Skip to main content
x

नातू, सुजाता सुरेश

 सुजाता सुरेश नातू या पूर्वाश्रमीच्या बडोद्याच्या मंदाकिनी आंबेगावकर होत. त्यांचे वडील जयराम हे अबकारी विभागात (एक्साइज डिपार्टमेंटमध्ये) सरकारी नोकरीत होते. आई इंदुमती या उत्कृष्ट ब्रिजपटू होत्या आणि महाराणी शांतादेवी यांच्या सहखेळाडू होत्या. सुजाता (मंदाकिनी) यांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठामधून बी.ए. व एम.ए. (संगीत व कथक) या पदव्या प्राप्त केल्या. पदवीसाठी द्वितीय विषय म्हणून त्यांनी सतार-वादनाचेही शिक्षण घेतले होते. त्या गुरू पंडित सुंदरलालजी गंगाणी यांच्या कठोर शिस्तीखाली नृत्यात पारंगत झाल्या आणि त्यांनी गुरूंची वाहवा मिळवली.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांसारख्या मान्यवरांसमोर सुजाता यांनी एकल नृत्य सादर केले. नृत्यरचना (कोरियोग्राफी) ही त्यांची खासियत होती. त्यांनी अनेक विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. नृत्याबरोबरच त्यांना खेळाचीही आवड होती. त्या विद्यापीठाच्या खो-खो संघाच्या कप्तानही होत्या. बी.ए.च्या कनिष्ठ वर्गात शिकत असताना धावण्याच्या स्पर्धेसाठी त्यांची ऑलिम्पिकमध्ये निवड झाली होती. काही वैयक्तिक कारणांनी त्या सदर स्पर्धेत सहभागी होऊ शकल्या नाहीत.
सुजाता यांची १९६५ साली सरकारी स्पर्धापरीक्षेत यश मिळाल्यावर आकाशवाणीमध्ये ‘प्रक्षेपण अधिकारी’ या पदावर नियुक्ती झाली. तिथे त्यांनी ‘वीणानो मृग’ ही संगीतिका बसवली आणि सादर केली. सुरेश नातू यांच्याबरोबर १९६५ साली विवाह झाल्यावर त्या प्रथम मुंबई व नंतर पुणे येथे स्थायिक झाल्या. त्यांनी १९७० साली पुण्यात ‘पदन्यास’ ही नृत्यसंस्था चालू केली. त्यांनी सातत्याने चाळीस वर्षे बी.ए., एम.ए.पर्यंतच्या अनेक विद्यार्थिनींना शिक्षण दिले.
‘पदन्यास’तर्फे त्यांनी एकल नृत्ये, समूहरचना, काव्यरचनांवर नृत्य बसविणे, असे अनेक प्रकारचे सादरीकरण केले. त्यांनी अनेक काव्यबोल रचले आहेत. नृत्यासाठी त्यांनी भारतभर, तसेच परदेशांतही दौरे केले. त्यांना हिंदू महासभेकडून ‘नृत्यचंद्रिका’ ही पदवी देण्यात आली. तसेच पद्मभूषण गुरू बिरजू महाराज यांच्या हस्ते त्यांना ‘पंडिता’ म्हणून भूषविण्यात आले.
त्यांच्या प्रयत्नाने १९७६ साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठात नृत्याच्या पदविका परीक्षा चालू झाल्या. पुढे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू करण्यात त्या अग्रभागी होत्या. शालेय शिक्षणात ‘नृत्य’ हा विषय शिकवला जावा अशी नातूंची इच्छा होती. तत्कालीन शिक्षणाधिकारी डॉ. चिपळूणकर यांच्या सहकार्याने त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. अनेक शाळांमध्ये १९८५ पासून प्रात्यक्षिकांद्वारे ‘नृत्य’ हा विषय पहिल्या इयत्तेपासून सुरू झाला. महाराष्ट्र शासनाच्या ‘बाल भारती’ या संस्थेमध्ये शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका तयार करण्यासाठी त्यांना ‘नृत्य’ या विषयाचे तज्ज्ञ म्हणून आमंत्रित करण्यात आले.
नृत्याच्या ओढीने त्यांनी वयाच्या पासष्टाव्या वर्षी ‘जयपूर नृत्यशैलीचे संगीतात्मक विश्लेषण’ हा अभ्यासग्रंथ सादर करून एस.एन.डी.टी. विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी मिळवली. तसेच, त्यांनी ‘भारतीय नृत्यशैली’, ‘कथक : एक सौंदर्यशास्त्र’, ‘कथकमय मीरा’ ही पुस्तके व नृत्य-काव्य-बोलांवर दोन पुस्तके लिहिली आहेत.

अनुराधा आगाशे

नातू, सुजाता सुरेश