर्णन केले. दारिद्य्र, सत्तापिपासा, यंत्रयुगामुळे वाढलेले दुःख, भीषणता यांतून मानवी जीवनाला आलेली अवकळा त्यांनी वर्णन केली.
‘उंबरठ्यावरी माप ठेविले’, ‘मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला’, ‘ती पहा ती पहा बापूजींची प्राणज्योती’, ‘राधे तुझा सैल अंबाडा’ ही त्यांची गीते खूप लोकप्रिय झाली. काव्यनिर्मितीत आनंद शोधणारा आणि कवितेसाठी जीवन व्यतीत करणारा प्रतिभावंत ही त्यांची खरी ओळख आहे.
त्यांच्या ‘युगायुगांचे सहप्रवासी’ या काव्याचा इंग्रजी अनुवाद दिलीप चित्रे यांनी केलेला आहे. तसेच ‘आदित्य’ या त्यांच्या निवडक कवितांच्या संग्रहाचे संपादन ज्येष्ठ कवी प्रा.शंकर वैद्य यांनी केले आहे.
कवी मनमोहन यांची वृत्ती कल्पनाविश्वात रमणारी असली तरी बौद्धिकदृष्ट्या ते सतत भोवतालच्या वास्तवाशी आणि वर्तमानकाळाशी निगडित राहिलेले आहेत. ते ‘लोककवी’ म्हणूनच सदैव ओळखले गेले.